
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाढदिवस हा केवळ शुभेच्छा, केक आणि जल्लोषापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यास हातभार लावण्याचा स्तुत्य संकल्प जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महूर चे डायरेक्टर आदरणीय भवरे सर यांनी हाती घेतला असून “एक वाढदिवस… अनेक स्वप्नांना आधार..!” या संकल्पनेतून १ जून रोजी वाढदिवसानिमित्त विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे…
माहूर येथील या नामवंत शिक्षणसंस्थेत येत्या 1 जून रोजी होणा-या या विशेष उपक्रमांतर्गत नर्सरी ते बारावीपर्यंतच्या पाच विद्यार्थ्यांना नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार असून शिक्षणाची आवड व जिद्द असलेल्या मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व मजूर कुटुंबातील विद्यार्थी, अनाथ अथवा एकल पालक असलेले विद्यार्थी, ग्रामीण व गरजू पार्श्वभूमीतील विद्यार्थी तसेच फी भरण्यास असमर्थ पण गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. तथापि, या उपक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज दि. ३० व ३१ मे रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान जिनियस स्कूलमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेची टीम विद्यार्थी व पालकांची मुलाखत घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेईल व त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल असेेेही स्कूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे…

“विशेष म्हणजे आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने मोठी असली तरी आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रवास थांबतो. अशा परिस्थितीत वाढदिवसाचे औचित्य साधत शिक्षणदानाचा संकल्प राबविणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करणारा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





