ईतर
शारदा कंन्स्ट्रक्शनच्या ‘हायवा’ मुळे ‘रूई-केरोळी’ रस्त्याचे वाजले बारा ; अपघाताचे प्रमाणही वाढले…
"मुरूम वाहतुकीची परवानगी देवू नये यासाठी आठ गावच्या सरपंचांचे तहसीलदारांना लेखी निवेदन..."


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
रस्त्यांच्या कामात बोगसगीरी करण्यात प्रसिद्ध असलेल्या शारदा कंन्स्ट्रक्शनच्या ‘हायवा’ मुळे ‘रूई-केरोळी’ रस्त्याचे पार बारा वाजले असून फुटलेल्या रस्त्याने ये-जा करताना अपघाताच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभुमिवर परिसरातील तब्बल आठ गावच्या सरपंचांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देवून केरोळी रस्त्यावरून मुरूम वाहतुकीची परवानगी न देण्याची मागणी केली आहे. सोबतच खराब केलेला रस्ता पुन्हा नव्याने बनऊन देण्याचीही मागणी केली आहे…
माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली शारदा कंट्रक्शन कंपनीकडून कामात कसूर करण्याबरोबरच भाविक व नागरीकांना त्रास देण्याचा जणू विडाच उचलल्याचे दिसून येत असून पैनगंगा नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने मुरूमाचा भराव टाकून रस्ता बनविण्याच्या निमित्ताने माहूर तालुक्यातील मौजे रुई येथील सर्वे नं. 57 मधून गेल्या महिन्यात आठ दिवस परवानगी घेऊन मोठ्या हायवा द्वारे रात्रंदिवस मुरूमाची वाहतूक करून रस्त्याच्या अक्षरश: चिंधड्या उडविण्यात आल्याचा आरोप निवेदनकर्ते सरपंचांनी लेखी निवेदनात केला आहे… तर याच शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला पुन्हा आठ दिवसाची परवानगी देण्यात आल्याने प्रचंड वजनदार हायवाच्या नियमित व बेहिशोबी येण्याजाण्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अपघाताच्या घटनांतही प्रचंड वाढ झाल्याचे नागरीकांचे म्हणने आहे.. त्यामुळे या प्रकारास वैतागून माहूर तालुक्यातील मैजे रुई, हडसणी, दिघडी कु., हिंगणी, ईवळेश्वर, तांदळा व गुंडवळ या गावातील सरपंचांच्या वतीने माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी यांच्यासह पत्रकार राज ठाकूर यांनी निवेदन देऊन सदरील रस्त्यावरून हायवा द्वारे मुरूम वाहतुकीची परवानगी देऊ नये. तसेच रस्ता दुबार बनवून द्यावा. अन्यथा पुन्हा परवानगी दिल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा तहसीलदार अभिजीत जगताप यांना काल दि. 3 रोजी निवेदनाद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे…
“विशेष म्हणजे शारदा कंट्रक्शन कडून अनेक वर्षापासून धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामात अनेक गैरप्रकार झाल्याने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शेकडो तक्रारी झालेल्या आहेत.. तर माहूर शहरातील पथदिवे, पेव्हरब्लॉक तसेच रस्ता रुंदीकरणात मापात पाप केल्याने कंपनीला माहूर तालुक्यात कामे देऊ नये अशी मागणी देखील होत आहे. अशात धनोडा केरोळीच्या मध्ये असलेल्या पैनगंगा नदीवर पूल दुसऱ्या कंपनीने पूर्ण केला परंतु गेल्या दोन वर्षापासून दोन्ही बाजूचे अर्धा अर्धा किमीचे रस्ते बनविले नसल्याने वरिष्ठाकडून दबाव आल्यानंतर मनमानी पद्धतीने काम सुरू करण्यात आले.. यासाठी जवळपास 50 हजार ब्रास मुरूम लागणार असल्याने तवढ्या ब्रास मुरमाची रॉयल्टी भरणे या कंपनीला अत्यावश्यक होते. परंतू, केवळ दोन वेळ पाचशे ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून जवळपास 25 हजार ब्रास मुरूमाची वाहतुक करण्यात आली. एवढेच नव्हे तर वाहतुकीचा मुरूम पुलाच्या कामावर न वापरता बंधाऱ्याच्या कामावर वापरल्या गेल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी भराव टाकण्याचे काम अद्यापही ‘जैसे थे’ च आहे.. परिणामी कंत्राटदाराचा शासनाची फसवणूक करून वाहनधारकांसह भाविकांना त्रास देण्याचा उद्देश स्पष्ट दिसत असल्याने कंत्राटदाराविरुद्ध प्रचंड असंतोष वाढत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे…
ृ“पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला तसेच माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सदरील कंपनीकडून अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तात्काळ पुलाचे काम करून घ्यावे व त्यांनी भरलेल्या रॉयल्टी पेक्षा जास्तीचा मुरूम नेला असल्यास त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्यमार्ग प्राधिकरणाला तंबी देत फुटलेला रुई ते केरोळी रस्ता दुबार बनवून घेत कंपनीला काळ्या यादी टाकावे अशी मागणी नागरिकांतून होत असून सरपंचांनी निवेदन दिल्याने या मागणीला दुजोरा मिळत आहे…..










