ईतर

खळबळजनक..! शिंदोल्यानंतर आता माहूर–किनवटमधील संस्थानच्या जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी…!!

"श्रीदत्त शिखर संस्थानच्या मालमत्ता विक्रीप्रकरणी चिंतामण भारती यांचे लेखी आरोप; संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

श्रीक्षेत्र माहूर येथील श्रीदत्त संस्थानच्या मालकीच्या जमिनींच्या कथित बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा आता माहूर आणि किनवट तालुक्यांपर्यंत पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला येथील संस्थानच्या इनामी जमिनींच्या हस्तांतरणाबाबत उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या चौकशी अहवालात गंभीर बाबी नमूद झाल्यानंतर, माहूर–किनवट तालुक्यांतील संस्थानच्या मालकीच्या शेतजमिनींच्या व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. संस्थानच्या गादीच्या वारसांपैकी एक असलेल्या चिंतामण भारती यांनी यासंदर्भात लेखी आरोप करत संबंधित गावांतील संस्थानच्या मालकीच्या जमिनींच्या विक्री व्यवहारांची चौकशी करावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे..

 

 

 

यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला येथील संस्थानच्या जमीनीच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी उपविभागीय अधिकारी वणी यांनी दिलेल्या चौकशी अहवालामुळे संस्थानच्या मालकीच्या जमीनी व त्या जमीनींच्या संरक्षणाच्या प्रकरणाला आता वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तथापि, मौजा शिंदोला, ता. वणी, जि. यवतमाळ येथील श्रीदत्त संस्थानच्या इनामी जमिनींच्या व्यवहारांबाबत गोपाळ अंबादास भारती यांच्या तक्रारीनंतर २०१३ मध्ये चौकशी करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या चौकशी अहवालात तत्कालीन विशेष मुखत्यार चंद्रकांत शंकरराव देशपांडे यांनी शासनाची परवानगी न घेता जमिनींचे हस्तांतरण केल्याचा उल्लेख सुस्पष्ट उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर याच अहवालात संबंधित फेरफारांची चौकशी, आवश्यक नोंदींची दुरुस्ती आणि दोषींवर महसुली व फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्याबाबत शिफारशी करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यामुळे संस्थानच्या इतर मालमत्तांच्या व्यवहारांचीही अभिलेखांच्या आधारे तपासणी करण्याची मागणी महत्त्वाची ठरत असून या चौकशीच्या मागणीने संपुर्ण माहूर किनवट तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

दरम्यान, शिंदोला येथील संस्थानच्या जमीनींच्या अफरातफरीच्या पार्श्वभुमिवर माहूर व किनवटमधील विविध गावांतील संस्थानच्या जमिनींचीही तपासणी करण्याची खळबळजनक मागणी संस्थानच्या गादीच्या वारसापैकी एक असलेले चिंतामण भारती महाराज यांनी केली असून, त्यांच्या मागणीनुसार माहूर व किनवट तालुक्यांतील संस्थानच्या मालकीच्या शेतजमिनींच्या नोंदी, गट क्रमांक, फेरफार, विक्रीखते आणि हस्तांतरणासाठी घेतलेल्या परवानग्यांची तपासणी करण्यात यावी. यासोबतच संस्थानच्या मालकीच्या जमिनींचे अधिकारबाह्य हस्तांतरण झाले आहे का..?, याची शिंदोला प्रकरणाच्या धर्तीवर सखोल चौकशी करावी, अशी त्यांची भूमिका आहे. तथापि, केवळ चौकशी नव्हे, तर दोषींवर कठोर कारवाईची मागणी करताना, संस्थानच्या मालकीच्या जमिनींच्या विक्री व्यवहारांत नियमांचे उल्लंघन झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाल्यास संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच बेकायदेशीर हस्तांतरण आढळलेल्या जमिनींबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवून संस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणीही चिंतामण भारती यांनी लेखी व पुराव्यासह केलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे…

 

“विशेष म्हणजे, संस्थानच्या मालमत्तांचे संरक्षण होणार का..? या जटील प्रश्नाच्या अंतरात शिरून शिंदोला येथील चौकशी अहवालाच्या पार्श्वभूमीवर माहूर– किनवटमधील मोजे, अनमाळ, कुुुुमार दिगडी, मदनापूर, हडसणी, आष्टा, रूई, लिंबायत, माहूर, वायफनी, साकूर, फाचोंदा, बेल्लोरी, बोरगाव, पवनाळा या गावांसह अनेक ठिकाणच्या संस्थानच्या जमिनींच्या व्यवहारांची पडताळणी झाल्यास संस्थानच्या मालमत्तांबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. तर संस्थानच्या मालमत्तेला अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे निश्चितच समोर येणार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर केवळ माहूर येथील गट नं. 199 च्या चौकशीतूनच शेकडो कोटींची अफरातफर उजेडात येवू शकते. असा गौप्यस्फोट चिंतामण भारती महाराज यांनी आमच्याशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेदरम्यान केला आहे. त्यामुळे संबंधित महसूल यंत्रणा आणि धर्मादाय प्रशासन त्यांच्या चौकशीच्या मागणीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले असून संस्थानच्या मालकीच्या जमिनींचे संरक्षण, व्यवहारांतील पारदर्शकता आणि कथित अनियमिततांची निष्पक्ष चौकशी या मुद्द्यांवर आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते..याकडे संपुर्ण किनवट माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close