ईतर
‘दारूबंदी’ मोहीमेेेेच्या पार्श्वभूमीवर वाई बाजारात रंगणार राजकीय फड…!
"दारूबंदीचा विषय गौण ; निवडणूक मात्र कट्टर 'राजकीय'च"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
मागील काही दिवसांपासून चर्चिला जात असलेल्या दारूबंदीविषयक घडामोडींनी आता राजकीय वळण घेतल्याचे दिसत असून दारूबंदी मोहिमेच्या पार्श्वभुमिवर वाई बाजारात दारूबंदीच्या निमित्ताने राजकीय फड रंगणार असल्याची जोरदार चर्चा उघडपणे ऐकायवयास मिळत असल्याने दारूबंदीचा विषय केवळ नावापुरताच असला तरी यानिमित्ताने होणारी निवडणूक मात्र कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांचीच ठरणार असल्याचे भाकीत जाणकार मंडळींकडून वर्तवण्यात येत आहे…
माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील ग्राम पंचायत पुरस्कृत साडे आठशे महिलांच्या एका गटाने गावातील संपुर्ण दारूबंदीसाठी दि. १२ डिसेंबर रोजी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच जिल्हाधिका-यांना लेखी निवेदन दिले होते.. तर दुसरीकडे वाई बाजार ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर निवडणुकीदरम्यान झालेल्या मतभेदातून दारूबंदीचे आंदोलन राबवताना आमच्या सह्यांचा गैरवापर झालेला असल्याचा आरोप करताना महिलांंच्या एका दुस-या गटानेही जिल्हाधिका-यांसह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना लेखी निवेदन देवून दिशाभुल करणा-यांविरूध्द कार्यवाही करण्याची मागणी केली होती..
“त्यामुळे सदर प्रकरण हे राजकीयदृष्ट्या सुडबुध्दीने ग्रासले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असतानाच प्रस्तावित दारूबंदी आंदोलनातील दैनंदिन घडत असलेल्या रंजक घडामोडींकडे पाहता या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून दारूबंदीचा अतिसंवेदनशील विषय आता दिवसेंदिवस अधिकच स्फोटक बनणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
“विशेष म्हणजे सुरू असलेल्या एकूणच राजकीय घडामोडींकडे पाहता दारूबंदीचा विषय केवळ नावापुरताच असला तरी “दारूबंदी” नामक अभियानाच्या निमित्ताने उद्या दि. २१ जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निवेदनावर असलेल्या महिलांच्या स्वाक्ष-यांची पडताळणी केल्यानंतरच दारूबंदी आंदोलनाचे खरे रूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘जर-तर’ च्या अनाकलनीय व कायदेशीर प्रक्रियेत पुढे काय-काय होणार याबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका-कुशंकांनी घर केले असले तरी दारूबंदीच्या निमित्ताने भविष्यात होणारी निवडणूक ख-या अर्थाने दारूबंदीची नव्हे तर केवळ “राजकीय”च होणार असल्याने वाई बाजारात राजकीय फड पुन्हा एकदा रंगणार ..! हे जवळपास निश्चित मानले जात आहे….

