ईतर
वाई बाजार नजीक रोह्याची दुचाकीस्वारास जोराची धडक…
"दुचाकीस्वारासह रोह्याचा जागीच मृत्यू ; एक गंभीर.."
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील वाईबाजार नजिकच्या वाघाई टेकडीजवळ आज पहाटेच्या सुमारास रोह्याची (निलगाय) दुचाकीस्वारास जोराची धडक बसल्याने दुचारीस्वार युवकासह रोह्याचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दि. २७ रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली..
किनवट तालुक्यातील निराळा येथील सुरज भारत राठोड वय २५ वर्ष व आकाश नत्थू पवार वय २२ हे त्याची (केटीएम) दुचाकी क्र. एम.एच. २६ बी.वाय. ०२६० वरून दोघेही यवतमाळकडे निघाले होते. दरम्यान आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाई बाजार येथील वाघाई टेकडी नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अंदाजे साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने जाणा-या दुचाकीला रस्ता ओलांडणा-या रोह्याने (निलगाय) जोराची धडक दिली. सदरची धडक एवढी जोरदार होती की, महामार्गावर अक्षरश: रक्ताचा सडा पडला. यात रोह्याचा तसेच दुचाकीस्वार सुरज भारत राठोड वय २५ या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी उपस्थितांनी दोन्ही युवकांना तातडीने माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले असता यातील सुरज भारत राठोड याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आकाश नत्थू पवार हा युवक गंभीर अतीगंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यालाही तातडीने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयाकडे हलवले असल्याची माहिती माहूर येथील डॉक्टरांनी दिली आहे. घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी तसेच सिंदखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारीही हजर असून पुढील प्रक्रिया सुरू होती. वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नसल्याने याबाबत अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही..