आदिम जमाती वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता मोकळा करून देण्याची मागणी…!
तहसीलदारांच्या घोषणेला कोलामखेड वासियांकडून प्रतिसाद...
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाचा कृती कार्यक्रमांमध्ये समाविष्ट पाणंद रस्ते वरील अतिक्रमण दूर करून रस्ते मोकळे करून देण्याच्या महत्त्वकांक्षी निर्णयाच्या अंतर्गत तालुक्यातील मौजे वाई बा.जुने गावठाण ते आदिम जमाती वाडी कोलामखेड्याकडे जाणारा पाणंद रस्ता मोकळा करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे दिनांक २३ रोजी तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांना करण्यात आली केली आहे..
शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यास रस्त्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो तसेच गावाला महामार्गाला जोडणारा सुद्धा हाच पाणंद रस्ता असल्याने सदरील रस्ता महत्वाचा ठरतो.मौजे वाई ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिम जमाती वाडी कोलामखेडा येथे बहुसंख्येने आदीम कोलाम व गोंड आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. त्यांना दिवसा,रात्री अपरात्री वाई येथे दवाखाना,शाळा,रेशन दुकान,बाजारपेठ इत्यादी करता यावं लागतं परंतु ४४ फुटापेक्षा अधिक रुंद असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन दोन्हीकडून झाडे झुडपे वाढल्याने हा रस्ता पूर्णतः अरुंद झाला आहे.हीच बाब लक्षात घेता गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांअंतर्गत व तहसीलदार माहूर यांनी रस्ते मोकळे करून देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने पाणंद रस्ता मोकळा करून देण्याच्या योजनेला साद घालत सदरील निवेदन संबंधितांना दिले आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर पाणंद रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे..
निवेदनावर राम सुंगा उईके, हुसेन दगडु दुमने, फिरोज हा.उस्मान खान पठाण, साजीद मजीद खान, अमजद खान आजाद खान पठाण, जावेद रहेमान खिलजी, गंगाराम प्रमोद मडावी, प्रीतम किसन गेडाम, शिवाजी बंडू गेडाम, बदल नारायण राठोड, साजन प्रमोद मडावी, रामजी अत्राम, अंकुश सलाम, अविनाश मेश्राम, अत्रिनंदन किशोर शिंदे, अबिद बरकत खीच्ची, विकास लूमसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी प्रहार चे सुभाष दवणे यांची उपस्थिती होती, निवेदनाच्या प्रती सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व जिल्हाधिकारी नांदेड यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
तहसीलदार साहेबांनी रस्ते मोकळे करून देणार असल्याबाबत पेपरमध्ये बातमी दिली होती, ती बातमी वाचून कोलामखेड व वाई गावातील लोकांना एकत्र करून निवेदन द्यायला लावले या रस्त्यावरील अतिक्रमण दूर झाल्यास कोलामखेडा येथील कोलाम आणि आदिवासी समूहातील लोकांना रहदारी मध्ये असलेल्या मोठा अडथळा दूर होणार आहे तहसीलदार साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे स्वतः जातीने हजर राहून हा रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती…
– रामा सूंगा उईक, कोलामखेडा, वाई बाजार