ईतर
माहूर येथील निवासी शाळेत धक्कादायक घटना; तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनी गंभीर..
रॅलिंगवरून घसरल्याने डोक्याला गंभीर दुखापत; दुसरी विद्यार्थिनी विजेच्या धक्क्याने किरकोळ जखमी

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)
येथील पीएमश्री अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन विद्यार्थिनींसोबत अनुक्रमे घसरणे व विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. यामध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारी रितिका नुरसिंग राठोड (वय १३ वर्षे) ही तिसऱ्या मजल्याच्या रॅलिंगवरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. तर अंकिता विशाल वाढवे (वय १३ वर्षे) हिला विजेचा धक्का लागल्याने ती किरकोळ जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी निवासी शाळेच्या इमारतीत रितिका राठोड ही तिसऱ्या मजल्याच्या रॅलिंगवरून घसरून खाली पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर तिला तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुरे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी तिला यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात आले.
दरम्यान, याच शाळेतील सातवीच्या वर्गात शिकणारी अंकिता विशाल वाढवे हिला विजेचा धक्का लागल्याचीही घटना घडली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोन्ही घटनांमुळे निवासी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळेतील इमारत, रॅलिंग तसेच विद्युत व्यवस्थेची सुरक्षितता तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.





