सामाजिक

“कॉपी-पेस्ट पत्रकारांचा सुळसुळाट; आता नेतेही पत्रकार ; पत्रकार फक्त पोस्टमन.?” ;’लेखणी हरवली, आता फक्त ‘फॉरवर्ड’चाच धंदा…!”

"व्हॉट्सॲप विद्यापीठातून नवनवीन नमुन्यांचा उदय; लेखणीपेक्षा फॉरवर्डवरच जास्त विश्वास..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

माहूर-किनवट तालुक्यात सध्या पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेला “कॉपी-पेस्ट उद्योग” दिवसेंदिवस फोफावत असून खऱ्या पत्रकारितेच्या छाताडावर बसून काही स्वयंघोषित पत्रकारच नव्हे तर विविध राजकीय पक्षातून आपली दुकानदारी चालवत असलेले स्वयंघोषित नेतेमंडळीही स्वत:च्या प्रसिद्धीसाठी स्वत:चा ‘उदो-उदो’ करणा-या बातम्या लिहून  कॉपीपेस्ट धारकांना पुरवत असल्याने ‘हरवलेली लेखणी’ आणि ‘कॉपीपेस्ट’ फॉरवर्ड चा धंदा हे समिकरण ठळक दिसून येत असल्याने आता नेतमंडळीही स्वत:च पत्रकार होवून आपली पाठ थोपटून घेत असल्याचे जळजळीत वास्तव दोन्ही तालुक्यातून दिसून येत आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणा-या पत्रकारीतेेेला किनवट व माहूर तालुक्यात अक्षरश: ग्रहण लागले असून या दोन्ही तालुक्यातील लेखणीधारक पत्रकारीता शेवटची घटीका मोजत असल्याची प्रत्यक्ष परिस्थिती आहे. विशेषत: पूर्वी पत्रकार बातमीसाठी धावपळ करायचा, माहिती गोळा करायचा, कागदपत्रे तपासायचा, संबंधितांना प्रश्न विचारायचा. मात्र आता परिस्थिती कमालीची बदलली असून बहुतांश पत्रकारांच्या मोबाईलमध्ये प्रामुख्याने “कॉपी” आणि “पेस्ट” ही दोनच ऑप्शन चालत असल्याची प्रचिती दैनंदिन स्वरूपात चकांना येत आहे. तथापि, पत्रकारीतेशी दुरान्वयेही संबंध नसलेले काही नमुने, तालुक्यात अक्षरश: पत्रकारीतेची ‘एैशी तैशी’ करताना दिसून येत असून एखाद्या घटनेसंदर्भात जीव तोडून बातमी तयार करणा-या पत्रकाराची बातमी स्वतःचे नाव लावून अनेकजन झळकवत आहेत. परिणामी बातमीतील अनेक चुकांंसह तीच बातमी अनेक वृत्तपत्रांतून जशास तशी छापून येत असल्याने ‘कॉपी पेस्ट’ धारक नमुन्यांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे..
विशेष म्हणजे बातमीतील मजकूर आणि शब्दप्रयोग समजने तर दूरच राहीले, एखाद्या बातमीत गावाचे नाव, व्यक्तीचे नाव किंवा विभाग चुकीचा असला तरी या महाभागांना काही फरक पडत नाही.. कारण त्यांनी बातमी वाचलेलीच नसते. त्यांचे काम फक्त “कॉपी-पेस्ट” आणि नंतर स्वतःला “वरिष्ठ पत्रकार” म्हणून मिरवणे एवढेच असते. त्यामुळे बातमी कोणी लिहिली हा प्रश्न गौण ठरला असून ती सर्वात आधी कोणी चोरली..? कोणी छापून आणली यालाच ख-या अर्थाने महत्त्व आहे. परिणामी पत्रकारितेच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बातमीतील अभ्यास, सत्यता, जबाबदारी, आचारसंहिता आणि जनहित यांच्याशी कवडीचाही  संबंध नसलेली ही मंडळी पत्रकार कमी आणि डिजिटल फॉरवर्ड एजंट जास्त झाल्याकारणाने खरी लेखणी चालवणारे पत्रकार बदनाम होत असून जनतेचा पत्रकारितेवरील विश्वास डळमळीत होत चालला असल्याचे कटू सत्य अनेक वाचक मंडळीकडून बोलल्या जात आहे. 
 एवढेच नव्हे तर वरील दोन्ही तालुक्यात सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडल्याचे दिसून येत असून ही क्रांती पत्रकारितेतील अभ्यास, तथ्य, पडताळणी किंवा जनहितासाठी नसून थेट “व्हॉट्सॲप विद्यापीठा”च्या अभ्यासक्रमातून व आयत्या बातम्या बनवून देणा-या काही मोबाईल अँप्लीकेशनच्या  साह्याने काही ‘फकाट व लुचाट’ नेतेमंडळीही स्वत:चा उदो उदो करण्यासाठी हातभर बातमी लिहून घेवून ती जशीच्या तशी ‘कॉपी पेस्ट’ विषयातून पदवीधर झालेल्या नमुन्यांना पाठवून स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेताना दिसत आहेत. यातून पत्रकारितेचे एक नवीन मॉडेल उदयास आल्याचे दिसून येत असून त्यात काही नेते, पदाधिकारी आणि स्वयंघोषित समाजसेवक स्वतःच स्वतःची बातमी लिहून  पत्रकारांना पाठवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तथापि, पूर्वी पत्रकार एखाद्या नेत्याच्या कार्याचा आढावा घेऊन बातमी लिहायचा. आता मात्र परिस्थिती उलटी झाली असून सध्या काही नेतेच स्वतःची स्तुती करणारी बातमी तयार करतात, स्वतःचे फोटो निवडतात, स्वतःच मथळा ठरवतात आणि नंतर पत्रकारांना फक्त “हे जसंच्या तसं टाका” अशा विनंत्या करताना दिसून येत आहेत.
“एकंदरीतच जागतिक स्तरावरील जगातील 180 देशांच्या यादीत भारतीय पत्रकारीतेची रँक 157 या एवढ्या खालच्या पातळीवर का आहे..? याचे प्रत्यक्ष उत्तर किनवट व माहूर तालुक्यातील ‘भंकस’ पत्रकारीतेवरून दिसून येत असून, स्थानिक पत्रकारितेतील आजची प्रत्यक्ष परिस्थिती पाहता पत्रकारितेचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पत्रकार व पत्रकारीतेचे भविष्य अबाधित ठेवण्यासाठी आता सरकार कडून कठोर व व्यापक कायदे करण्याची ख-या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली असून भारतीय लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या प्रतिष्ठेेेचा अक्षरश: कचरा करणा-या कॉपीपेस्ट व फॉरवर्डकार पत्रकारांना समाजाने आता ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर “पत्रकार” आणि पत्रकारीतेचे भविष्य जपायचे असेल तर पत्रकारीता क्षेत्रात व्यापक अभ्यासक्रमासह कठोर कायदे तसेच पत्रकार होण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रमासोबतच हवे असलेल्या इतर संबंधित माहितीसंदर्भातील महत्वपुर्ण परिक्षा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  अन्यथा सुरू असलेल्या ‘भंकस’, ‘निर्लज्ज’ व ‘चाटू’  पत्रकारीतेत यत्किंचितही सुधारणा होणार नसल्याचे ठाम मत जानकार व सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close