ईतर

माहूरच्या ‘नारीशक्ती संवाद’ यात्रेला प्रसिद्धीचा मुलामा की आमिषांचे राजकारण..? स्थानिक भाजप पदाधिका-याच्या आमिशाची कॉल रेकॉर्डींग चर्चेचा विषय..??

"पत्रकारांना आमिष देवून वृत्तांकनासाठी बोलवल्याने अनेक पत्रकारांची उपस्थिती.  महिलांनाही रोजंदारीवर आणल्याचा आरोप; अनेक ऑटोचालकांचे भाडेही थकल्याची चर्चा..! शक्तीपीठ ते भक्तीपीठ अभियानाच्या सांगता सोहळ्यानंतर नवा प्रश्न; गर्दी जमवली, प्रसिद्धी मिळवली… पण दिलेली आश्वासने पूर्ण कोण करणार..?  

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

महिला सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शक्तीपीठ ते भक्तीपीठ’ नारीशक्ती संवाद यात्रेच्या माहूर येथील सांगता सोहळ्याभोवती आता संशयाचे ढग निर्माण झाले असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळाच चर्चेचा विषय पुढे आला असल्याने, व्यासपीठावर महिला सक्षमीकरणाचा जागर, भाषणांतून मोठमोठे संकल्प आणि सभागृहात महिलांची उपस्थिती…! मात्र कार्यक्रम संपल्यानंतर एका स्थानिक भाजप पदाधिका-याच्या चालबाजीचा विषय…आणि त्यातून पुढे आलेल्या विविध मानधनाच्या कथित आश्वासनांंच्या कल्पनेने या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

 

“शक्तीपीठ ते भक्तीपीठ” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या रंजक माहितीनुसार, स्थानिक भाजपचा एक पदादिकारी तथा पत्रकार म्हणवून मिरवणा-या एकाने कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी अनेक पत्रकारांशी संपर्क साधला होता. या संपर्काची कॉल रेकॉर्डींग क्लिप अनेकांकडे उपलब्ध असून या क्लिपमध्ये सांगितल्यानुसार, या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृत्तांकन केल्यास मानधन आणि योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा एकंदरीत संवाद या क्लिपमधून समोर आला आहे. तथापि,  कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी व्हावी व विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहावेत आणि त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असल्याचा या कॉल रेकॉर्डींग क्लिपमधून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, पत्रकारांना वृत्तांकनासाठी मोबदला देण्याचे आश्वासन नेमके कोणी दिले..? त्यासाठी अधिकृत नियोजन होते का..? आणि संबंधित पत्रकारांना प्रत्यक्ष मोबदला मिळाला का..? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरीही पत्रकारितेचे काम हे जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याचे असताना, जो येईल तो ऐच्छिक वृत्तांकन करेल…अथवा नाही..! हे इच्छेनुसार असले तरीही या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ठेका घेवून  पत्रकारांना मानधनाचे आश्वासन द ‘तो’ तथाकथीत पत्रकार कोण..? याबाबत आता रंजक चर्चेला उधान आले आहे…

 

या प्रकरणातील आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे कार्यक्रमासाठी आणलेल्या काही महिलांशी चर्चा करून विचारणा केली असता, नाव पुढे न येवू देण्याच्या अटीवर काही महिला वरिष्ठ अधिका-यांच्या सांगण्यावरून..तर काही महिला चक्क रोजंदारीवर आल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना काही महिलांनी सांगितले असून हा दावा स्वतंत्रपणे पडताळलेला नसला, तरीही त्यांच्या उपस्थितीसाठी नियोजनानुसार प्रवास किंवा अन्य खर्चाची व्यवस्था करणे यात गैर काहीच नाही. मात्र, उपस्थितीच्या बदल्यात मोबदला देण्याचे ठरले असेल, तर संबंधित महिलांना त्यांचे मानधन वेळेवर मिळाले का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमात सहभागी महिलांनाच त्यांच्या श्रमांच्या मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही दुर्दैवी बाब आहे… याबाबत आणखी एक पैलू म्हणजे, कार्यक्रमासाठी महिलांना आणण्यासाठी काही ऑटोची व्यवस्था देखील करण्यात आली होती… मात्र, महिलांना आणणाऱ्या ऑटोचालकांचे येण्या-जाण्याचे भाडे अद्याप मिळाले नसल्याचा दावा स्वत: भाजपातील पदाधिका-यांनी केला असून याबाबतच्या संभाषणाची ऑडीओ क्लिप देखील उपलब्ध आहे…..

 

विशेष म्हणजे, या संपुर्ण प्रकरणाविषयी ‘त्या’ संबंधित पत्रकार तथा भाजप पदाधिका-यास विचारणा केली असता, त्याच्या म्हणण्यानुसार त्याने बंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती फोन स्वीकारत नसल्याचेही ‘त्या’ पत्रकाराचे म्हणणे असून तेे फोन उचलत नसतील तर मी काय करू..? अशा प्रश्नाची ढाल त्याने समोर केली आहे… त्यामुळे शासकीय कार्यक्रमाच्या मोठ्या व्यासपीठावरून महिला सक्षमीकरणाचे विचार मांडणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि महिलांना स्वावलंबी बनविण्याचे आवाहन करणे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, अशा कार्यक्रमाचे यश केवळ उपस्थितांची संख्या, छायाचित्रे, प्रसिद्धी किंवा घोषणांवर ठरत नाही. हे अधोरेखित करताना कार्यक्रमासाठी केलेला खर्च, नियोजनाची पारदर्शकता, सहभागींचा सन्मान आणि संबंधितांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता हे देखील तितकेच महत्त्व आहे. किंबहूंना विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना मानधन देण्याचे आश्वासन, महिलांना रोजंदारीवर आणल्याचा दावा आणि ऑटोचालकांचे भाडे थकल्याची चर्चा या तिन्ही बाबींची सत्यता तपासली जाऊन कार्यक्रमाच्या मुख्य मंत्रीमहोदया तथा ‘शक्तीपीठ ते भक्तीपीठ’ या शासकीय कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वत: लक्ष घालून यामागचे नेमके सत्य काय.? ते शोधणे गरजेचे असल्याची भावना माहूर तालुक्यातील भाजपप्रेमी मंडळीतून व्यक्त केली जात आहे….

 

 

एकंदरीतच, महिला सक्षमीकरणाच्या नावाने आयोजित कार्यक्रमात आश्वासनांच्या नावाखाली पत्रकार, महिला किंवा वाहतूक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना काही आश्वासने दिली गेली असतील, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची..? कार्यक्रमाचे नियोजन कोणी केले..? मोबदल्यासंबंधी काही ठरले होते का..? आणि संबंधित व्यक्तींना त्यांचे पैसे मिळाले आहेत का..? यामागे मंत्रीमहोदयांचा नेमका कोण स्वियसहाय्यक होता..? या सर्व  प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळणे आवश्यक असून महिलांना स्वावलंबनाचा संदेश देताना त्यांच्या सहभागाचा सन्मान राखण्याबरोबरच पत्रकारांना वृत्तांकनासाठी बोलावताना काही अटी होत्या का..?  आणि ‘त्या’ सेवा पुरविणाऱ्यांची देणी वेळेवर चुकती झाली का..? याबाबत आता कार्यक्रम संपल्यानंतर हळूहळू चर्चेला सुरूवात झाली असून कार्यक्रमाची प्रसिद्धी अवघ्या काही तासांत संपत असल्याची बाब खरी असली तरीही, मात्र दिलेल्या आश्वासनांची जबाबदारी कार्यक्रम संपल्यानंतरही कायम राहते.. हे या बाबीवरून अधिक दिसत असल्याची उपहासात्मक बाब प्रकर्षाने दिसून येत असल्यामुळे संबंधित आयोजक आणि पदाधिकारी या आरोपांबाबत काय स्पष्टीकरण देतात, तसेच कथित थकीत रकमा प्रत्यक्षात अदा केल्या जातात का, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे…

टिप:- बातमीचा उत्तरार्ध लवकरच..!!

COMMING SOON…!!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close