क्राइम

आजारी मुलाच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज फेडले, तरी घरावरचा ताबा सोडत नसल्याप्ररकरणी न.पं. कर्मचा-यावर अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल… 

“माहूर पोलीस ठाण्यात FIR विरुद्ध FIR ची शर्यत ; अवघ्या साडेतीन तासांत प्रकरणाला नाट्यमय कलाटणी..!” .... “एक FIR घराच्या ताब्यासाठी, दुसरा FIR अब्रूच्या आरोपांसाठी...!”...... "एकाच दिवशी दोन परस्परविरोधी गुन्ह्यांनी माहूरमध्ये खळबळ ; दुसरी तक्रार बचावात्मक पलटवाराचा भाग असल्याचा संशय..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

   घराच्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादाला माहूरमध्ये अनपेक्षित वळण मिळाले असून, आजारी मुलाच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज फेडले तरी घरावर ताबा सोडत नसल्याप्रकरणी न.पं. कर्मचा-यावर अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माहूर पोलीस ठाण्यात अवघ्या साडेतीन तासात प्रकरणाला नाट्यमय कलाटणी देत FIR विरूद्ध FIR च्या शर्यतीत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने एक FIR घराच्या ताब्यासाठी, तर दुसरा FIR अब्रूच्या आरोपांसाठी.. असे एकाच दिवशी दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे…

★ [पहिला गुन्हा F.I.R. वेळ सायं. 07:32 वा.]
काल दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 07:32 वा. दाखल झालेल्या पहिला गु.र.नं. 0186/2026 मधील तक्रारदार महिला नंदा भिमराव पाईकराव वय 52 वर्षे रा. गणेशनगर माहूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यानी त्यांच्या आजारी मुलाच्या उपचारासाठी माहूर नगर पंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या गणेश अमरसिंग जाधव यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. तारण म्हणून काहीही नसल्याने पैसे परत करेपर्यंत नव्या घरातील दोन खोल्या तात्पुरत्या वापरासाठी देण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने नमूद केले आहे. दरम्यान तिच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दि. 29 एप्रिल 2026 रोजी व्याजासह एकूण 1 लाख 20 हजार रुपये परत केल्यानंतरही घराचा ताबा सोडण्यास संबंधित व्यक्तीने नकार दिल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे. पैसे परत केल्यानंतर तक्रारदार महिलेने घराचा ताबा सोडण्याची विनंती केली. मात्र, संबंधित व्यक्तीने घर खाली करण्यास नकार देत “माझे कोणीही वाकडे करू शकत नाही” अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता तक्रारदार व तिच्या भावाला लक्ष्य करून जातीय स्वरूपाची अत्यंत गंभीर व अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, पुन्हा रस्त्यावर दिसल्यास जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेवेळी दोन व्यक्तींनी वाद सोडविल्याचेही तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले आहे… विशेष म्हणजे तक्रारदार महिलेने हे घर रमाई आवास योजनेअंतर्गत मिळालेले असल्याचे FIR मध्ये नमूद केले आहे. पतीचे निधन झाले असून मुलाचाही मृत्यू झाल्याने आपण एकटी असून मजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी गणेश अमरसिंग जाधव रा. हिवळणी याच्यावर माहूर पोलीस ठाण्यात एका अनुसूचित जातीतील विधवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग महिलेचे घर बळकावण्याचा, जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ करण्याचा आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गंभीर आरोपांवरून BNS कलम 352, 351(1), 351(2), 296 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलमे 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(w)(ii) व 3(2)(va) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. 
★ [दुसरा गुन्हा F.I.R. वेळ रात्री 11:01 वा.]
    पहिल्या प्रकरणातील आरोपीच्या पत्नीने माहूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती गणेश अमरसिंग जाधव हे नगरपंचायत माहूर येथे स्वच्छतादूत म्हणून कार्यरत आहेत. दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान पती घराबाहेर असताना केशव भगत हा घरात घुसला आणि त्याने हात धरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर झटापट करत छातीला धरले, साडी ओढून बेअब्रू करण्याचा व नग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिची मुलगी धावत आली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने केस धरून खाली पाडले आणि गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, किंमत अंदाजे 3 लाख 60 हजार रुपये, तोडून पळून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जाताना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून गु.र.नं. 187/2026 अन्वये केशव गणपत भगत, रा. माहूर यांच्याविरुद्ध BNS कलम 74, 76, 115(2), 296, 119(1), 329, 352, 351(1) व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
★ एकाच दिवशी दोन FIR : योगायोग की नियोजित प्रतिप्रहार..?
     —– या दोन्ही प्रकरणांकडे आता केवळ दोन कुटुंबांतील साधा वाद म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नसून पहिला गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच संबंधित पक्षातील महिलेने दुसरी तक्रार दाखल करणे, हा घटनाक्रम निश्चितच तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. पहिल्या प्रकरणातील घराचा मालकी/ताबा, कर्जाची रक्कम परत केल्याचा दावा, संबंधित कागदपत्रे, प्रत्यक्ष साक्षीदार, फोन कॉल्स किंवा इतर उपलब्ध पुरावे यांची तपासणी जितकी आवश्यक आहे.. तितकीच दुसऱ्या प्रकरणातील कथित घरात प्रवेश, विनयभंगाचा आरोप, मुलगी घटनास्थळी आल्याचा दावा, सोन्याच्या गंठणाची कथित चोरी आणि धमकी याबाबतचे पुरावे तपासणेही महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, ‘FIR विरुद्ध FIR’ मुळे एका बाजूला दुर्बल महिलेच्या घराच्या ताब्याचा आणि जातीय अपमानाचा गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूला विनयभंग, मारहाण आणि लाखो रुपयांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याचा गंभीर आरोप.. अशा परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. दरम्यान दोन्ही गुन्हे एकाच दिवशी दाखल झाले असून दुसरा गुन्हा पहिल्या FIR नंतर अवघ्या काही तासांत नोंदविला गेला, ही बाबच या प्रकरणाची तपासाची दिशा अधिक संवेदनशील बनविते. आता पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य काय बाहेर येते..? कोणत्या तक्रारीमागे ठोस पुरावे आहेत..? कथित घटना प्रत्यक्षात घडल्या का आणि दुसरी तक्रार ही स्वतंत्र गुन्ह्याची नोंद आहे की पहिल्या प्रकरणाला उत्तर देण्यासाठी केलेला प्रतिप्रहार..? याचा उलगडा होणे अत्यंत आवश्यक असूून दोन्ही FIR दाखल झाल्याने त्यातील आरोप न्यायालयीनदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे तपासाअंती नेमके सत्य बाहेर येणे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई होणे हीच आता माहूरकरांची अपेक्षा आहे…
“विशेष म्हणजे पहिल्या प्रकरणात एका विधवा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलेने मुलाच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही रमाई आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घराचा ताबा सोडण्यास नकार दिल्याचा, तसेच जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यात BNS मधील कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील गंभीर कलमांचा समावेश आहे… अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या असहाय्य महिलेने घेतलेले कर्ज परत केल्यानंतरही तिच्या घराचा ताबा सोडला जात नसेल, तर हा प्रकार केवळ वैयक्तिक वाद न राहता एका निराधार, दिव्यांग व दुर्बल महिलेच्या मूलभूत हक्कांवरच घाला घालण्याचा प्रयत्न आहे का.?, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
….तर दुसऱ्या FIR मधील आरोप देखील अत्यंत गंभीर आहेत. मात्र त्याच वेळी त्याची वेळ, पहिल्या FIR शी जुळवलेला घटनाक्रम आणि संबंधित पक्षांमधील परस्पर संबंध तपासाच्या कसोटीवर तपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुसरी तक्रार ही स्वतंत्रपणे घडलेल्या घटनेची सत्य नोंद आहे..? की पहिल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केलेला बचावात्मक प्रतिप्रहार, याचा छडा पोलिसांच्या निष्पक्ष तपासातूनच लावणे अत्यंत गरजेचे असून या दुहेरी FIR मुळे माहूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तथापि, दोन्ही तक्रारींचा तपास पूर्वग्रह न ठेवता, स्वतंत्र पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे करणे गरजेचे असल्याचे मत कायदाप्रेमी मंडळींनी व्यक्त केले असून एकाच दिवशी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने माहूरच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close