सामाजिक
मदत केली की माणुसकीचा गवगवा…? मदतीच्या नावाखाली महिलांच्या स्वाभिमानाचे जाहीर प्रदर्शन…!!
"दानाच्या नावाखाली प्रसिद्धीचा बाजार..! विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांचे फोटो झळकवून प्रसिद्धी मिळवणा-या नेतेगिरीचा असाही चेहेरा..!!"





(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
दिपावलीच्या निमित्ताने गरजूंंना मदत करण्याचा एक नवा ट्रेंड माहूर किनवटसह सर्वत्र दिसून येत असून एखाद्या गरजू महिलेला सणासुदीच्या काळात साडी भेट देणे, आर्थिक मदत करणे किंवा तिच्या अडचणीच्या काळात आधार देणे ही निश्चितच कौतुकास्पद आणि माणुसकी जपणारी बाब असली तरी मदतीचा हात पुढे करताना मदत घेणाऱ्या व्यक्तीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान जपण्याचे भानही मदत करणाऱ्यांनी ‘खुटी’वर टांगून निराधार व एकल महिलांचे थेट फोटो प्रकाशित करून भन्नाट प्रसिद्धी मिळवताना ‘त्या’ महिलांचा स्वाभिमान जपायला नको का..? हा ज्वलंत प्रश्न यानिमित्ताने पुढे आल्याने, केलेेेली मदत ही केवळ प्रसिद्धीसाठीच होती का..? असा सवाल उपस्थित होत आहे..
माहूर तालुक्यात दिपावली व भाऊबीजेच्या निमित्ताने काही राजकीय पक्ष व नव्याने नेतेगिरीचे डोहाळे लागलेल्या काही स्वयंघोषित नेत्यांकडून, निराधार, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या व एकल महिलांना आयुश्यभर पुरेल..! असा आव आणत काही मदत तर काही साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रकाशित झाले आहेत.. या उपक्रमामागील मदतीची भावना निश्चितच स्वागतार्ह असून दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावला, आयोजकांनी पुढाकार घेतला, परंतु या उपक्रमाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने एक अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा राहीला असून, ज्या महिलांना परिस्थितीने अगोदरच विधवा, घटस्फोटित अथवा परित्यक्ता म्हणून सामाजिक संघर्षाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले… त्यांच्याच असहायतेचे आणि गरिबीचे छायाचित्रण करून ते सार्वजनिक प्रदर्शनात मांडण्याची गरज नेमकी काय…? त्या महिलांना की प्रसिद्धी मदत करणाऱ्यांना..? किंबहूंना एखाद्या महिलेच्या हातात साडी देताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यापेक्षा तिच्या मनातील वेदना समजून घेणे अधिक महत्त्वाचे नाही का..? मदत स्विकारणाऱ्या महिलांचे फोटो काढून ते प्रसिद्ध करणे, बातम्यांत प्रसिद्ध करून त्यांची ओळख सार्वजनिक करणे आणि त्यातून मदत करणाऱ्यांच्या सामाजिक कार्याचा प्रचार करणे, हा प्रकार मदतीच्या मूळ उद्देशालाच छेद देणारा नव्हे का…? असे ज्वलंत प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत…
प्रश्न केवळ साडीचा नाही, प्रश्न त्या साडीच्या बदल्यात नकळतपणे गहाण पडणाऱ्या स्वाभिमानाचा असल्याने आजच्या काळात प्रत्येक उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ, प्रसिद्धीपत्रके आणि सोशल मीडियावरील पोस्टच्या रूपात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली की त्याचे छायाचित्र, मदत करणाऱ्यांचे छायाचित्र, सत्कार, कौतुक आणि प्रसिद्धीचा सोहळा..! मात्र, या सगळ्या प्रक्रियेत मदत स्वीकारणाऱ्या व्यक्तीला आपला फोटो सार्वजनिक करायचा आहे का, तिची ओळख उघड व्हावी असे तिला वाटते का, याचा विचार किती जण करतात..? हा प्रश्न ऐरणीवर आला असून ‘दानाचा धर्म मोठा की प्रसिद्धीचा हव्यास..?’ याबाबत समाजमनातून तीव्र संताप व्यक्त होत आहे..
विशेष म्हणजे, दानधर्माच्या संस्कृतीत गुप्तदानाला विशेष महत्त्व दिले गेले असून मदत ही एखाद्याच्या दुःखावर प्रसिद्धीची इमारत उभी करण्यासाठी नसते. तर खरी मदत तीच, जी गरजू व्यक्तीला मदतीचा आधार देते.. पण तिच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचू देत नाही… परंतू, जाहिरात करून केलेले प्रत्येक दान दिखाऊच असते, असा सरसकट निष्कर्ष काढता येत नसला तरीही सामाजिक उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचणे आवश्यकही असू शकते. मात्र, उपक्रमाची माहिती देणे आणि मदत स्वीकारणाऱ्या महिलांचे फोटो त्यांच्या इच्छेविना प्रसिद्ध करणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एवढेच नव्हे तर, प्रसिद्धी हवी असेल तर आयोजकांचे फोटो, उपक्रमाचा तपशील आणि मदतीसाठी पुढे आलेल्या दानशूर व्यक्तींची माहिती प्रसिद्ध करणे ही ऐच्छीक बाब असली तरीही महिलांना केलेल्या मदतीचे फोटो प्रकाशित करून त्या गरजू महिलांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करण्याची गरजच काय..? गरजू महिलांच्या स्वाभिमानाचा विचार कोण करणार..? विधवा होणे हा गुन्हा नाही… घटस्फोटित असणे हा कलंक नाही… परित्यक्ता किंवा एकल महिला असणे ही लाज वाटण्याची बाब नाही… या महिलाही समाजातील इतर महिलांप्रमाणेच सन्मानाने जगण्याचा अधिकार बाळगतात… परंतू, त्यांच्या त्याच परिस्थितीचा उल्लेख करून मदतीच्या रूपात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची ओळख सार्वजनिक करून त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देणे, हे संवेदनशीलतेच्या कसोटीवर योग्य आहे का..? हा यक्षप्रश्न वैचारिक जनतेतून चर्चीला जात आहे..
एकंदरीतच मदत करतेवेळीचे फोटो प्रसिद्ध करताना संबंधित महिलांची स्पष्ट आणि माहितीपूर्ण संमती घेतली होती का..? त्यांना फोटो सार्वजनिक होण्याचे स्वरूप आणि संभाव्य परिणाम समजावून सांगितले होते का..? मदत नाकारल्यास किंवा फोटो काढण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता ना..? समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरजू महिलांना मदत करावी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. मात्र, या मदतीच्या बदल्यात त्यांच्या चेहऱ्यांची प्रसिद्धीच्या बाजारात मांडणी होऊ नये..ही काळाची गरज असून गरजू महिलांना साडीची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मसन्मान कायम ठेवणेही महत्त्वाचे आहे… त्यामुळे दान करा..! पण दानाचा डंका पिटू नका..!! गरिबीचे प्रदर्शन करून श्रीमंतीची जाहिरात करण्यापेक्षा, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून एखाद्या गरजूच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण करा. किंबहूंना मदत करणाऱ्याचे नाव वर्तमानपत्रात झळकले नाही तरी चालेल… परंतू मदत स्वीकारणाऱ्या महिलेचा स्वाभिमान समाजाच्या नजरेतून उतरता कामा नये..! हीच खरी माणुसकी… आणि हाच खऱ्या सामाजिक कार्याचा धर्म..! बाकी “हितभर लाकूड, अन् हातभर ढिपली” दाखवणा-या स्वयंघोषित व लुचाट नेत्यांची खरी लायकी काय.? ते सर्वांना माहितच आहे…













