
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या अवैध धंद्यांंवर तातडीने कार्यवाही करून राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे थांबवण्यासंबंधात लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी किनवट यांच्याकडे करण्यात आली असून परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासनाला सातत्याने अपयश येत असल्याने सिंदखेडला कर्तव्यदक्ष ठाणेदाराची नेमणूक करण्याची मागणी देखील या तक्रारीतून केली आहे….
सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पडसा येथील राजूभाऊ नाना डुकरे यांनी किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कार्यालयात दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सदरची लेखी तक्रार केली असून महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या विरोधातही आक्रमक भुमिका घेत दोन्ही विभागात हप्तेखोरीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आरोप तक्रारीतून केले आहेत.. त्यातील मजकूराप्रमाणे पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीत मौजे पडसासह अनेक ठिकाणी पोलीसांच्या व महसूलच्या हप्तेखोरीमुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेवर रेतीचे ढीग जमा केले जात असून रात्रंदिवस अवैध रेती उत्खनन व वाहतूक चालू आहे. तथापि रेतीचोरी करणा-या वाहनांच्या आवाजाने व अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे जिव मुठीत धरून राहावे लागत असल्याची भितीही तक्रारीतून मांडली आहे….
….. सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक रेतीघाटांवरील रेतीवाहतूकीसह बहुतांश गावांत खुलेआम मटका, जुगार, दारुविक्री, अवैध वाहतुक सुरू असून सुरू असलेले अवैध धंदे विनाविलंब बंद करून अवैध धंदेवाल्यावर कठोर कारवाई करून सिंदखेड येथे कर्तव्यदक्ष ठाणेदाराची नेमणुक करण्याचीही मागणी केली आहे….
विशेष म्हणजे खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे हे पोलीसाच्या आशीर्वादाने व त्यांच्या निगरानीखालीच चालू असून त्यामुळे सर्वसामान्याचे सामाजिक स्वास्थ बिघडल्याने सामाजिक अशांतता पसरून सर्वसामान्यांचे जीवनमान संकटात सापडले असल्याचा आरोपही निवेदनकर्तो राजूभाऊ नाना डुकरे यांनी आपल्या लेखी तक्रारीतून केला आहे…तर सुरू असलेल्या अवैध धंदेवाईकावर / तस्करावर पंधरा दिवसात प्रशासने कारवाई न केल्यास प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण नागरीकांकडून तिव्र आंदोलन केले जाईल असा लेखी इशाराही तक्रारकर्त्याने प्रशासनाला दिला आहे….
एकंदरीतच सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर अंकुश लावण्यात येथील ठाणेदार सपशेल अपयशी ठरत असल्याची ओरड जनतेतून होत असून महसूलसह पोलीस प्रशासनावर होत असलेल्या गंभीर आरोपांतून महसूल व पोलीस प्रशासन बोध घेईल अथवा नाही..? हे न उलगडणारे कोडे असले तरी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचा वाढता आलेख येणा-या काळात पोलीस प्रशासनाची झोप उडवणाराच ठरू शकतो यात तीळमात्रही शंका नसल्याची बोलकी प्रतिक्रिया जनमाणसांतून व्यक्त होत आहे…..

