सामाजिक

९० टक्के काम पूर्ण, तरीही लोकरवाडी तहानलेलीच…! २५ नोव्हेंबरचा प्रशासनाला अल्टिमेटम..!!

"जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामावर आ. भीमराव केराम आक्रमक ; भारती पवार यांचा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत मौजे लोकरवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी उर्वरित केवळ १० टक्के कामाच्या दिरंगाईमुळे संपूर्ण योजना अद्याप कार्यान्वित झालेली नसून किरकोळ कामे अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने गावात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभुमिवर आमदार भीमरावजी केराम यांनी प्रशासनाला २५ नोव्हेंबरपूर्वी योजना कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

माहूर तालुक्यातील मौजे लोकरवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या या विद्युतपुरवठ्याचा काही व्यक्तींकडून खासगी कामासाठी अनधिकृत वापर होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक या पाणीपुरवठा योजनेच्या सुविधांचा खासगी वापर होत असल्याची बाब गंभीर असून, यावर तातडीने नियंत्रण आणून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश आमदार केराम यांनी दिले आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्या सौ. भारती अशोक पवार यांनी या प्रश्नावर निवेदन देत दि. २५ नोव्हेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालय, लोकरवाडी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी पत्र देऊन संबंधित कंत्राटदाराकडून योजनेचे उर्वरित १० टक्के काम तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विद्युतपुरवठ्याचा अनधिकृत वापर थांबवावा, संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी आणि काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा ग्रामस्थांना लेखी स्वरूपात कळवावी, असेही स्पष्ट केले आहे. तथापि, लोकरवाडीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने दि. २५ नोव्हेंबरपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करून पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आमदार केराम यांनी निर्देशित केले आहे.
“जलजीवन मिशनचा मूळ उद्देश प्रत्येक घरापर्यंत नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे हा आहे. त्यामुळे केवळ ९० टक्के काम पूर्ण झाल्याची आकडेवारी दाखवून प्रशासनाला जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. तर उर्वरित काम पूर्ण करून प्रत्यक्ष नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होणे हीच योजनेच्या यशाची खरी कसोटी ठरणार आहे. आता आमदारांच्या निर्देशानंतर प्रशासन कितपत तत्परतेने कार्यवाही करते आणि २५ नोव्हेंबरपूर्वी लोकरवाडीकरांची तहान भागते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close