क्राइम
व्हीआयपी दर्शनाचा माज..! माहूरगडावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा…!
"तासभर रस्ता अडवून आमदाराचा ताफा ; संतप्त भाविकाने वाहनाच्या काचा फोडल्या..!" 'एसटी बससह शेकडो वाहनांची कोंडी ; सामान्य भाविकांच्या सहनशीलतेचा अंत, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संतप्त सवाल..!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर नवरात्रोत्सवाच्या गर्दीत व्हीआयपी दर्शनाचा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, एकीकडे सामान्य भाविक तासन् तास रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करताना दुसरीकडे व्हीआयपींच्या वाहनताफ्यांमुळे सार्वजनिक रस्ते अडवले जात असल्याचा संतापजनक प्रकार आज दि. 19 रोजी माहूरगडावर समोर आल्याने तेलंगणातील एका आमदारासह महाराजांच्या ताफ्यातील सुमारे सात वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचा आरोप असून, या प्रकाराने संतप्त झालेल्या एका भाविकाने संबंधित आमदाराच्या वाहनाची चक्क काच फोडल्याची घटना घडल्याने माहूरगडावरील वाहतूक नियोजन आणि व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या कथित झुकत्या मापाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज दि.19 रोजी माहूर गडावरील श्री रेणुकादेवी गडाच्या पायथ्याशी एक वेगळाच प्रकार घडला असून, व्हीआयपींच्या दर्शनासाठी चक्क रस्ताच ओलीस असल्याचा प्रत्यय सामान्य भाविकांना आला. तथापि, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतून लाखो भाविक माहूरगडावर दाखल होत असतात, अशा गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना, व्हीआयपींच्या वाहनांमुळेच रस्त्यावर अडथळे निर्माण होत असतील, तर वाहतूक नियोजन नेमके कोणासाठी..? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आज दि. 19 ऑक्टोबर रोजी तेलंगणातील एका आमदारासह एका महाराजांच्या ताफ्यातील सुमारे सात वाहने माहूरच्या श्रीरेणुकादेवीच्या दर्शनासाठी गडावर आली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यातील एका वाहनाने रस्त्याच्या अगदी मधोमध ठाण मांडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात निर्माण झाला. त्यावेळी आमदार महोदय दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांचे वाहन ‘जैसे थे’ च होते. अशावेळी त्यांच्या वाहनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्याने अडकलेल्या सामान्य भाविकांबरोबरच महाराष्ट्र राज्य महामंडळाची एसटी बसही तब्बल तासभर अडकली. केवळ व्हिआयपींच्या वाहनताफ्यामुळे ऐन गर्दीच्या काळात वाहतूक ठप्प झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा संताप अनावर झाला..त्याहीपेक्षा अधिक म्हणजे तब्बल तासभराहून अधिक काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नवरात्रोत्सवातील गर्दी, उष्ण वातावरण आणि त्यात भर म्हणून वाहतूक कोंडी..! अशा परिस्थितीत श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शनापूर्वीच या गैरसोयीचा सामना करावा लागल्यामुळे व्हीआयपींच्या सोयीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार भाविकांना अत्यंत वेदनादायी ठरला असून या प्रकाराला जबाबदार कोण..? असा संतप्त सवाल उपस्थित करताना संतप्त झालेल्या एका भाविकाने संबंधित आमदाराच्या वाहनाची चक्क काचच फोडल्याची घटना घडली. त्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चालकाने वाहन बाजूला घेतले. यावेळी वाहन बाजूला घेण्याच्या मुद्द्यावरून चालक आणि काही भाविकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले…

दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याच्या आरोपावरून सुरू झालेल्या या प्रकारात वाहनाची तोडफोड हा स्वतंत्रपणे गंभीर विषय असला तरीही, वाहतूक अडविणे असो किंवा वाहनाची तोडफोड असो, यापैकी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याचे समर्थन होऊ शकत नसले तरीही, या घटनेतून निर्माण झालेल्या प्रश्नांकडे प्रशासनाने डोळेझाक करू नये अशी प्रामाणिक आणि वाजवी मागणी या वृत्तांकनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत… ‘आमदाराची गाडी म्हणून वेगळा कायदा आहे काय..?’ किंबहूंना सामान्य नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण केला, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई होते. ही बाब माहूर पोलीस व नगर पंचायतीच्या संयुक्त कारवाहीत बारा दुचाकीवरील कारवाईतून समोर आली आहे… परंतू व्हीआयपींच्या वाहनांबाबत नियमांची अंमलबजावणी तितक्याच तत्परतेने का झाली नाही..? आमदाराच्या वाहनामुळे रस्ता अडवला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना संबंधित वाहन तातडीने हटविण्यासाठी वाहतूक कर्मचारी किंवा जबाबदार अधिकारी पुढे का आले नाहीत..? असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात असून कायद्याच्या दृष्टीने सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक नियम वेगवेगळे असूच शकत नाहीत. यातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे भारतीय लोकशाहीच्या तत्वानुसार, लोकप्रतिनिधींना सन्मान मिळायलाच हवा.. मात्र त्या सन्मानाच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध येत असतील, तर तो सन्मान नसून प्रशासनातील व व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहेत.. हे प्रशासनाने सर्वप्रशम लक्षात घ्यावे….
विशेषत: नवरात्रोत्सवात माहूरगडावर प्रचंड गर्दी होत असताना वाहनतळ, प्रवेशमार्ग, बाहेर पडण्याचे मार्ग आणि व्हीआयपी वाहनांच्या हालचाली यांचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी महोदयांनी संपुर्ण लवाजम्यासह बेठक घेवून याबाबतचे संपुर्ण नियोजन केल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून प्रकाशित झाल्या… तथापि, प्रशासनाने सर्व नियोजन केले असेल..? तर मग व्हीआयपींच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, निश्चित प्रवेशमार्ग आणि वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे कर्मचारी तैनात करणे याप्रकारच्या नियोजनात स्थानिक प्रशासन नेमके कुठे कमी पडले.? हा कळीचा मुद्दा असून शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येणा-या भाविकांच्या श्रद्धेचा आदर करायचा असेल, तर त्यांच्या वेळेचा, सुरक्षिततेचा आणि प्रवासाच्या सोयीचाही आदर करावा लागेल..! हेच प्रशासनासाठी बाध्य आणि अत्यावश आहे… परंतू, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केवळ व्हीआयपींच्या वाहनांमुळे तासन्तास रस्त्यावर अडकावे लागत असेल तर प्रशासनासह उत्सव व्यवस्थापनाच्या दाव्यांच्या कसोट्या आणि त्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांची कसोटी लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ गर्दी मोजूून निश्चिंत राहण्यापेक्षा जबाबदारीही निश्चित करून परिस्थितीशी समर्पक राहण्याची खरी गरज होती.. हे सर्वसामान्य भाविकांचे मत असून वाहतूक नियंत्रणासाठी नेमके कोणते कर्मचारी तैनात होते..? आणि अडथळा दूर करण्यासाठी वेळेत कार्यवाही का झाली नाही..? याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे आता गरजेचे बनले आहे.
“विशेष म्हणजे, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाने मारलेल्या ‘फुश्यारक्या’ आजच्या घटनेने जगजाहीर झाल्या असून, प्रशासनाने कितीही फुशारक्या मारल्या तरीही, या संपुर्ण प्रकारात प्रशासन ख-या अर्थाने सजग होते का..? किंबहूना पोलीसांचा अख्खा फौजफाटा उपलब्ध असताना वेळीच याबाबत प्रशासनाने का लक्ष दिले नाही..? सामान्य नागरीक असो वा व्हिआयपी..! याबाबत वस्तुस्थिती समोर असताना व संबंधित वाहन नियमभंग करत असल्याचे दिसून आल्यानंतरही नियमानुसार कारवाई का केली नाही..? एरव्ही सर्वसामान्यांच्या बारा दुचाकी जप्त केल्यानंतर प्रत्येकी तीन हजारांचा दंड वसूल करणा-या माहूर पोलीसांनी या व्हिआयपी आमदार महोदयांच्या वाहनाला किती दंड आकारला..?? हा प्रमुख प्रश्न यानिमित्ताने पुढे येत असून, माहूरगड हे सर्वसामान्यांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने येथे सर्वप्रथम भाविकांच्या श्रद्धेला प्राधान्य आहे… त्यामुळे हे केंद्र व्हिआयपींच्या वाहनताफ्यांचे प्रदर्शन करण्याचे ठिकाण नसून, देवीच्या दर्शनासाठी येणारा सामान्य भाविकही तितकाच महत्त्वाचा आहे. हे दर्शविणारे एक ठिकाण आहे हे प्रशासनाने विसरू नये. व्हीआयपींना सन्मान द्या.. पण त्या सन्मानाच्या मोबदल्यात सामान्य भाविकांना वाहतूक कोंडीची शिक्षा दिलेल्या प्रशासनाची ही भुमिका येथे कुचकामी ठरलेली दिसत असून गरीब असो वा श्रीमंत..! सामान्य असो वा व्हिआयपी..!! कायदा आणि नियम सर्वांसाठीच सारखेच आहेे..तर मग अद्यापही माहूर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत नोंद का नाही…? हा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रकरणात एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी किंबहूंना त्यावर कायदेशीर तोड काढण्याच्या हेतूने अवघ्या साडेतीन तासात काउंटर केस म्हणून दुसरा ‘न घडलेला गुन्हा’ दाखल करणारे माहूर पोलीस, व्हिआयपींच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतरही गप्प का..? दुपारनंतर घटना घडल्याचे दिसून आल्यानंतरही या संवेदनशील घटनेची नोंद वृत्त लिहीपर्यंत माहूर पोलीस ठाण्यात का झाली नाही..? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात पार संभ्रमाची लाट उसळली असून प्रशासनाच्या नजरेत प्राधान्य नेमके कुणाला..? भाविकांना की व्हिआयपींना..? याबाबत भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे….





