क्राइम

दिडशे किलोमीटर दूरून आलेल्या ‘एलसीबी’ चा दहेगावातील गांजाच्या शेतीवर छापा ; ‘दोन वयोवृद्ध व्यक्ती ताब्यात ; माहूर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह..!’

"४१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; ११८ झाडांतून ८३ किलो गांजा हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

 कापूस आणि तुर पिकांच्या आड चक्क गांजाची शेती फुलविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल सोमवारी उघडकीस आला असून जिल्हा मुख्यालयापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगावात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट धडक देत गांजाची शेती उद्ध्वस्त करताना या कारवाईत तब्बल ११८ हिरवी गांजाची झाडे जप्त केेेली असून जप्त केलेल्या गांजाची अंदाजित किंमत ४१ लाख ५० हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे व त्यांचे पथक १६ नोव्हेंबर रोजी किनवट-माहूर उपविभागात अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी गस्त घालत होते. याचदरम्यान दहेगाव शिवारातील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची जोपासना केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन शेत गट क्रमांक ८५ मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी शेतात कापूस आणि तुरीच्या पिकांच्या आड आंतरपीक म्हणून गांजाची लागवड करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान पथकाने लहान-मोठी अशी एकूण ११८ हिरवी गांजाची झाडे जप्त केली असून या झाडांचे वजन अंदाजे ८३ किलो, व अंदाजित बाजारमूल्य ४१ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.. या प्रकरणी शेताशी संबंधित सिताराम राघोजी कराळे (वय ७५) आणि तुकाराम राघोजी कराळे (वय ७०) या वयोवृद्धांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, नायब तहसीलदार कैलास जेठे, पो.नि. चोपडे, बळीराम दासरे, देविदास चव्हाण, ज्ञानोबा कवठेकर, रविशंकर बामणे, अझरोद्दीन शेख, अनिल बिराजदार, मोतीराम पवार तसेच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, पो.हे.कॉ. प्रकाश गेडाम, पवन राऊत, संघरत्न सोनसळे आत्राम, अशोक जाधव, होमगार्ड चालक शेख असलम, शेख युसूफ, राजपत्रित अधिकारी, प्रशासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथकाने या कारवाईत सहभाग घेतला…
“विशेष म्हणजे, अगदी मागील काही दिवसांपुर्वी माहूरचे पोलीस निरिक्षक राहतात त्या ठिकाणापासून अगदी 50 फुटाच्या अंतरावर एका बांधकाम मजूराचा मिक्सर मशीनच्या टायरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना सकाळी साडेपाचला घडल्यानंतर या घटनेची माहीती पोलीस निरिक्षकांना साडेनऊला लक्षात आली होती. त्यामुळे माहूर पोलीसांची सजगता ही तुर्तास तरी जगजाहीर आहे..!!
तथापि, दहेगाव येथील बेकायदेशीर गांजा लागवडीची माहीती दीडशे किलोमीटर दूरच्या पथकाला मिळते.. मात्र स्थानिक पोलीस यंत्रणा याबाबत अनभिज्ञ कशी..? याबाबत जास्तीचे तर्क वितर्क लढविण्याची तुर्तास तरी गरज वाटत नाही. तरीही दहेगाव येथील गांजाची शेती पकडली जाण्यापेक्षाही या कारवाईने माहूर पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण केले असून माहूर तालुक्याच्या हद्दीत, स्थानिक पोलीस ठाण्यापासून फार दूर नसलेल्या शेतात मागील अनेक वर्षांपासून गांजाची लागवड होत असताना स्थानिक पोलिसांच्या गुप्तवार्ता यंत्रणेला याची माहिती आधी का मिळाली नाही..? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.. तर यात सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे, माहूर पोलिसांचाही या कारवाईत सहभाग असल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिक पातळीवर या प्रकाराची पूर्वकल्पना होती का..? याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर येणे आवश्यक असून संयुक्त कारवाईच्या स्वरूपाबाबत निर्माण झालेल्या चर्चेलाही पोलीस प्रशासनाने स्पष्ट उत्तर देणे गरजेचे आहे.. त्यामुळे गांजाच्या शेतीमागे आणखी कोणाचे हात आहेत का..? यासह दहेगाव परिसरात यापूर्वीही देखील अशा प्रकारची लागवड होत होती का..?, गांजाची झाडे किती काळापासून जोपासली जात होती..?, त्यातून उत्पादित होणारा गांजा नेमका कुठे विकला जात होता आणि या व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का..?, असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित होत असून केवळ दोन वयोवृद्ध व्यक्तींना ताब्यात घेऊन तपास थांबता कामा नये. तर गांजाच्या संभाव्य पुरवठा साखळीचा, आर्थिक व्यवहारांचा आणि संबंधितांच्या संपर्कांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. एकंदरीतच दहेगावातील या कारवाईने माहूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, आता पोलिसांच्या पुढील तपासातून गांजाच्या शेतीमागील संपूर्ण साखळी उघड होते का आणि स्थानिक पातळीवरील गुप्तवार्ता यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close