राजकियईतर

लुचाटगीरीचा कळस..? किनवट – माहूर तालुक्यात लहानमोठ्या स्वयंघोषित नेत्यांचेही वाढदिवस वर्गणीतून..! ठेकेदार व कर्मचारी वर्गातून बोंबाबोंब….!!

"तगड्या वसुलीची चर्चा; अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून ठेकेदारांपर्यंत वर्गणीरूपी ‘शुभेच्छा’ देण्याची सक्ती..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

किनवट माहूर तालुक्याच्या राजकीय पटलावर आपले अस्तित्व दर्शविण्यासाठी कर्मचारी व लहानमोठ्या ठेकेदारांवर आपला धाक दबारा कायम रहावा या लुटारू मानसिकतेतुन दोन्ही तालुक्यात लहानमोठ्या स्वयंघोषित नेत्यांचेही वाढदिवस आता चक्क वर्गणीतून होवू लागल्याची खळबळजनक बाब समोर येत असून शासकीय कार्यालये व लहानमोठ्या गुत्तेदारांना वेठीस धरून तगड्या वसुलीची चर्चा तालुक्यातील विविध कार्यालयात रंगल्याने स्वत:च्या बडेजावपणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून ठेकेदारांपर्यंत ‘शुभेच्छा’ची सक्ती नेमकी कशाला..?  हा सवाल उपस्थित होत आहे… 

किनवट माहूर दोन्ही तालुक्यात सध्या विकासकामे व नेत्यांच्या कर्तुत्वापेक्षा स्वयंघोषित नेत्यांच्या वाढदिवसांचीच चर्चा अधिक रंगू लागली असून राजकारणात मोठी जबाबदारी नसली तरी वाढदिवस मात्र ‘मोठ्या नेत्यांसारखा’ साजरा करण्याची हौस काहींच्या चांगलीच अंगी रूजली आहे. त्यासाठी लागणारा खर्चही आता शुभेच्छुकांच्या खिशातूनच भागविला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान नेत्याचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उत्सव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मात्र ‘वर्गणीचा हंगाम’ ठरत असल्याची कुजबुज ऐकायला मिळत असून एखाद्या कार्यालयात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लागले की, त्यामागे किती ‘शुभेच्छा रक्कम’ जमा झाली, याचीच चर्चा सुरू होत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, ज्यांचा मतदारसंघ नाही, पक्षातील अधिकृत पद नाही, जनतेने निवडून दिलेले पद नाही आणि जनतेच्या प्रश्नांशी फारसा संबंधही नाही, अशा काही स्वयंघोषित नेत्यांनाही वाढदिवस साजरा करण्याचे व करवून घेण्याचे स्वप्न पडू लागले असून वाढदिवस साजरा करण्याचा जणू ‘हक्क’ असल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे. फरक मात्र एवढाच की, नेता स्वयंघोषित आणि वाढदिवस मात्र लोकवर्गणीतून..! हेच एकमेेव सत्य तालुक्याच्या राजकीय मैदानातून दिसून येत आहे.. तथापि, वाढदिवसाच्या निमित्ताने काही अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक आणि ठेकेदारांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची चर्चा रंगत असतानाच संबंधिक वर्गणीदार शुभेच्छूकाने वर्गणीरूपी शुभेच्छा’ न दिल्यास नाराजीचा संभाव्य धोका लक्षात घेवून वर्गणी देताना चेहऱ्यावर हास्य आणि मनात मात्र ‘ही वर्गणी…हप्ता की भविष्यातील गुंतवणूक.?’ असा यक्षप्रश्न अनेकांना पडत असल्याची कुजबूज छुप्या पद्धतीने सुरू असून कार्यालयीन कामांसाठी नेत्यांच्या संपर्कात राहावे लागणारे अधिकारी-कर्मचारी आणि शासकीय कामे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या संपर्कात असलेले ठेकेदार यांच्यावर विविध नेत्यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने अप्रत्यक्ष दबाव येतोय का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे…
 ★ बॅनर मोठे, पण नेतृत्वगुण व जनतेच्या मनातील स्थान किती..?
माहूर शहरासह किनवट  व माहूर तालुक्यातील विविध ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले की, संबंधित नेत्याची राजकीय ताकद किती..? यापेक्षा बॅनरवर नाव किती मोठे आणि फोटो किती मोठा, याचीच चर्चा अधिक होते. काहींच्या वाढदिवसासाठी शुभेच्छांचा पाऊस पडतो; मात्र त्या शुभेच्छांमागे प्रेम किती आणि ‘व्यवहार’ किती, याचा हिशेब ख-या अर्थाने जनतेलाच माहीत असून वाढदिवस साजरा करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक आनंदाचा विषय असला तरी वाढदिवसाच्या नावाखाली अधिकारी-कर्मचारी किंवा ठेकेदारांवर वर्गणीचा तगादा लावला जात असेल, तर तो निश्चितच गंभीर प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाढदिवस की ‘वार्षिक वसुली दिन’….? असा गमतीदार प्रश्न जनता जनार्दनाच्या दरबारात चवीने चर्चीला जात आहे… 
विशेषत: राजकारणात काम करण्यासाठी जनतेचा विश्वास, जनसेवा आणि प्रश्नांची जाण आवश्यक असते. मात्र काही मंडळींनी त्याला नवीनच स्वरूप दिल्याची चर्चा असून आमदारापासून ते ग्राम पंचायत सदस्यांपर्यंत व निवडून गेलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींपासून ते गुडघ्याला बांशिग बांधून निवडणूक तयारी करीत असलेल्या इच्छूकांपर्यंतच्या स्वयंघोषित नेत्यांनी आपल्या विश्वासू चेल्यांमार्फत वसूलीचा नवीन फंडा आता उदयास आणला असून  “नेत्याचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो; पण तालुक्यातील डझनभर नेत्यांच्या वाढदिवसाची वर्गणी किती वेळा द्यायची..?” आता एक उपरोधिक प्रश्नही विचारला जात आहे.. 
विशेष म्हणजे, सध्याच्या काळात देशाच्या राजकारणाप्रमाणेच किनवट माहूर या दोन्ही तालुक्यातही अशीच राजकीय परिस्थिती असून स्वच्छ राजकाणाची परिभाषा बदलून स्वार्थी, संधीसाधू व सेटींगव्यवस्थेचे राजकारण उदयास आले आहे. अशा परिस्थितीत विकासाच्या कितीही गप्पा मारून नेतेमंडळी ‘फ्लॅश’ मारत असली तरीही पुर्वाश्रमीचे पाप झाकण्याची जादुई किमया अद्यापही कोणत्याच नेत्याच्या आवाक्यात व औकातीत नसल्याने कोण नेता आणि किती इमानदार याची संपुर्ण गोळा-बेरीज जनतेच्या ‘स्पेशल डायरीत’ नोंद आहे..  किंबहूना नेता हा स्वत:चा चेलेचपाट्यांत कितीही मोठा ‘हिरो’ असला तरी विरोधकाच्या गोटात मात्र नेहेमी खलनायकच असतो. त्यामुळे कोणी कोणाकडून.?, किती.?, कशासाठी..? आणि कधी..? हे जास्तकाळ लपून राहू शकत नाही.. परिणामी नाव न सांगण्याच्या अटीवर एका शासकीय कर्मचा-यांच्या गटाने वरील खळबळजनक बाब उजागर केली असून प्रत्यक्ष माहितीचे संकलन करीत असताना सदरची माहीती प्राप्त झाली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ वर्गणी गोळा करावी यासाठीच जर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अथवा ठेकेदारांना अडचणीत आणण्याची भीती दाखवली जात असेल, तर संबंधितांनी पुराव्यासह तक्रार करण्याचे धाडस दाखवावे, असे नम्र आवाहन यानिमित्ताने आमचे माध्यम करीत आहे… शेवटी वाढदिवस साजरा करणे हा आनंदाचा विषय असला तरीही तो कुणाच्या खिशावरचा ‘कर’ बनू नये, एवढीच अपेक्षा..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close