पत्रकार कार्तिक बेहेरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता सन्मानचिन्हचा गौरव…

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर –
आदिवासी आणि बंजारा बहुल भागातील वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणारे,दैनिक गावकरीचे माहूर तालुका प्रतिनिधी श्री. कार्तिक शंकरराव बेहेरे यांना सन २०२५-२६ चा उत्कृष्ट पत्रकारिता विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दैनिक गावकरी परिवाराने हा सन्मान प्रदान केला आहे.
बेहेरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माहूर-किनवट सारख्या दुर्गम भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि न्याय हक्कांसाठी सातत्याने लेखणी झिजवली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडणारी त्यांची पत्रकारिता जनसामान्यांचा खरा आवाज ठरली आहे. त्यामुळेच त्यांना मिळालेला हा पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
हा सन्मान सोहळा नुकताच हिमायतनगर येथे संपन्न झाला. यावेळी दैनिक गावकरीचे कार्यकारी संपादक दिनेशजी हारे सर आणि जिल्हा प्रतिनिधी (नांदेड) अशोकजी काकांडीकर सर यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार बांधव, संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेहेरे यांच्या कार्याचे यावेळी मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्तिक बेहेरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माहूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील पत्रकारी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





