
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झोपलेल्या निष्पाप ऑपरेटरचा मातीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना माहूर तालुक्यातील जुनापाणी नजीकच्या एका कंस्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेत निष्पाप मजूर ऑपरेटरचा बळी गेल्याने हा प्रकार घात की अपघात याबाबतच्या चर्चेला पेव फुटले आहे….


माहूर तालुक्यातील मौजे जुनापाणी नजीक असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या साईटवरील सदरची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान कंस्ट्रक्शन साईटवर कार्यरत इतर मजूरांकडून प्राप्त झालेल्या व प्रत्यक्ष सांगितल्याप्रमाणे झारखंड राज्यातील मौजे जोंगी ता. चंदवारा जि. कोंडरमा येथील अजीत यादव वय 35 वर्षे हा येथील कंस्ट्रक्शन साईटवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. तथापि, मागील 10 दिवसांपासून या साईटवर लाईटची व्यवस्था करणारे जनरेटर कंपनीने ‘डिझल’ वाचविण्यासाठी बंद केले आहे. त्यामुळे शेकडोजण मजूर असलेल्या या साईटवर ऐन माळरानात प्रचंड उष्णतेेेने व्याकूळ होताना रात्रीच्या वेळी लाईटअभावी पंखे नसल्याने परिसरात सैरावैरा व जिथे जागा दिसेल तिथे झोपत असल्याचे धक्कादायक वास्तव मजूरांनी सांगितले आहे. याचदरम्यान काल दि. १ मे रोजी रात्री अंदाजे 9 वा. च्या दरम्यान अजीत यादव आपले अंथरून पांघरून घेवून परिसरात मोकळ्या हवेत झोपायला गेला होता. त्यावेळी तो त्याच परिसरातील मोकळ्या जागेत जाऊन झोपला. परंतू रात्रीच्या वेळी इतर ठिकाणावरून मातीने भरून आणलेले एक टिप्पर नेमके त्याच ठिकाणी अजीतच्या अंगावर खाली केले गेल्याने अजीत त्याच मातीच्या ढिगा-याखाली दबला. परंतू, त्यावेळी ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही हे विशेष..!
दरम्यान आज दि. २ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास रिचवलेले मातीचे ढिग जेसीबी द्वारे दुस-या टिप्परमध्ये भरताना सुरूवातीला अजीतचे पाय उघडे पडल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात वा-यासारखी घटना पसरल्याने माहूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून मयताला माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले असून वृत्त लिहीपर्यंत मयताचे रक्ताचे नातेवाईक येण्यास वेळ लागत असल्याने मयताची शवविच्छेदन प्रक्रिया पार पडण्यासाठी विलंब लागत असून पोलीसांत याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने अधिकची अधिकृत माहीती प्राप्त होवू शकली नाही. तर मृत्यूचे खरे कारण देखील शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असले तरीही प्राथमिक व प्रत्यक्षदर्शी परिस्थितीवरून मोठ्या प्रमाणात घात की अपघात याबाबत संशयकल्लोळ माजला आहे…
“विशेष म्हणजे सदरची घटना व त्यास कारणीभुत असलेली माती… ही माती इतरत्र ठिकाणाहून साईटवर नेमकी कशासाठी आणून टाकली जात होती..? जर रस्ता निर्मितीच्या कामासाठी आणली जात असेल तर मग तीच माती कंस्ट्रक्शन साईटवर आणून टाकणे व त्यानंतर ती उचलून पुन्हा दुसरीकडे नेऊन टाकणे हे कशासाठी..? जर सदरची माती रस्तानिर्मितीच्या कामासाठीच रिचवली जात असेल तर ती थेट रस्त्यावर कामाच्या ठिकाणीच का टाकली गेली नाही..? अशाप्रकारची रिकामी कामे करण्याचा कंपनीचा उपद्व्याप नेमका कशासाठी..? रात्रीला मातीची वाहतुक करणे म्हणजे माती चोरीची आहे का..? रस्ता पुनरनिर्माणाच्या कामात मुरमाऐवजी मातीचा वापर का..? किंबहूंना मुरूमाऐवजी मातीचा वापर करणे हा कंस्ट्रक्शन कंपनीचे ‘भिकारचोट’ धोरण नाही का..? यासह अशा विविध प्रश्नांना आता पेव फुटले असले तरीही हजारो-लाखो कोटींची कामे हस्तगत करून केवळ मजूरांच्या मेहनतीवर गब्बर झालेल्या या कंस्ट्रक्शन कपनीकडून केवळ डिझल वाचवण्यासाठी जनरेटर बंद करणे अन् त्याच कारणाने एका निष्पाप मजूरांचा बळी जाणे…ही बाब प्रत्यक्षदर्शींना चांगलीच खटकत असून याप्रकरणी “कुछ तो गडबड है” ची शंका उपस्थित केली जात आहे..





