ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर..!
महेक बहुउद्देशीय संस्थेकडून पत्रकारितेतील योगदानाचा गौरव; २२ ऑक्टोबरला उमरी येथे पुरस्कार वितरण सोहळा..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बजरंगसिंह हजारी)
श्रीक्षेत्र माहूर
दैनिक ‘श्रमिक लोकराज्य’ (नांदेड) चे माहूर तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह रामसिंह हजारी यांना महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासीबहुल माहूर तालुक्यातील जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने मांडत पत्रकारितेच्या माध्यमातून बजावलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख आरीफ निमटेककर यांनी हजारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-:- 22 ऑक्टोबरला उमरी येथे गौरव-:-
गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरी येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभात राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत हजारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
-:- दुर्गम माहूरच्या प्रश्नांना पत्रकारितेतून वाचा-:-
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय, कृषी, आरोग्य आणि लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम हजारी यांनी केले आहे. माहूरसारख्या दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वृत्तांकनातून प्रभावीपणे मांडत त्यांचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्थानिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची या पुरस्काराच्या निमित्ताने राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
-:- माहूरच्या पत्रकारितेचा राज्यस्तरीय सन्मान-:-
हजारी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने माहूर तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या गौरवाबद्दल स्थानिक नागरिक, पत्रकार, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






