क्राइम
माहूरच्या दिव्यांग महिलेच्या ‘अँट्रोसिटी’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश जाधव आता उच्च न्यायालयात..!
"मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० ऑक्टोबरला सुनावणी; अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींवर लक्ष...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
माहूर येथील ४९ टक्के दिव्यांग महिला नंदा भीमराव पाईकराव यांच्याशी संबंधित कथित जातिवाचक शिवीगाळ, धमकी आणि घराच्या ताब्याच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून या प्रकरणात आरोपी गणेश अमरसिंग जाधव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळल्यानंतर त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या अपिलाची सुनावणी येत्या ३० ऑक्टोबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून या प्रकरणाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेघले आहे…
माहूर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. १८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलमांनुसार यातील आरोपी गणेश अमरसिंग जाधव याच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून फिर्यादी महिलेने आरोपीकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. आणि परतफेड होईपर्यंत घरातील दोन खोल्या तारण म्हणून दिल्या होत्या, असा आरोप आहे. दरम्यान २९ एप्रिल २०२६ रोजी एक लाख वीस हजार रुपये परत केल्याच्या नंतरही घराचा ताबा देण्यास नकार देण्यात आल्यानंतर साक्षीदारांसमोर जातिवाचक शिवीगाळ व धमकी देण्यात आली, असे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.. हे आरोप न्यायालयात अंतिमतः सिद्ध झालेले नसले तरीही विक्रीखताचा युक्तिवाद आणि बँक व्यवहाराची नोंद..! या महत्वपुर्ण बाबींना समोर ठेवून जिल्हा न्यायालयाने आरोपी गणेश जाधवचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला होता.. यावेळी अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वतीने फिर्यादीने घर २०२४ मध्येच विकल्याचा आणि हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. FIR दाखल करण्यास विलंब झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. तर दुसरीकडे, फिर्यादीने सादर केलेल्या बँक खात्याच्या तपशिलानुसार आरोपीच्या खात्यात ६० हजार रूपये थेट हस्तांतरित झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विक्रीखताच्या तारखेनंतरही आर्थिक व्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले होते. तसेच, कथित जातिवाचक शिवीगाळ सार्वजनिक रस्त्यावर दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोप असल्याने अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्ह्याचे आवश्यक घटक प्रथमदर्शनी दिसून येतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तद्नंतर या निरीक्षणांच्या आधारे अटकपूर्व जामीन अर्जावर अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८ मधील प्रतिबंध लागू होत असल्याचे सांगत न्यायालयाने अर्ज फेटाळला होता….
जिल्हा न्यायालयाच्या या आदेशाने व्यथित होवून आरोपी गणेश जाधव याने उच्च नायालयात धाव घेतली असून सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अपील क्रमांक ८९०/२०२६ नुसार सदर प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी न्यायविषयक प्रकरण म्हणून नोंदविण्यात आले आहे. या नोंदीत गणेश अमरसिंग जाधव यांचे नाव याचिकाकर्ता म्हणून असून, महाराष्ट्र राज्यासह नंदा भीमराव पाईकराव यांना प्रतिवादी म्हणून दर्शविण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. रविंद्र बी. आडे यांचे नाव नमूद असून, येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून आरोपीला कोणता दिलासा मिळतो..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…. एवढेच नव्हे तर सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना कोणते मुद्दे मांडले जातात आणि उच्च न्यायालय काय भूमिका घेते..? हे महत्वपुर्ण प्रश्न समोर येणार असल्याने न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे एकंदरीत चित्र आहे…
या प्रकरणातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे एका बाजूला दिव्यांग व अबला महिलेच्या तक्रारीतील गंभीर आरोप, तर दुसरीकडे धनदांडग्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी सुरू असलेला न्यायालयीन प्रयत्न..! या पार्श्वभूमीवर प्रकरणाची सुनावणी महत्त्वाची ठरणार असून, केवळ उच्च न्यायालयात अपील दाखल होणे म्हणजे आरोपीला दिलासा मिळाला किंवा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द झाला, असे नाही. तथापि, ३० ऑक्टोबर रोजी असलेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालय पहिल्याच सुनावणीत किंवा त्यानंतरच्या पुढील तारखेत नेमका काय आदेश देते, हे प्रत्यक्ष सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे…
विशेष म्हणजे, फिर्यादी नंदा भिमराव पाईकराव (वय ५२ वर्षे, ४९% शारीरिक दिव्यांग, विधवा, अनुसूचित जाती महार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. स्टे. माहूर येथे सदर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमाणित केले, अश्लील हातवारे करून जीवे मारण्याची धमकी दिली. एफ.आय.आर. चे वाचन केले असता ॲट्रॉसिटी कायद्यान्वये प्रथमदर्शनी गुन्हा (Prima Facie Case) स्पष्टपणे सिद्ध होतो. तर पीडितेचे मूळ राशन कार्ड, घराची मूळ कागदपत्रे, बँक पासबुक व इतर महत्त्वाचे वैयक्तिक दस्तऐवज सध्या आरोपीच्या बेकायदेशीर ताब्यात आहेत, तपास अधिका-यांकजून ते हस्तगत (Seize / Recover) करणे बाकी असून आरोपीने खरेदीखत क्र. ८६४ / २०२४ ( रक्कम रु. ४,९२,०००/-) तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये नगरपंचायतीचे इतर कर्मचारीही सहभागी असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.. एवढेच नव्हे तर पीडितेच्या बँक खात्यातून आरोपीने परस्पर हडप केलेल्या ‘रमाई आवास घरकुल योजनेच्या निधीचा आर्थिक व्यवहार (Money Trail) प्रत्यक्षातील तपासात उघडकीस आणणे अद्याप बाकी असून, या गुन्ह्यातील सर्वात महत्वपुर्ण बाब म्हणजे, यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गंभीर कलमे लागू असल्याने SC/ST Act च्या कलम 18 मध्ये CrPC कलम 438 च्या अंमलबजावणीवर प्रतिबंध आहेत.. तर कलम 18A(2) मध्येही कलम 438 लागू न होण्याची तरतूद आहे. एवढेच नव्हे तर BNSS कलम 482 हे अटकपूर्व जामिनाशी संबंधित कायद्याची विद्यमान तरतूद असून मा. सर्वोच्च न्यायालयाने Prathvi Raj Chauhan v. Union of India, (2020) 4 SCC 727 मध्ये स्पष्ट केले आहे की SC/ST Act अंतर्गत FIR मधून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसून येत असल्यास कलम 18/18A मधील प्रतिबंध येथेही लागू होतो. तथापि, केवळ अपवादात्मक परिस्थितीत, FIR मधूनच प्रथमदर्शनी गुन्हा बनत नसल्याचे स्पष्ट झाला तरच न्यायालय हस्तक्षेप करू शकते. अन्यथा नाही…! त्यामुळे सदर प्रकरणात यापुर्वीच जिल्हा न्यायालयाने प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे मान्य करून आरोपीचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्याने जिल्हा न्यायालयाचा ‘तो’ आदेश कायम राहतो का बदलला जातो..? याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे....





