क्राइम
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने लखमापूर हादरले ; गणेश मंडळांवर गुन्हे दाखल.. डी जे चा नाद भोवला..?
'पाच मंडळांकडून डीजेचा वापर ; चार आयचर वाहनांसह १ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात...

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रतिबंधित डॉल्बी-डीजे सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी गणेश मंडळांसह संबंधित नागरिकांवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करत चार आयचर वाहनांसह डीजे सिस्टीम असा तब्बल १ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी लखमापूर बीट अंतर्गत लांजी, शेकापूर व लखमापूर आदी गावांमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लखमापूर येथील विसर्जन मिरवणुकीत एकूण पाच गणेश मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी दोन मंडळांकडे परवाना असल्याचे, तर तीन मंडळांकडे परवाना नसल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
महाराणी गणेश मंडळ आणि साई श्रद्धा गणेश मंडळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच मोठ्या कर्कश आवाजात मिरवणूक काढून नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने ध्वनिक्षेपण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय पोलिसांनी दिलेल्या लेखी व तोंडी सूचनांकडे दुर्लक्ष करून विसर्जन मिरवणूक निर्धारित वेळेत न संपवता विनाकारण रेंगाळत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, गराशा, भाया आणि कन्हैया गणेश मंडळांनी परवानगी नसतानाही गणेशमूर्तीची स्थापना केल्याचा, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव जमवत विसर्जन मिरवणूक काढल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

★ [ चार आयचर वाहनांसह डीजे जप्त]कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील चार आयचर वाहनांसह त्यावरील डॉल्बी सिस्टीम ताब्यात घेतल्या आहेत…★ MH 12 MV 2631 — आयचर वाहन व डॉल्बी सिस्टीम : अंदाजे ₹३२ लाख,★ MH 04 HD 4841 — आयचर वाहन व डॉल्बी सिस्टीम : अंदाजे ₹३४ लाख,★ MH 04 EY 5147 — आयचर वाहन व डॉल्बी सिस्टीम : अंदाजे ₹३५ लाख,★ MH 14 LX 2572 — आयचर वाहन व डॉल्बी सिस्टीम : अंदाजे ₹३६ लाख,असा एकूण ₹१ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, गराशा गणेश मंडळाचे डॉल्बी सिस्टीम लावलेले MH 04 EL 5875 क्रमांकाचे टेम्पो वाहन मिरवणुकीतून निघून गेल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लखमापूर बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पुंडलिकराव गोपनवाड यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य तसेच सहकार्य करणाऱ्या इतर नागरिकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके व पोलीस पथक करीत आहे…





