आष्टा फाट्यानजीकच्या शेतात महिलेला तुराट्या- पराट्यात टाकून जाळले…
"काल रात्री साडेआठच्या दरम्यानची घटना ; परिसरात एकच खळबळ"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
आष्टा फाट्यानजीकच्या एका शेतात अज्ञात महिलेला शेताच्या धु-यावर तुराट्या- पराट्यात टाकून जाळल्याची खळबळजनक घटना काल दि.५ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा फाट्यानजीक असलेल्या माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते आष्टा फाट्याच्या दरम्यान मुख्य महामार्गापासून अवघ्या दोनशे मिटर अंतरावर असलेल्या हिवळणी येथील तुळशीराम राठोड यांच्या शेतात ही घटना घडली असून त्यांच्या शेताच्या बांधावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक 5 जून रोजी रात्री साडे आठच्या सुमारास उघडकिस आली..
दरम्यान माहूर शहरापासून नऊ कि.मी. अंतरावर असलेल्या आष्टा- हिवळणी फाट्यानजीक तुळशीराम राठोड यांच्या शेतात त्यांच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प-याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच स्पिंकलरची ६१ पाईप आणि आठ नोझल ठेवलेले होते.. तेथे रात्री 8 वाजताच्या सुमारास मोठी आग लागल्याचे दिसल्याने शेत मालक शेतात आले. त्यावेली काडीकच-याच्या ठिगा-याला लागलेली आग अथक प्रयत्न करून विझल्यानंतर त्या ठिगा-याच्या राखेत एका अज्ञात महिलेेेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसला.. त्यावेळी त्यांनी तातडीने माहूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळावर पोलीसांनी येऊन पाहणी केली..
“विशेष म्हणजे अर्धवट जळालेला तो मृतदेह एका महिलेचा असल्याचे सांगण्यात येत असून त्या मृतदेहाच्या हातात बांगड्या, कानातील दागीना तसेच पायात जोडवे दिसून आले.. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा घटनास्थळावर आढळून आला नाही.. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध घडवलेल्या या हत्याकांडातील मृृृतक महिला ही जवळपासची नसावी असा कयास प्रथमदर्शनी वर्तवला जात असून घटनेच्या तपासाचे कडवे आव्हान माहूर पोलीसांसमोर असल्याने या घटनेच्या तपासात माहूर पोलीसांचा अक्षरश: कस लागणार हे जवळपास निश्चित आहे….
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांच्यासह सपोनी परगेवार पो. उपनि. आनंदराव वाठोरे तसेच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी घटनास्थळावर दाखल होवून घटनास्थळाची पाहणी केली.. तर रात्री उशीरा फॉरेन्सिक पथक आल्याचेही समजते…