माहूर नगर पंचायतीच्या कथित 2.07 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी माहूर पोलीसांत अखेर गुन्हा दाखल..?
"तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात ; प्रकरण अनेकांना शेकणार..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर नगर पंचायतीतील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेच्या निधी गैरव्यवहार प्रकरणाला अखेर गुन्हेगारी स्वरूप प्राप्त झाले असून तब्बल 2 कोटी 7 लाख 1 हजार 724 रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर गुन्हा नोंद झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे…
प्राप्त माहितीनुसार, गु.र.नं. 112/2026 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420 व 34 अंतर्गत दि. 24 जून 2026 रोजी रात्री 10.36 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश विष्णू चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दक्षता व सुरक्षा विभाग, म्हाडा, मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 07 सप्टेंबर 2018 ते 09 ऑगस्ट 2021 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी त्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी तो इतर खात्यांवर अनियमितपणे वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये तब्बल 2.07 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घरकुलासाठी शासनाने दिलेला निधी हा गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर उभे करण्यासाठी असतो. मात्र, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचा निधीच दुसरीकडे वळविण्यात आल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अनेक लाभार्थी वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असताना निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सदर प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून तपासादरम्यान आणखी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर पंचायतीतील तत्कालीन आर्थिक व्यवहार, बँक खाती, निधी वितरणाची प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरी यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
“विशेष म्हणजे “घरकुलासाठी आलेला पैसा नेमका गेला कुठे..?”, “लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी का मिळाला नाही..?”, “या प्रकरणातील खरे सूत्रधार कोण..?” अशा प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार असून मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.





