राजकियसामाजिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी “जर-तर” च्या ‘सस्पेंस’ ने अनेक इच्छूकांचे देव पाण्यात…!

"पक्षाचे तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी जिवाचा आटापिटा ;  जातीय  समिकरणाचा 'पत्ता' चालणार नसल्याचा मतदारांतून सूर.......!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

    आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांंचा लवकरच बिगूल वाजणार याची चाहूल लागल्याने अनेक दिग्दजांसह नवखे व हावशेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आपले नशिब आजमावण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत असून अनेक जण पक्षाचे तिकीट आपलेच या अविर्भावात वावरत असले तरी जनतेचा कौल, जातीय समिकरणाचा मेळ आणि पैशाचा खेळ यांचा सुरेख मेळ ज्या उमेदवाराकडे असेल तोच उमेदवार पक्षाच्या तिकाटावर निवडणूक लढवण्यास पात्र असल्याचे संकेत जाणकार मंडळींकडून दिले जात असल्याने पक्षाकडून तिकीट मागणा-या अनेक भावी उमेदवारांचे देव सध्यातरी पाण्यातच असल्याचे बोलले जात आहे…

 मागील अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची चाहूल लागली. त्यामुळे निवडणूक होत नाही म्हणून अगदी करपून गेलेल्या भावी उमेदवारांनाही आशेचे अंकूर फुटले. एवढेच नव्हे तर कधी कुणाच्या ‘माती’ लाही न जाणारी मंडळी आजमितीस कुणी आजारी पडलंय का..?  याचा अंदाज घेवून थेट दारी पोहचून विचारपुस करत आहे. कुणी जिल्हा परिषद तर कुणी पंचायत समितीसाठी इच्छूक असून सर्व हावशे, गवशे व नवश्या उमेदवारांचे राजकीय पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ‘दिव्यस्वप्न’ आहे. त्यामुळे “पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार…. !” या आशयाच्या उत्साही बातम्या तसेच अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरताना दिसत आहेत..  
विशेष म्हणजे ठेकेदार, गुटखा माफीया, रेती वाहतुकदार, अवैध दारू विक्रेते तसेच विशेषत: स्वार्थाचे राजकारण हाच मुख्य व्यवसाय असल्याने ऐनवेळी पक्षबदल करून फॉर्मात आलेली काही अतिउत्साही मंडळी संबंधित पक्षाचे तिकीट कन्फर्म असल्याचा “आव” आणत असून पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी अक्षरश: जिवाचा आटापिटा करताना दिसून येत आहे. तथापि, अशा अतिउत्साही भावी उमेदवारांनी कितीही जिवाचा आटापिटा केला तरीही जातीय समिकरणाचा मेळ आणि पैशाचा खेळ याची रंगीत तालीम जो पक्षश्रेष्ठींसमोर दाखवेल त्यालाच प्राधान्य दिले जाणार हेच अंतिम सत्य असले तरीही विविध राजकीय पक्षात वर्षानुवर्षांपासून एकनिष्ट राहून स्वत:ची ‘घासून’ घेणारे एकनिष्ट कार्यकर्ते आयत्या वेळी इतर पक्षातून  इनकमिंग झालेल्या उमेदवारांना स्विकारतील काय..? हा सध्या कळीचा मुद्दा सर्वसामान्यांत चर्चिला जात असून स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षवा-या करून आयत्या वेळी मानगुटावर बसलेल्यांंना पक्षाने स्विकारले तरीही कार्यकर्ते मात्र कधीच स्विकारणार नसल्याचा दावा काही जाणकार मंडळींनी केला आहे..
एकंदरीतच समाजमाध्यमांवरील फिरणा-या पोस्ट व सर्वांसाठी सारखीच या भावनेतून प्रेरीत बातम्यांमधून ‘त्या’ जि.प. किंवा पं.स. भावी उमेदवाराची अफलातून प्रशंसा करून त्यांच्या कार्याची पावती दिली जात आहे. जणू  त्यानेच पक्ष निर्माण केला आहे. किंबहूंना पक्ष स्थापनेसह पक्षवाढीसाठी त्याने अतोनात कष्ट घेतले असावेत. याउपरही अतिरेक म्हणजे गळ्यात ‘प्रेस आय-डी’ कार्ड अडकवून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पत्रकार असल्याचा आव आणून त्याच भावी उमेदवाराच्या मागे पुढे गोंडा घोळणारे काही पिडीएफ् व यु-ट्युब धारक तसेच नॅशनल चॅनल म्हणून व्हिडीओ बनवून बड्या बाता मारणारे यु ट्युबच्या दुनियेतील स्वयंघोषित पत्रकार देखील जिवाचा आटापिटा करून अक्षरश: गळा कोरडा होईपर्यंत ‘त्या’ भावी उमेदवारांना मोबाईल मधून प्रसिद्धी देत आहेत… एकंदरीतच या संपुर्ण प्रकारात अनेक दिग्गजांसह अनेक नवखे इच्छित पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेवून आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत असले तरी इच्छूकांची ‘इच्छपुर्ती होणार का भ्रमनिरास’ हे मात्र प्रत्यक्ष तिकीट वाटपानंतरच कळणार असल्याने सध्यातरी अनेकांचे देव पाण्यात असल्याचे सांगण्यात येेत आहे.
 ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे’ या उक्तीशी तंतोतत जुळणारे अनेक संधिसाधू या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असून मागील काही वर्षांपासून घडलेल्या स्थानिक राजकारणातील राजकीय घडामोडींतून अक्षरश: ‘राजकीय आत्महत्या’ केलेली मंडळी आता हातातले झेंडे बदलून नव्या भुमिकेत दिसून येणार आहेत. परंतू कपडे बदलले तरीही कला मात्र “तिच” ही जनतेला खात्री असून हे ‘राजकीय नट’ मतदारांना आपल्या अभिनयातून खिळवतात का पळवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच राजकीय पुढा-यांच्या स्वार्थीपणामुळे आजमितीस तालुक्यातील कोणत्याही दिग्गज नेत्याच्या ‘खिशात’ स्वत:ची “मुद्दल” (स्वत:च्या समाजाची मते) देखील नसून केवळ “व्याजाच्या” (इतर समाज)  भरवशावर निवडणूकीत बाजी मारण्याचे दिव्यस्वप्न बाळगून असलेल्या नेत्यांना यावेळी जनता आणि नेत्यांच्या मागे लागून कोर्टाच्या वा-या करणारे कार्यकर्तेच इंगा दाखवणार असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close