ईतरक्राइम

धक्कादायक..! MTDC च्या रस्ते बांधकामावर तरुण मजुराचा बळी..? मिक्सर मशीनच्या टायरखाली चिरडून २० वर्षीय मजूराचा दुर्दैवी मृत्यू…

"बारा तासांची रात्रपाळी, अवघे हजार रुपये वेतन अन् सुरक्षिततेचा पत्ताच नाही..!" माहूरच्या MTDC बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

माहूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व नाली बांधकाम मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कामावर भिषण घटना घडली असून, रात्रपाळीत काम करत असताना मिक्सर मशीनच्या टायरखाली आल्याने एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  आज दि. 5 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडल्याने कामगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...

या दुर्दैवी घटनेत बादल भिसे वय २० वर्षे, रा. शिराढोण, ता. लोहा, जि. नांदेड हा तरुण मजूर ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरील इतर मजूरांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर जखमी बादल याला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे यवतमाळकडे रवाना करण्यात आले. मात्र, आर्णी परिसरात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, आर्णी येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचेही सहकारी मजुरांकडून सांगण्यात आले आहे… त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे MTDC च्या बांधकामस्थळी कामगारांच्या जीविताची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरवशावर..? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, याच कामावर पहिली शिफ्ट सकाळी 6 ते सायं.6 ; तर दुसरी शिफ्ट सायं. 6 ते सकाळी 6… अशी तब्बल १२ तासांची शिफ्ट असून केवळ हजार रुपये मजुरी संबंधित टेकेदार देत असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे…
विशेष म्हणजे, सदर रस्त्याचे काम चोवीस तास सुरू ठेवण्यात येत असून, कामगारांकडून प्रत्येकी बारा-बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करून घेतले जात आहे. म्हणजेच एका बारा तासांच्या शिफ्टसाठी केवळ एक हजार रुपये मजुरी दिली जात आहे. यात अवघ्या वीस वर्षांच्या तरुणांना रात्रपाळीत सलग बारा तास काम करावे लागत असेल, तर त्यांना पुरेशी विश्रांती, सुरक्षित कामाचे वातावरण, आवश्यक संरक्षक साधने आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची..? हे तपासणे महत्वाचे असून याहून गंभीर बाब म्हणजे, कामगारांना त्यांच्या अपघात विम्याबाबत किंवा इतर कोणत्या विमा संरक्षणाबाबत ठोस माहिती नसल्याचे समजते. कामगारांच्या नावावर विमा आहे की नाही..? त्यांची कामगार म्हणून नोंदणी झाली आहे की नाही..? त्यांना लागू असलेल्या वैधानिक लाभांची माहिती देण्यात आली आहे की नाही..? हे तपासणे अत्यंत गरजेचे असून, कामगारांच्या सुरक्षेसाठी कायद्याने घालून दिलेल्या मर्यादा पायदळी तर तुडवल्या गेल्या नाहीत नां..? असा महत्वपुर्ण प्रश्न देखील यानिमितेताने पुढे आला आहे…
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक गंभीर आणि संशयास्पद बाब म्हणजे, राष्ट्रीय महामार्गापासून MTDC च्या गेस्ट हाऊसपर्यंत अंदाजे ३०० ते ४०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काम नेमक्या कोणत्या शासकीय योजनेतून सुरू आहे, याची माहितीच सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध नाही.
या कामासाठी किती निधी मंजूर झाला..? प्रशासकीय मान्यता कोणी दिली..? तांत्रिक मान्यता कोणत्या अधिकाऱ्याने दिली..? कामाची निविदा कोणत्या कंत्राटदाराला मिळाली..? संबंधित कंत्राटदार किंवा एजन्सीचे नाव काय..? कामावर देखरेख करणारा अभियंता कोण..? कामाची मुदत किती..? कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी कोणाची..? यापैकी कोणतीही माहिती दर्शविणारा आवश्यक माहिती फलक बांधकामस्थळी दिसून येत नसल्याची बाब समोर आली असून सार्वजनिक निधीतून होणाऱ्या बांधकामाची माहिती नागरिकांना मिळू नये, अशी परिस्थिती असेल तर पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे एका तरुण मजुराच्या जीवावर बेतलेल्या या घटनेनंतर मयत बादल भिसे याच्या मृत्यूची अधिकृत वैद्यकीय व शवविच्छेदन अहवालाद्वारे खातरजमा करून अपघाताची संपूर्ण चौकशी होईल का..? व संबंधित बांधकाम कंत्राटदार, कामाचे पर्यवेक्षण करणारे अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका निश्चित करून त्यांच्यावर कारवाई होईल का..? असा प्रश्न आता पुढे येत आहे…
एकंदरीतच, केंद्र सरकारचा Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 हा कामगारांच्या आरोग्य, सुरक्षितता व कामाच्या अटींसंदर्भातील महत्त्वाचा कायदा २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झालेला असून
या संहितेतील कलम ६ नुसार नियोक्त्यावर कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. सामान्य कामकाजाची मर्यादा आठ तास प्रतिदिन व ४८ तास प्रतिआठवडा अशी असून, लागू नियमांनुसार संमतीने अतिरिक्त काम करून घेतल्यास ओव्हरटाइमचा मोबदला सामान्य दराच्या दुप्पट देण्याची तरतूद आहे. म्हणूनच, बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करून घेण्यामागे कामगारांची संमती, अतिरिक्त कामाचे तास, विश्रांती आणि ओव्हरटाइमचे योग्य वेतन यांचे पालन झाले आहे का..? याची कामगार विभागाने चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघात की निष्काळजीपणाचा परिणाम..? पोलिस तपासातून सत्य समोर येणार का..? कामाच्या ठिकाणी मिक्सर मशीन चालविताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक अंतर राखले होते का..? मशीनच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था होती का..? रात्रपाळीत पुरेसा प्रकाश, सुरक्षा कर्मचारी, चेतावणी व्यवस्था आणि संरक्षक उपाय होते का..? संबंधित चालकाकडे आवश्यक परवाना व प्रशिक्षण होते का..? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणे गरजेचे असून, या प्रकरणातील संबंधित मिक्सर मशीनचा चालक माहूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती असली तरी वृत्त लिहिपर्यंत या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळे केवळ चालकापुरती चौकशी मर्यादित न ठेवता, अपघातास कारणीभूत ठरलेल्या यंत्रणेतील त्रुटी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिकाही तपासली जाणे आवश्यक असल्याची खरी गरज निर्माण झाली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close