अतिवष्टीच्या अनुदानासाठी शेतक-यांनी महसूल कर्मचा-यांकडे कागदपत्रे जमा करावेत…
'तहसीलदार किशोर यादव यांचे शेतकऱ्यांना आवाहन'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
सन 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान रक्कम जमा झाली असून पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी गावोगावच्या तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांच्याकडे शेतकऱ्यांनी मोबाईल नंबरसह पासबुक, आधार कार्ड जमा करण्याचे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे..
माहूर तालुक्यातील 84 महसुली गावांपैकी 34 गावातील शेतकऱ्यांची आधार कार्डसह मोबाईल नंबर, पासबुक अपलोड करण्याची कामे पूर्ण झाली असून तब्बल 50 गावांतील शेतकऱ्यांनी अद्यापही कागदपत्रे जमा केली नसल्याने शेतकऱ्यांसाठी आलेली अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वाटपाअभावी तशीच पडून आहे.. त्यामुळे सर्व अनुदानपात्र शेतक-यांनी तातडीने कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे…
“विशेष म्हणजे सप्टेंबर 2024 च्या अतिवृष्टी अनुदानासाठी माहूर तालुक्यातील 26,172 शेतकऱ्यांसाठी अनुदान म्हणून 35 कोटी 11 लक्ष 60 हजार 208 रुपये तहसील कार्यालयाकडे जमा झाले आहेत… परंतु यापैकी माहिती प्राप्त झालेल्या केवळ 5944 शेतकऱ्यांचीच परिपूर्ण नोंद घेण्यात आली आहे. परिणामी कागदपत्रे सादर न केलेल्या तब्बल 20288 शेतकऱ्यांची माहिती अद्यापही जमा होणे बाकी आहे…..
या अनुदान वाटपाच्या मुदतीला जास्त वेळ नसल्याने आज दि. ३ रोजी तहसीलदार किशोर यादव यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक बोलावून तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन येत्या तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत… दरम्यान शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे जमा करून शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे…