सामाजिक
विकासाच्या नावाने बोंबाबोंब..!, सामाजिक सलोख्याला तडा..!! आगामी न.पं. निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राजकारण्यांना जातीय संघर्षाचे डोहाळे..?
'शांतता आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन ; जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पडद्यामागील 'त्या' दंगलखोरांचा शोध घ्या..!' जनतेचे पोलीस प्रशासनाला आवाहन..!!


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माहूरवासीयांना शहरातील पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना, विकासाच्या दाव्यांचे नेमके वास्तव काय.? या संतप्त सवालाबरोबरच पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि नागरी सुविधांचे प्रश्न, घरकुल लाभार्थ्यांच्या अपहाराची रक्कम तसेच शहरातील कथीत भ्रष्टाचाराचे ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना शहरातील राजकीय वातावरण मात्र अन्य कारणांनी तापविले जात असल्याचे खळबळजनक वास्तव दृष्टीपथास येत असून, विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरू असताना स्थानिक राजकारण्यांना मात्र जातीय संघर्षाचे डोहाळे लागल्याचे ज्वलंत वास्तव मागील काही दिवसांपासून समोर आलेल्या घटनाक्रमांवरून दिसून येत असल्याचे माहूरकरांमधून बोलले जात आहे..
‘माहूरकरांना पाणी हवे, दंगलीचे राजकारण नको..!’ या परखड भूमिकेतून समाजमाध्यमांवरून पुढे आलेल्या पोस्टरने शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधले असून या पोस्टरमधून केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे, तर लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेलाही अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तथापि, शहरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असताना रस्ते, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधींचे प्रश्नही सुटलेले नाहीत, असा आरोप या पोस्टरमधून करण्यात आला आहे. तर पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा का झाली नाही..? विकासकामांचा ठोस हिशेब जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी कोणाची..? निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणारे राजकीय नेतृत्व प्रत्यक्ष प्रश्न सोडविण्याच्या वेळी कुठे असते..? असे सवालही उपस्थित केले आहेत.. दरम्यान पाणी, रस्ते, स्वच्छता आणि रोजगार हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा समाजाचे प्रश्न नाहीत. ते संपूर्ण शहराच्या जगण्याशी निगडित प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांवर सर्वपक्षीय पातळीवर एकत्रितपणे ठोस भूमिका घेतली जात नसल्याची टीका पोस्टरमधून करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, ध्रुवीकरण आणि तणावाच्या राजकारणातून नेमके कोणाचे हित साधले जाते..? जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सामाजिक वातावरण तापविले जात आहे काय..? या प्रश्नांची उत्तरे राजकीय नेतृत्वाने जनतेला देण्याची वेळ आली असल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे.
विशेषत: मिरवणुका, आक्षेपार्ह गाणी आणि जातीय तेढीचा मुद्दा प्रामुख्याने समोर करताना, मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी व घोषणांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारांबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असले तरी, त्यासंदर्भातील कारवाई, तपासाची प्रगती आणि दोषींवर झालेली कार्यवाही याबाबत काही बाबी पोलीस प्रशासनाच्या अखत्यारीत असल्या तरी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींची कोणताही राजकीय दबाव न घेता सखोल चौकशी व्हावी… कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. किंबहूंना या घटनेच्या पार्श्वभुमिवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केवळ बघ्याची भूमिका न घेता आगामी न.पं. निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर शहरातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न तर होत नाही नां..? या प्रश्नाचे सरळ आणि सोपे उत्तर शोधून अशा प्रवृत्तींच्या ‘नांग्या’ ठेचल्याशिवाय गप्प बसू नये.. अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनता बाळगून आहे..
“एकंदरीतच, अफवा, चिथावणीखोर वक्तव्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कृतींवर वेळीच प्रतिबंध घालणे ही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची जबाबदारी असली तरीही कारवाई करताना कोणताही दुजाभाव न ठेवता कायद्याची समान अंमलबजावणी होणेही तितकेच आवश्यक आहे. केवळ तणाव निर्माण झाल्यानंतर बंदोबस्त लावण्यापेक्षा तणाव निर्माण होण्याची कारणे शोधून तणाव निर्माण करण्यासाठी पडद्यामागून खेळ रचणा-या ख-या दंगलखोरांना समोर आणून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. किंबहूंना माहूरच्या जनतेला कोणत्याही समाजाविरुद्ध द्वेष नको, कोणत्याही धर्माविरुद्ध संघर्ष नको आणि राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांततेचा बळीही नको..! नागरिकांना नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, स्वच्छ परिसर, रोजगाराच्या संधी आणि सुरक्षित वातावरण हवे आहे.. ‘शांतता आणि बंधुभाव हीच माहूरची खरी ओळख’ हा संदेश देत पोस्टरमधून नागरिकांना संयम राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.. दरम्यान राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत असून, पाण्याच्या प्रश्नावर ठोस कृती कधी होणार..? विकासकामांचा हिशेब कोण देणार.? नागरीकांच्या थकीत घरकुलाची बिले कधी देणार..? सामाजिक शांतता बिघडविणाऱ्यांवर निष्पक्ष कारवाई कधी होणार..? सलोखा बिघडवणा-या प्रवृत्तींच्या मागे नेमके कोण..? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांचीही असून माहूरचा विकास, माहूरकरांचा हक्क..! हा नारा केवळ पोस्टरपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला, तरच या भूमिकेला खरा अर्थ प्राप्त होईल… अन्यथा शांत व संयमी शहरात जातीय तणावाची ठिणगी टाकून हजारो नागरीकांना वेठीस धरणा-या नीच राजकारण्यांचे डावपेच यापुढेही सफल होतील हे सुर्यप्रकाशाऐवढे सत्य आहे…






