नोकरी संदर्भईतर

तहसीलच्या आवारातून गायब झालेले ‘ते’ टिप्पर पुन्हा तहसीलच्या आवारात अवतरले….

"मोठी 'सेटींग' करून टिप्पर रातोरात पळवल्याची चर्चा... सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे फुटले होते बिंग....

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

माहूर/प्रतिनिधी
माहूरचे तहसीलदार व त्यांच्या अधिनिस्त पथकाकडून वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी एक टिप्पर व एक ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन्ही वाहने अनाधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणी दंडाची रक्कम भरून न घेता खाजगीत तडजोड करून सोडून देण्यात आल्याची चर्चा होती. याप्रकरणी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर सोडून देण्यात आलेले वाहन आज पुन्हा अचानक तहसील कार्यालयात अवतरल्याने विविध चर्चाना उधान आले आहे…

 

 

     माहूर तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभार अनेक वेळा उघडकीस आल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून परिणामकारक कारवाई होत नसल्याने माहूरचे तहसील कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात तहसीलदार व त्यांच्या पथकाने टाकळी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी एम.एच.२८ बी.ए.३३०१ क्रमांकाचे टिप्पर वाहन जप्त केले होते, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हरडप शिवारातून एम.एच.२६ व्ही.८८१६ क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. दंडाची रक्कम भरून घेतल्यानंतर अशी वाहने सोडण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी देतात. परंतु असे न होता निवडणुकीच्या धामधुमीत दोन्ही वाहने तहसील कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रात्रीचे अंधारात सोडून देण्यात आली होती.

 

     या घटनेची माहिती किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना समजल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तहसील कार्यालयाच्या आवारात येऊन जप्त केलेल्या वाहनाची पाहणी केली व त्यामध्ये एक टिप्पर व एक ट्रॅक्टर कमी असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याप्रकरणी तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली,नोटीस चा खुलासा सादर होण्याआधीच दोन वाहनांपैकी एक टिप्पर आज दिनांक १४ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आल्याचे दिसून आले. आधी जप्त करून दंडाची रक्कम भरून न घेता खाजगीत तडजोडी करून सोडून देण्यात आलेले वाहन कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पुन्हा तहसीलच्या आवारात लावण्यात आल्याने निश्चितच या प्रकरणात मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा आहे.एकंदरीत माहूर तहसील कार्यालयात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींवर जिल्हा प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे पडदा टाकण्यात येतो,की कारवाईचा बडगा उगारण्यात येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.

 

 

◼️माहूर तहसील कार्यालयातील अनाधिकृत गौण खनिज (वाळू) जप्त वाहन प्रकरणी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दिनांक ४ मे रोजी माहूरचे तहसीलदार किशोर यादव व माहूर आणि वाईबाजार मंडळाचे मंडळ अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तर दंडाची रक्कम भरून न घेता ताब्यातील वाहन सोडल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १३ मे रोजी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे.

 

◼️तहसील कार्यालयात जप्त असलेले वाहन सोडून दिल्यानंतर पुन्हा ते वाहन आणून लावल्यानंतर नेमकं हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या वार्ताहराने माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही,व तसेच चौकशी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या सुट्टीवर असल्याचे समजले….

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close