ईतर
गुंडवळ येथे दलितवस्ती विकास निधीचा गैरवापर प्रकरणी कारवाईची मागणी…
'कार्यवाही न झाल्यास उपसरपंचासह ग्रामस्थांचा पं.स. समोर आमरण उपोषणाचा इशारा..'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील दलितवस्ती विकास निधीचा गैरवापर प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करताना संबंधितांवर कारवाई न झाल्यास येत्या 10 मार्च पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा लेखी इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी माहूर यांना दिला आहे..
पंचायत समिती माहूर यांना दि. २ मार्च रोजी दिलेल्या लेखी निवेदनानुसार मौजे गुंडवळ ता. माहूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना (सन २०२२-२३) अंतर्गत दलित वस्तीच्या राखीव निधीचा जाणीवपूर्वक गैरवापर करून अपूर्ण व निकृष्ट समाजमंदिर बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याबाबतची मागणी लेखी निवेदनातून करण्यात आली आहे…
दिलेल्या निवेदनातून मौजे गुंडवळ येथे वरील योजनेतून समाज मंदिर बांधकामासाठी शासनाकडून २० लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी हा केवळ आणि केवळ अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आणि दलित वस्तीच्या विकासासाठी राखीव असतो. या निधीचा विनियोग अत्यंत पारदर्शकपणे व विहित नियमांनुसार होणे बंधनकारक
असताना, या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर तसेच संगनमताने अपहार झाल्याची गंभीर बाब पुराव्यानिशी समोर आली असून संबंधित ठेकेदाराने समाज मंदिराचे काम थातूरमातूर, निकृष्ट व धोकादायक पद्धतीने केले असल्याचा आरोप केला आहे. तथापि, सदरचे अर्धवट बांधकाम कधीही कोसळण्याची दाट शक्यता असून या गंभीर त्रुटींबाबत ग्रामपंचायत कार्यालय, गुंडवळ यांनी वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयाला लेखी तक्रार करून निदर्शनास आणून दिले होते. परंतू, सदरील प्रकरणी पंचायत समिती कार्यालयाकडून दखल न घेतली नसल्याचे धक्कादायक वास्तव निवेदनातून उघड केले आहे….
“विशेष म्हणजे माहूर पंचायत समितीचे तात्कालीन शाखा अभियंता ‘रोडगे’ यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करतााना अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तसेच मोजमाप पुस्तिका (MB) शासनास सादर करून खोट्या अहवालाच्या आधारे शासनाची व मा. सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांची घोर फसवणूक करून उर्वरित शासकीय निधी लाटण्याचा प्रयत्न केलेला असल्याची गंभीर बाब समोर आली असून हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नव्हे तर शासनाच्या राखीव निधीवर टाकलेला सुनियोजित दरोडा असल्याने या सर्व प्रक्रियेतील संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी जाणीवपूर्वक दलित वस्तीच्या निधीचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केली हे विवीध कार्यलयीन पत्रांवरून जवळपास निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे….
त्यामुळे संबंधितांवर प्रशासनाने स्वतःहून गुन्हे दाखल करणे अपेक्षित असून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्षपातीपणे चौकशी करून संगनमताने दलित वस्ती निधीचा गैरवापर करणा-या सर्व संबंधितांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा नाईलाजास्तव दि. १० मार्च पासून पं.स. कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल असा निर्वाणीचा लेखी इशारा राहुल कांबळे (उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ, ता. माहूर, जि. नांदेड) यांच्यासह मोहन कनीराम आडे, नितीन कोल्हे, राजू कांबळे, पंकज पाईकराव, विष्णू कांबळे, धर्मा राठोड, उत्तम जमदाडे, गणेश जमदाडे अविनाश जमदाडे, शंकर भिका जाधव, सिद्धार्थ हनवते, महेश पाईकराव, कैलास कांबळे, रामेश्वर कांबळे आदींनी लेखी निवेदनातून दिला असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड., पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माहुर, यांना दिल्या आहेत….





