
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
मागील अनेक दिवसांपासून आणि अनेक अडथळ्यांना मागे टाकत माहूर तालुक्याला वळसा घालून जाणा-या पैनगंगा नदीवरील पाचही रेतीघाटांचा अखेर लिलाव पुर्ण झाला असून लिवावात प्रत्यक्ष उत्खननाची मान्यता मिळालेली अगदी क्षुल्लक किमतीची रेती प्रत्यक्षात मात्र ग्राहकाच्या दारी किती किमतीत पडेल याची आकडेमोड करण्यात रेतीतस्कर मशगुल होवून सुगीचे दिवस आल्याचे बेडूकस्वप्न पाहत असल्याची रंजक चर्चा माहूर तालुक्यातून ऐकावयास मिळत आहे..
महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचे दि. ४ मार्च २०२६ च्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील वर्ष 2025-26 साटी किनवट उपविभागातील पर्यावरण अनुमती प्राप्त माहूर तालुक्यातील 5 वाळू घाटांचा ई-लिलाव करण्याबाबतचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार पाच वाळू घाटांवरून 5808 ब्रास रेतीच्या लिलावासाठी श्री शुभम शंकर गायकवाड, रा. वृदावन सोसायटी, यशवंतनगर पुणे यांनी उच्चतम बोली म्हणजेच टाकळी, सायफळ, नेर, दिगडी कु. व लांजी या पाच रेतीघाटांसाठी 40,09,991/-₹ (चाळीस लक्ष नऊ हजार नऊशे एक्यान्नव रू.केवळ) ची बोली बोलली होती. त्यात त्यांची बोली ही उच्चतम बोली ठरल्याने वरील पाचही रेतीघाटांवरील रेतीचे उत्खनन, वाहतुक व विक्री करण्याची मंजूरी आदेश प्राप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे याच रेतीघाटांंबाबत यापुर्वी झालेल्या लिलाव प्रक्रीयेत जवळपास साडेतीन कोटी रूपये अशा किमतीत लिलाव झाला होता. त्यावेळी लिलाव मान्य झालेल्या ठेकेदाराने रक्कमच भरली नसल्याने तो लिलाव रद्द करण्यात आला होता. तथापी, यापुर्वी झालेल्या लिलावाची रक्कम व यावेळीची रक्कम यात मोठी तफावत आढळून येत असल्याने यापुर्वी तब्बल साडेतीन कोटींना झालेला लिलाव रद्द होवून मुळ किमतीच्या आठ पट कमी किमतीत हा लिलाव मंजूर झाल्याने महसूल प्रशासन व रेती विक्रेत्यांत साटेलोटे तर नाही नां..? अशी खात्रीलायक शंका जाणकार मंडळींकडून उपस्थित केला जात आहे… आता अगदी कमी रकमेत झालेल्या लिलावातील रकमेनुसार संबंधित ठेकेदाराला केवळ 5808 ब्रास रेतीच्या उत्खननाची मंजूरी मिळाली असली तरी फक्त 690 रू प्रतीब्रास रेती संबंधित ठेकेदाराला मिळत आहे. आता कळीचा मुद्दा असा की, माहूर तालुक्यातील पाच रेतीघाटांवरून प्रत्यक्षात किती रेतीचा उपसा होतो..? आणि ग्राहकांना तिच 690/₹ किमतीची रेती घरपोच किती किमतीत मिळेल..? याबाबत अनेक चर्चांना उधान आले असून कवडीमोल दरात मिळालेल्या रेतीला सोन्याच्या भावात विकून सुगीचे दिवस येणार असल्याचे ‘बेडूकस्वप्न’ मात्र तालुक्यातील रेती वाहतुकदारांना पडत असल्याची उपहासात्मक चर्चा यानिमित्ताने कानी पडत आहे…





