ईतर
माहूर न.पं. मधील कोट्यावधींचा घरकुल भ्रष्टाचार घोटाळा अखेर चव्हाट्यावर..?
"आर्थिक व्यवहाराची महत्वपुर्ण कागदपत्रेही न.पं. कार्यालयातून गायब..?? ; "घरकुल योजनेतील गैरव्यवहारावर मुख्याधिका-यांचा शिक्कामोर्तब..!!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
मागील अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या माहूर नगर पंचायतीचा आणखी एक मोठा घोटाळा पुढे आला असून प्रधानमंत्री आवास योजनेतील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराा अक्षरश: चव्हाट्यावर आणताना अत्यंत नियोजनबद्धरित्या केल्या गेलेल्या या घरकुल घोटाळ्यातील पडद्यामागील काळ्या कर्माची चिरफाड करताना संबंधितांवर पुढील कार्यवाही प्रक्रियेसाठी थेट जिल्हाधिका-यांना पत्र देवून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी माहूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे…
गैरकायदेशीर कामांसह प्रशासनाची फसवणूक करून दलितवस्तीच्या निधींसह अनेक मार्गाने येणारा विकास निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात अक्षरश: विश्वविक्रम केल्यासदृश्य कारनामे करणा-या माहूर नगर पंचायतमधील ‘संधीसाधू’ कर्मचारी व लोकप्रतिनिधीचा आता आणखी एक कोट्यावधींचा महाघोटाळा उघडकीस आल्याने माहूर शहरासह संपुरण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत माहूर नगरपंचायत स्तरावर लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेला अनुदान निधी चक्क एका बोगस कन्सल्टंट एजन्सीच्या नावाने वर्ग करून त्यातून आपले ‘उखळ’ पांढरे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज रोजी मुख्याधिका-यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवलेल्या पत्रातून समोर आला आहे.. त्यामुळे गोरगरीबांच्या हक्काच्या घरावर ‘नांगर’ फिरवून स्वत:चे घर शुशोभित करून गोरगरीबांंच्या स्वप्नांची राखरांगोळी करणा-या या भयावह प्रकरणाचा चेंडू आता थेट जिल्हाधिका-यांच्या दालनात टोलावल्याने प्रकरण तुर्तास लांबले असले तरी लवकरच यातील पलायन केलेल्या भ्रष्ट कर्मचा-यांसह माहूर नगर पंचायतीमधील ‘ते’ “अलिबाबा…चालीस चोर” नेमके कोण..? हे लवकरच सर्वांसमोर येणार असल्याने या भ्रष्ट मंडळीची अक्षरश: ‘त्रेधा-तिरपीट’ होणार असल्याची खरमरीत चर्चा संपुर्ण तालुक्यातून ऐकावयास मिळत आहे….
माहूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांचे जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेले पत्र जा.क्र. 2026/नपंमा/PMAY/ टे-1/ 37 दि. ३०-०१-२०२६ नुसार प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राथमिक दृष्ट्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबतचा खुलासा केला आहे… त्यात मा. वित्त नियंत्रक / प्राधिकरण अधिकारी, वित्त नियंत्रक / प्राधिकरण कार्यालय, म्हाडा, मुंबई यांचे पत्र क्र. एमएच/मुअ-3/का2/प्र.आ.यो 550/2025 दि. 18/07/2025 तसेच लेखापाल, नगरपंचायत माहूर यांचा अहवाल आवक क्र. 57 दि. 30/01/2026 या दोन्ही पत्र व अहवालाचा संदर्भ देेेेवून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत माहूर नगरपंचायत स्तरावर लाभार्थ्यांना वितरीत करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेला अनुदान निधी, शासनाने विहित केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना कंन्सल्टंट एजन्सी कामांसाठी वापरण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव जिल्हाधिकारी नांदेड यांना सांगितले आहे…
विशेषत: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त होणारा निधी हा केवळ मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वितरीत करणे अपेक्षित असताना सदरचा निधी लाभार्थ्यांना वितरीत न करता इतर कामकाजासाठी खर्च करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे… त्यात प्रामुख्याने… केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेली अनुदान रक्कम मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग न करता इतर बाबींच्या खर्चासाठी वापरण्यात आली आहे.. याबरोबरच आर्थिक अनियमितता झाल्याचा प्राथमिक संशय निर्माण झाल्याने संबंधित आर्थिक व्यवहारांबाबतची संपूर्ण लेखा संचिका, देयकांचे तपशील व आवश्यक पुरावे सध्या लेखा विभागाकडे पूर्णतः उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याची गंभीर बाब देखील मुख्याधिका-यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिलेल्या लेखी पत्रातून उघड झाली आहे… परिणामी सदर प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून शासनाच्या आर्थिक शिस्तीचा व योजनेच्या उद्दिष्टांचा भंग करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याने प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता लक्षात घेता, वरिष्ठ स्तरावरून विशेष समिती नेमून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी केली आहे….
“विशेष म्हणजे माहूर नगर पंचायत मधील अनेक धक्कादायक व गंभीर भ्रष्टाचाराच्या प्रकारांपैकी एक हा प्रधानमंत्री आवास योजनेतील माहाघोटाळा असून दलितवस्तीच्या नावाखाली आलेला कोट्यावधींचा निधी देखील माहूर नगर पंचायत प्रशासनाने थेट जंगलात वळवून स्वत:ची तुमडी भरण्याच्या नादात अनेक विभागांना तोंडघशी पाडताना अडचणीत आणले आहे. अशात वेगवेगळ्या अनेक विभागांकडून माहूर नगर पंचायतीवर पत्र व कारणे दाखवा नोटीसींसोबतच खुलासारूपी अहवाल सादर करण्यासाठी कागदोपत्री ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरू असतानाच गोरगरीबांना हक्काच्या घराचे ‘गाजर’ दाखवून अक्षरश: त्याच गाजराचा ‘हलवा’ बनवून खाणारे ‘ते’ लुचाट लोकप्रतिनिधी व काळतोंडे कर्मचारी नेमके कोण..? हे लवकर सर्वासमोर उघडे पडणार असल्याने त्याच भ्रष्टाचारी मंडळींचे धाबे दणाणले असल्याची खात्रीशीर माहिती सुत्राकडून प्राप्त झाली असून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी लवकरच शहरातील काही ‘सेटींग-किंग’ मंडळींना सक्रीय करून प्रकरणावर पडदा टाकण्याचे अथक प्रयत्न होणार असल्याचे खात्रीलायक अंदाज काही जाणकार मंडळीकडून वर्तवण्यात आले आहेत….





