सामाजिक
बोथट लेखणीचे धनी, म्हणे मी पत्रकार..! ; “गरजेनुसार बातमी, सोयीनुसार मौन अन् स्वार्थानुसार पत्रकारिता..!”
"लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची लेखणी खुडलेली..!"

(संपादकीय)
(बाबाराव कंधारे)
– पत्रकारिता हा केवळ हातात माईक, गळ्यात ओळखपत्र आणि मोबाईलमध्ये कॅमेरा घेऊन फिरण्याचा व्यवसाय नसून पत्रकारिता म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची नैतिक जबाबदारी आणि सामान्यांच्या वेदनेला शब्द देण्याचे कर्तव्य.! बजावण्याची गरज असताना आजची पत्रकारीता मात्र बोथट लेखणीच्या धन्यांनी बाटली गेली असल्याचे जहाल सत्य गरजेनुसार बातमी, सोयीनुसार मौन अन् स्वार्थानुसार पत्रकारिता करणा-यांच्या बोथट लेखणीतून दिसून येत असल्याने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची लेखणी आज खुडलेल्या रूपात दिसून येत आहे..
पत्रकारीतेच्या क्षेत्रात जगात सर्वात दरिद्री व कामचलाऊ पत्रकारीता म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या भारतात काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास बहुतांश पत्रकारांच्या कार्यपद्धतीकडे पाहिले की, या पवित्र क्षेत्राची अवस्था चिंताजनक झाल्याचे जाणवते.
जिथे बातमीची गरज असते तिथे लेखणी मौन धारण करते.. आणि जिथे वैयक्तिक सोय, संबंध अथवा स्वार्थ असतो, तिथे अचानक पत्रकारितेचा आव आणला जातो.. अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रश्न केवळ एका पत्रकाराच्या प्रामाणिकपणाचा राहत नाही. तर तो संपूर्ण पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचा बनतो. तथापि, आजच्या युगात काहींची लेखणी इतकी बोथट झालेली आहे की, अन्याय डोळ्यांसमोर घडत असतानाही त्यांना तो दिसत नाही ; मात्र एखाद्या किरकोळ विषयात स्वतःचा फायदा दिसला की त्याच लेखणीला अचानक धार येते. हा योगायोग आहे की सोयीची पत्रकारिता..? बातमीही आता ‘गरजेनुसार’च..? एखाद्या घटनेत प्रशासनाची चूक असेल, सामान्य माणसावर अन्याय होत असेल, सार्वजनिक निधीचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा संशय असेल किंवा एखाद्याच्या हक्कांवर गदा येत असेल, तर पत्रकाराने निर्भिडपणे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. परंतू, काही मंडळी “आपला संबंध कोणाशी आहे..?”, “बातमी छापल्याने आपल्याला काय मिळणार..?”, “कोण नाराज होईल..?”, “उद्या आपले काम अडेल का..?” अशा गणितात अडकली असल्याने पत्रकारिता उरली तरी कुठे..? हा ज्वलंत प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे…
सत्याला बातमीचे रूप देण्याऐवजी सोयीला बातमीचे रूप देणे, ही पत्रकारिता नव्हे; तर ती केवळ वृत्तांकनाची नक्कल आहे…! अन्यायाविरुद्ध मौन म्हणजे तटस्थता नव्हे.! “आम्ही कोणाच्या बाजूने नाही” असे सांगून अन्यायाकडे पाठ फिरविणे सोपे आहे. परंतु पत्रकारितेतील तटस्थता म्हणजे सत्यापासून तटस्थ राहणे नव्हे… अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा यांना समान अंतरावर उभे करून “आम्ही तटस्थ” म्हणणे हा पत्रकारितेचा अर्थ नसून पत्रकाराने व्यक्तीची बाजू घेऊ नये, परंतू सत्याची बाजू नक्कीच घ्यावी. कारण एखाद्या अन्यायाची माहिती असूनही त्यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले गेले, तर त्या मौनामुळे अन्याय करणाऱ्याचे मनोबल वाढण्याची शक्यता असते… लेखणी विकली जाते तेव्हा लोकशाही कमकुवत होते.! पत्रकारिता ही कोणाच्या उपकाराची परतफेड करण्याचे साधन नाही. किंवा ती जाहिरात, वैयक्तिक संबंध, राजकीय जवळीक, आर्थिक हितसंबंध किंवा दबाव यांच्या बदल्यात वापरण्याची वस्तूही नाही… ज्याची लेखणी सत्य लिहिण्याआधी “कोण दुखावेल?” याचा विचार करते, त्याने स्वतःला पत्रकार म्हणण्यापूर्वी आपल्या अंतरात्म्याला निश्चितच एकदा प्रश्न विचारण्याची गरज आहे.. कारण पत्रकाराचे खरे बळ त्याच्या ओळखपत्रात नसून त्याच्या निर्भीड लेखणीत असावे. त्यामुळे आजच्या युगात आजच्या स्वयंघोषित व सोईची पत्रकारीता करणा-या पत्रकारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे…
विशेष म्हणजे, पत्रकारितेच्या नावाखाली केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, निवडक बातम्या उचलणे, एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे किंवा सोयीचे विषय प्रसिद्ध करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे…पत्रकारिता म्हणजे प्रश्न विचारणे.., पत्रकारिता म्हणजे सत्य शोधणे…,पत्रकारिता म्हणजे दबलेल्या आवाजाला व्यासपीठ देणे.., पत्रकारिता म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही आरसा दाखवणे.., पत्रकारिता म्हणजे स्वतःच्या सोयीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देणे.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पत्रकारिता म्हणजे ‘माजलेल्यांना मसाला..!’ त्यामुळे पत्रकारितेच्या नावावर मौन विकत घेणाऱ्यांपेक्षा, सत्यासाठी एकट्याने उभा राहणारा निर्भीड पत्रकार समाजासाठी हजारपट अधिक मौल्यवान असतो.. त्यामुळे “लेखणीला धार द्या..अन्यथा ईतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही..!” हे सोईच्या पत्रकारांनी जरूर लक्षात ठेवावे..





