सामाजिक
माहूरच्या जीवघेण्या रस्त्यांसाठी पत्रकारांचे प्रशासनाला निवेदन; २८ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा…
पत्रकारांनी प्रश्न हेरला; लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या ‘मोड’मध्ये...! जनतेच्या जीवितापेक्षा ‘न.पं...जिल्हा परिषद-पंचायत समिती’ची खुर्ची महत्त्वाची झाली का..? ; जनतेचा थेट सवाल..!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट निगडित असलेल्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वत:ला ‘बडे’ म्हणवून घेणारे बहुतांश नेते व स्थानिक लोकप्रतिनिधी स्वत:चे वाढदिवस व आगामी निवडणुकांकडे लक्ष ठेवुन असताना, पत्रकार बांधवांनीच प्रशासनाच्या दरवाजावर धडक देत रस्ते व वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून स्वत: पत्रकारांनी प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला असताना, स्थानिक राजकारणात स्वतःला जनतेचे तारणहार समजणारे आणि गुडघ्याला बाशिंग बांधून आगामी न.पं. सह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची ‘टक’ लाऊन वाट पाहणारे संधीसाधू नेते या प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहत आहेत, असा खोचक सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे…
आज दि. ८ रोजी माहूर तहसीलदारांकडे दिलेल्या लेखी निवेदनातून शहरातील विकासाच्या अनेक त्रुटी चव्हाट्यावर आल्या असून शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वरील ईदगाह ते ग्रामीण रुग्णालय या मार्गाचे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिक, वाहनचालक तसेच श्रीक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न.., टी-पॉईंट (दत्तनगर) ते ग्रामीण रुग्णालय या मार्गावरील दुभाजकाचे सुशोभीकरण, त्यावर शोभेची झाडे, संरक्षक जाळी व आवश्यक सौंदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रलंबित असलेले पेव्हर ब्लॉकचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यात माहूर करांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा ठरणारा प्रश्न म्हणजे पैनगंगा नदीवरील धानोड़ा–माहूर नवीन पूल वाहतुकीसाठी अद्याप सुरू झालेला नसल्याने नागरिकांना जीवघेण्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असून वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी पत्रकार अपिल बेलखोडे यांच्यासह राज ठाकूर यांनी तहसिलदार माहूर यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केेली आहे..
★ निवडणुकीपूर्वी जनतेचे ‘दर्शन’ घेण्याची तयारी ; प्रश्न मात्र दुर्लक्षित..!
*************************************
निवडणूक जवळ आली की गल्लीबोळातील प्रत्येक मतदाराचा चेहरा ओळखणारे, सुख-दुःखात सहभागी असल्याचे दाखवणारे आणि विकासाचे मोठमोठे आश्वासन देणारे अनेक राजकीय इच्छुक सध्या पक्षबदलासह आगामी न.पं. सह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे तिकीट आपल्याच पदरात कसे पाडता येईल यासाठी पक्षश्रेष्ठींची हुजरेगीरी करण्यात सक्रिय झाले आहेत. परंतू, ज्या प्रश्नांवर जनतेला रोजच्या रोज त्रास सहन करावा लागतो, त्या प्रश्नांसाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहण्याची वेळ असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून हीच मंडळी ‘×××× शेपूट गुंडाळून’ कुठे गायब होतात..? ही बाब सर्वश्रुत आहे. यामुळे माहूरकरांमध्ये आता एकच चर्चा रंगू लागली असून आगामी न.पं. निवडणूकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने “निवडणुकीच्या आधी मतदार शोधणारे नेते, मतदारांच्या समस्या शोधणार आहेत की नाही.. ?” या ज्वलंत प्रश्नाचे उत्तर आता जनतेसमोर द्यावे लागणार आहे…
विशेष म्हणजे पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात संबंधित विभागांना तातडीने आदेश देऊन आठ दिवसांत कामांना सुरुवात करण्याची मागणी केली असून शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ती पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून राष्ट्रीय महामार्ग १६१ ए, टी-पॉईंट दत्त चौक, माहूर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते..? याबरोबरच निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले ‘भावी लोकप्रतिनिधी’ या जनहिताच्या लढ्यात प्रत्यक्ष मैदानात उतरतात की शहरातील खांबा-खांबावर लावल्या जाणा-या केवळ प्रसिद्धीच्या बॅनरवरच दिसतात, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे. तथापि, हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही; प्रश्न आहे माहूरकरांच्या सुरक्षिततेचा..!, भाविकांच्या सुविधांचा आणि ‘विकासाच्या’ नावाने वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या आश्वासनांच्या विश्वासार्हतेचा…!!
★ नवरात्र जवळ आले, भाविक येणार; मग ‘जनसेवेचे’ चेहरे कुठे..?
“विशेष म्हणजे माहूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असून आगामी शारदीय नवरात्रोत्सवात हजारो भाविक माहूरला येणार असताना, शहरातील रस्ते, पथदिवे, दुभाजक आणि वाहतूक सुविधांची दुरवस्था कायम राहिल्यास त्याचा थेट परिणाम भाविकांच्या सुरक्षिततेवर आणि माहूरच्या प्रतिमेवर होणार आहे. त्यामुळे माहूर शहराची ‘आन-बान-शान’ असलेल्या ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर पत्रकारांना हा प्रश्न दिसतो; आणि प्रशासनाकडे निवेदन देण्याची वेळ येते.. ही खरी शोकांतिका असून जनतेच्या मतांवर निवडून येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या स्थानिक राजकीय इच्छुकांना हा प्रश्न दिसत नाही..? ‘जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर’ असे शहरातील खांबा-खांबावर फलक लावणाऱ्यांना त्याच खाबावरील बंद असलेल्या पथदिव्यांचा अंधार दिसत नाही का..? ‘विकासाची गंगा आणू’ म्हणणाऱ्यांना खड्ड्यांमधून वाहणारी माहूरकरांची वाहतूक दिसत नाही..?.. मागील अनेक वर्षांपासून शहराची लूट करून आजही सत्तेत असलेले ‘विद्यमान लोकप्रतिनिधी त्याचबरोबर आगामी काळात याचेच स्वप्न पाहणारे भावी नेते… तसेच “लग्नासाठी तयार असले तरी मुलगीच सापडत नाही, अशी पदाअभावी अवस्था झालेले स्वयंघोषित ‘रंडवे’ नेते आतातरी निवडणूक लागेल..! या अपेक्षेतून ‘चातकाप्रमाणे’ निवडणूकीची वाट पाहत आहेत. तर आजचे बेरोजगार परंतू, भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य’’ असल्याचा आव आणून मागील अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या स्वयंघोषित नेत्यांना आगामी नवरात्रात माहूरला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची चिंता नाही का..?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात असून ही बाब आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भावी लोकप्रतिनिधींसाठी पार करणे म्हणजे ‘मैलाचा दगड’ ठरणार हे जवळपास निश्चित माणले जात आहे…





