Uncategorizedनोकरी संदर्भ
माहूर तहसील प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस…!!
आष्टा येथील विधवा महिलेेेेच्या शेतरस्त्याचा प्रश्न वर्षभरापासून प्रलंबित.... "रस्त्याअभावी सोयाबीनचा ढिग शेतातच ; २५ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर विधवा महिलेचे आमरण उपोषण..!"


(बाबाराव कंधारे)
माहूर…
तहसील प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आष्टा येथील विधवा शेतकरी महिलेेेेच्या शेतरस्त्याचा प्रश्न तब्बल वर्षभरापासून प्रलंबित असून पिकवलेल्या सोयाबीनला काढण्यासाठी यंत्रसामग्री किंवा मळणीयंत्र घेवून जाण्यासाठी शेतात जायला रस्ताच दिला जात नसल्याने सोयाबीनचा ढिग तसाच शेतात ठेवत तहसील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तहसील येत्या २५ ऑक्टोबरपासून विधवा शेतकरी महिलेने आमरण उपोषणाचा लेखी इशारा दिला आहे..
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील महिला शेतकरी श्रीमती निर्मलाबाई उत्तम वंजारे यांनी मागील वर्षी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी तहसिलदार माहूर यांना लेखी विनंती करून शेजारच्या शेतक-यांनी बंद केलेला गाडीबैलाचा शेतरस्ता खुला करून देण्याची विनंती होती.. यासाठी तब्बल वर्षभरापासून माहूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील तहसीलदार माहूर यांनी याप्रकरणी आदेशच पारीत केलाच नसल्याची धक्कादायक माहिती संबंधित महिला शेतक-यांने दिली असून ‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असलेल्या आर्थीक परिस्थितीत कसेबसे शेतात पिकवलेले पीक डोळ्यासमोर दिसत असूनही त्याचा उपभोग घेता येत नसल्याने कुटुंबाच्या उदर्निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…
विशेष म्हणजे सदरची महिला शेतकरी ही विधवा व असहाय्य असून तिच्या कुटुंबात फक्त लहान मुलगा आहे.. अशात तिच्याकडे असलेल्या साडेतीन एकर शेतजमीनीपैकी तब्बल दिड एकरावरील पीक यावर्षी नाल्याला आलेल्या पुरामुळे पार खरडून गेल्याचे विदारक चित्र आहे.. उर्वरीत जमीनीत तिने सोयाबीनचे तर काही जमीनीवर तुर व कपाशीची लागवड केली आहे.. दरम्यान मागील पंधरा दिवसांपुर्वी मजूरी देणेसाठी पैसे नसल्याने काढणीस आलेले सोयाबीन पिक दोघा मायलेकरांनी कापून त्याचा ढिग शेतात मारून ठेवला आहे.. त्यानंतर तहसीलदार महोदयांची वाट पाहताना… “साहेब शेतात येवून रस्ता मोकळा करून देतील..!” या भाबड्या आशेवर पाणावलेल्या डोळ्यांनी आजही मायलेक तहसील प्रशासनाची वाट पाहत आहेत…
परंतू स्वभावाने ‘सुस्त’ परंतू कर्तव्याने ‘लहरी’ असलेल्या महसूल प्रशासनाकडून अद्यापही रस्ताप्रश्न प्रलंबितच असल्याने दि. २५ मे २०२३ व १८ ऑक्टोबर रोजी रोजी पुन्हा एकदा निर्मलाबाईने शेतात जाण्यासाठी गाडी रस्ता मिळवून देण्याच्या लेखी मागणीचे निवेदन तहसील कार्यालयाला दिले आहे… परंतू ‘पुढे पाठ अन् मागे सपाट’…. या उक्तीचा प्रत्यय देत गेंड्याची कातडी पांघरलेल्या तहसील प्रशासनाला अद्यापही ‘जाग’ आली नसून तब्बल वर्षभरापासून सदरचे प्रकरण बंद फाईलीतच जमा आहे.. परिणामी प्रलंबित असलेल्या शेतरस्ता प्रकरणी निर्मलाबाई ने न्यायासाठी आता लोकशाही मार्गाचा अवलंब करत तहसील कार्यालयासमोर येत्या २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन दि.१८ ऑक्टो. रोजी प्रशासनाला दिले असून सोबतच असहाय्य महिला शेतक-याला तब्बल वर्षभरापासून तहसील कार्यालयाचे खेटे मारण्यास भाग पाडणा-या तहसील प्रशासनाला ‘शाब्बासकी’ म्हणून प्रसंगी “बांगड्यांची” भेट सुद्धा देण्याची तयारी असल्याचेही आमच्याशी बोलताना सांगीतले आहे….
एकंदरीतच संपुर्ण तालुक्यातून अनेक शेतक-यांच्या शेतरस्त्यांची शेकडो प्रकरणे सध्या तहसीलदार माहूर यांच्या ‘मामलतदार’ न्यायालयात प्रलंबित असून केवळ मोठमोठ्या गप्पा करून शेतक-यांचा काल्पनिक उद्धार करू पाहणारे महसूल प्रशासन प्रत्यक्षात मात्र शेतक-यांप्रती ‘कर्तव्यशुन्य’च असल्याचे वारंवार दिसून येते. अशात एका गरीब व असहाय्य महिला शेतक-यांना तब्बल वर्षभरापासून पायपीट करवून घेत असलेल्या माहूरच्या तहसील प्रशासनाच्या ‘पायाखाली डोके का डोक्यावर पाय’..? हे पाहणे रंजक ठरणार असून माहूर तहसीलदाराच्या कर्तव्यशुन्यतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून ठेपला आहे….

