राजकिय
“माहूर न.पं. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर ‘हंगामी नेत्यांचे’ पुनरागमन..!”
"निवडणुकीची चाहूल लागताच 'मुंंबईचा बाबू' पुन्हा अवतरल्याची धडाक्यात चर्चा"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
माहूर न.पं. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर ‘हंगामी नेत्यांचे’ पुन्हा पुनरागमन झाल्याची गोड बातमी जनतेला कळाली असून निवडणुकीची चाहूल लागताच ‘मुंंबईचा बाबू’ पुन्हा माहूर नगरीत अवतरल्याने “हंगामी नेत्यांच्या” दर्शनाचा हंगाम सुरू झाल्याची उपहासात्मक व बोलकी चर्चा शहराच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पुर्ण एक पीठ असलेल्या माहूर शहराची ओळख अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शहराचे प्रशासन म्हणून जबाबदारी असलेल्या माहूर नगर पंचायत प्रशासनात आपलीही ‘इंट्री’ व्हावी. ही भावना अनेक ‘कच्चे-पक्के’ नेते बाळगून असावेत यात तिळमात्रही शंका नाही. परंतु, चक्क पाच-पाच वर्षे जनतेच्या नजरेआड असलेले काही ‘राजकीय पक्षाचे स्वयंघोषित ‘बडे नेते’ आता अचानक हरकतीत आले असून तेच अचानक गावच्या गल्लीबोळात दिसू लागल्याने, “बहुतेक निवडणूक जवळ आली की काय..? असा उपरोधात्मक सवाल उपस्थित करताना रंजक चर्चा सध्या माहूर शहरवासीयांकडून केली जात आहे.
विशेषत: “निवडणुक ते निवडणूक” याप्रमाणे ‘माहूर – ते मुंबई’ व ‘मुंबई ते माहूर’ असे कायम व कन्फर्म तिकीट खिशात असलेले व निवडणुकीशिवाय दर्शन न देणारे म्हणजेच फक्त निवडणुकीच्या वेळी हमखास जनतेसमोर येणारे एक राजकीय महाशय अचानक जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी तयारीला लागले असून आता यापुढे शहरातील प्रत्येकाच्या सुख-दु:खात माहूर न.पं. च्या येणा-या निवडणुकीपर्यंत हमखास सहभागी होणार असल्याचा चंग बंधल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांकडून मिळालेली आहे. तथापि, अगदी कालपर्यंत साधा मोबाईलवरही उपलब्ध नसलेला व ‘मुक्काम पोस्ट मुंबई’ चा पत्ता सांगणारा ‘मुंबईचा बाबू’ आता सोशल मिडीयावर प्रचारात आघाडी घेण्याच्या तयारीत असल्याचे माहूर शहराच्या प्रत्येक चौकात, प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक सेल्फीतच नव्हे तर चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत बोलले जात असून त्याबाबतची अनेक रंजक चर्चा सुरू आहे. तथापि, या नेत्याची ‘इंट्री’ का झाली असावी..? याबाबत अनेक उपहासात्मक चर्चा आजमितीस शहरात चर्चील्या जात असून या हंगामी नेत्यांचे नेमके “जनतेवर प्रेम वाढलंय मतदानावर..?” याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत… तर ऐन “पावसाळ्यात बेडूक आणि निवडणुकीत हंगामी नेते अशी काहीशी परिस्थिती असल्याचे मतही काही विद्रोही जाणकार मंडळी बोलून दाखवत आहेत..

“विशेष म्हणजे “काम कमी, फोटो जास्त” अशी ख्याती असलेल्या या मुंबईच्या बाबूचे कौतुक करावे तेवढे कमीच असून, वेळ व परिस्थितीचा इत्तंभुत लाभ उठवण्यात याचा हातखंडा आहे. दरम्यान एका खासदाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘गुणवंत विद्यार्थ्यांच्या “गुणगौरव” करण्याचा खटाटोप व नंतर चुकीचे प्रमाणपत्र परत घेवून जाऊन ‘ते’ पमाणपत्र कधीही परत आणून न देण्याचा याच “बाबू” चा प्रपंचही सर्वश्रूत आहे. एवढेच नव्हे तर याच मुंबईच्या बाबूच्या नेतृत्वाखाली माहूर न. पं. च्या मागील पंचवार्षिक निवडणूकीत 17 जागांवर उमेदवार उभे केल्यानंतर 1 जागा जिंकणे…ते ही विजयी उमेदवाराच्या स्व- कष्टाच्या बळावर…! हे अफाट यश देखील पक्ष व पक्ष कार्यकर्ते अद्यापही आठवण ठेवूनच आहेत.. परिणामी अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असलेल्या मेहनती व एकनिष्ट कार्यकर्त्यांना डावलून न.पं. च्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ‘मुंबईच्या बाबू’ चे काहीएक चालणार नसल्याचे स्पष्ट व ठाम मत पक्षातील जानकार मंडळीकडून व्यक्त होत असून ऐन निवडणूकीच्या तोंडावर ‘मुंबईचा बाबू’ येवून ग्राऊंड लेवल च्या मेहनती व कार्यक्षम कार्यकर्त्यांना मागे टाकून तिकीट वाटपाच्या स्पर्धेत यावेळी टिकणारच नाही….असे ठामपणे नाव न सांगण्याच्या अटीवर पक्षजानकार मंडळींनी आमच्या वृत्तवाहीनीजवळ बोलून दाखवले असून शेवटी ‘मुंबईचा बाबू कामापुरताच..!’ अशी उपरोधात्मक खिल्ली पक्षजाणकार मंडळींकडून उडवली जात आहे…





