किनवट नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेत प्रचंड गोंधळ..?
"निवडणूक विभागाचे नियोजन फसले; उमेदवारांची दिवसभर ससेहोलपट.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(साजिद खान)
माहूर /किनवट
नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेत आज प्रचंड अव्यवस्था पाहायला मिळाली. निवडणूक विभागाचे नियोजन पूर्णतः ढासळल्याने उमेदवारांना अक्षरशः तासन्तास ताटकळत बसावे लागले. दिवसभराच्या या गोंधळामुळे उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या दुर्लक्षित आणि ढिसाळ धोरणामुळे उमेदवारांची ही परवड झाल्याची जोरदार चर्चा आहे. नामनिर्देशनासाठी टोकन देण्याची पद्धतही अव्यवस्थित असल्याने अनेक उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे शेकडो उमेदवार नामनिर्देशन अर्जांसह नगरपरिषद कार्यालयात ठाण मांडून बसले असून रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे. दिवसभर चाललेल्या या गोंधळामुळे उमेदवारांकडून तीव्र संतापाची लाट उसळली आहे…
उमेदवारांनी निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने असल्याने निवडणूक विभागाने व्यवस्थित नियोजन करून अतिरिक्त कक्ष, कर्मचारी आणि स्पष्ट दिशादर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे होते परंतु निवडणूक विभागाच्या गैरजबाबदारपणामुळे उमेदवारांवर ताटकळत बसण्याची वेळ आली.






