(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यात सुरू असलेल्या तांदळा येथील जलसंधारणाच्या होत असलेल्या बंधा-यात प्रचंड बोगसगीरी होत असून या कामांसाठी शासनाने कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देवून कामांस मंजूरी दिल्यानंतरही ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात पैसा वाचवण्यासाठी चक्क नाल्याच्या रेतीनेच कामे होत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देवूनही हा बंधारा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याची ओरड गावक-यांतून होत आहे…
माहूर तालुक्यातील मौजे तांदळा येथे जलसंधारणाच्या कामातून येथील एका नाल्यावर बंधारा बांधण्याचे काम सुरू असून या बंधा-यासाठी किमान ८५ लक्ष ते १ कोटी रूपयाचा निधी शासनाने मंजूर केल्याची खात्रीलायक माहीती आहे.. गावापासून तब्बल एक ते दिड किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या बंधारा बांधकामाकडे ग्रामस्थांचे फारसे लक्ष नाही.. याच तांत्रीक बाबीचा लाभ उठवत संबंधित ठेकेदार आपली दुहेरी भुमिका बजावताना दिसत असून एकीकडे नाल्याच्या रेतीचा बेसुमार उपसा करून त्याच मातीमिश्रीत रेतीने सदर बंदा-याचे काम झपाट्याने करून मोठी रसद गिळंकृत करण्याचा मानस बाळगून आहे…
दरम्यान या ठिकाणी नाल्यातील उपसा केलेली तब्बल शंभर ब्रास रेतीचे ठिगारेच ठिगारे संबंधित ठेकेदाराने साचवले असून या रेतीचा उपयोग या कामानंतर नदीची रेती म्हणून खाजगीत विकण्याचा तर इरादा नाही ना..? असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींना पडला आहे… तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नाल्याच्या रेतीचा उपसा होत असूनही महसूल प्रशासनातील तहसीलदारांसह मंडळ अधिकारी व तलाठी हे मुग गिळून गप्प का..? असाही सवाल सर्वसामान्यांना पडला असून राजकीय हस्तक्षेपाने बंधा-याच्या नावाखाली होत असलेली बोगसगीरी जाणिवपुर्वक दाबल्या जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे… त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देवून बंधा-याचे बोगस काम थांबवून दर्जेदार काम करण्यास संबंधित ठेकेदारास बाध्य करावे..व नाल्याच्या रेतीचे उत्खनन करण्यास मनाई असतानाही शेकडो ब्रास नाल्याची रेती खोदल्याप्रकरणी तहसीलदार माहूर यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी माफक अपेक्षा निसर्गप्रेमी बाळगून आहेत…