विवाहित जोडप्यांचे दुस-यांदा लग्न लावणारा अनोखा सर्वधर्मीय विवाह मेळावा संपन्न…!
"कार्यसम्राट मा.आ. प्रदीप नाईकांसह समाधान जाधव, अनंतराव केशवे बनले विवाह मेळाव्याचे प्रत्यक्ष साक्षीदार..!"

(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)


(बाबाराव कंधारे)

विवाहित जोडप्यांचे दुस-यांदा लग्न लावणारा अनोखा सर्वधर्मीय विवाह मेळावा आज दि. २९ मे रोजी माहूर तालुक्यात पार पडला असून या विवाह मेळाव्याचे दस्तुरखुद्द कार्यसम्राट मा. आ. प्रदिप नाईक यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूर न.पं.चे नगराद्यक्ष फिरोज दोसानी, अनंतरावजी केशवे तसेच अनेक नेतेमंडळीची अख्खी फौज प्रत्यक्ष साक्षीदार म्हणुन उपस्थित असल्याने या विवाह मेळाव्याचे वैभव पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले……
माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व मुख्य महामार्गापासून जवळपास ९ कि.मी. अंतरावर असलेल्या गावात नेहेमीप्रमाणे आज दि. २९ मे रोजी २६ वा सर्वधर्मीय विवाह मेळावा संपन्न झाला. सुरूवातीचे काही वर्ष केवळ बौध्द धर्मीय परिणय मेळाव्याच्या आयोजनातून होत असलेल्या बौद्ध विवाह मेळाव्याला समाजबांधवांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. परंतू यापेक्षाही काही मोठे करावे..! कदाचित या उदात्त भावनेतून आयोजकांनी मागील काही वर्षांपासून बौध्द विवाह मेळाव्याचे सर्वधर्मीय विवाह मेळावा असे नामकरण केले.
तेंव्हापासून मात्र या मेळाव्याला किंबहूना आयोजकांच्या वैभवाला “चार चाँद” लागले असून तब्बल तिनशे ते पाचशे लग्न या विवाह मेळाव्यात लागत आहेत.. त्यामुळे भारत सरकारने या विवाह मेळाव्याची स्वत:हून दखल घेवून आयोजकांना भारतातील सर्वोत्तम विवाह मेळाव्याचे मानकरी ठरवून लगेच जागतिक स्तरावरही विशेष पारितोषिकांसाठी भारत सरकारच्या वतीने नामांकन पाठवावे अशी माफक इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली व करीत आहेत…
नेहेमीप्रमाणे आजही (दि. २९ मे) रोजी पार पडलेल्या या सर्वधर्मीय विवाह मेळाव्यात तब्बल ३०३ जोडपी विवाहबध्द करण्यात आली असून तब्बल १२५ जोडपी ही बौध्द धर्मीय तर १०७ जोडपी हिंदू धर्मीय व ७१ जोडप्यांनी आंतरजातीय विवाहात सहभाग घेतला. त्यातील पहिल्यांदाच लग्न होणारे जोडपे किती..? हा संशोधनाचा भाग असला तरी बहुतांश जोडप्यांचे लग्न चालू वर्षात विविध ठिकाणी झाले असल्याची खात्रीलायक परंतू उपहासात्मक माहितीची कुजबुज अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळाल्याने काही क्षण ४४० व्होल्ट चा झटका लागला होता. परंतू शेवटी मोठे काही करायचे असल्याने आयोजकांची ही देखील एक भन्नाट कल्पना असावी असा समज करून घेवून पार पडत असलेल्या मंगल समयी अनेकांनी स्वत:ला आवरले…

“विशेष म्हणजे काही बोटावर मोजण्याइतपत अपवाद वगळले तर कुण्याही जोडप्यांची व-हाडी मंडळी नसल्यात जमा होती. याचे प्रमुख कारण म्हणजे कदाचित उन्हाचे कारणही असावे..! कदाचित याचकारणाने काही अपवाद वगळता वधू वरांना घरच्या मंडळीने चक्क मोटार सायकलवरच पाठवले होते. तर हिंदू धर्मीय विवाहाच्या वेळी एकूण १९६ जोडप्यांकडून चार पाच जोडप्यांमध्ये आंतरपाठ धरणारे मामाजी हजर होते. बाकीच्यांंचे मामा खुद्द आयोजकच असल्याचे वाटत होते…!! व का असणारही नाहीत.???
कारण…
★ 1) विवाह मेळाव्यात विवाह करणा-या जोडप्यांना कन्यादान योजनेअंतर्गत २०,००० (विस हजार रूपये) मिळणार आहेत.
★ 2) विवाह करणा-या दोघांपैकी एक जर अपंग असेल तर वरील योजनेअंतर्गत ७०,०००/-₹ (सत्तर हजार रूपये)….
★ 3) व आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना २०,००० + ५०,००० + २,५०,०००/- असे एकूण तिन लक्ष विस हजार रूपये शासनाकडून प्राप्त होणार आहेत..
…..त्यातही अटी व शर्थींचा विचार केल्यास एक महत्वपुर्ण अटीची ‘दंबूक’ (बंदूक) आयोजकांनी दाखवली असून त्या अटीप्रमाणे सरपंच/पोलीस पाटील/नगरसेवक यापैकी दोघांची सही असलेले प्रथम विवाह असल्याचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरातबाजीत सांगीतले आहे….आता गावात लग्न झालेल्या जोडप्यांना गावसंबंधातून कोण प्रमाणपत्र बरं देणार नाही म्हणा…..????
असो… एकंदरीत आज पार पडलेल्या सर्वधर्मीय मेळाव्यासोबतच आयोजकांचेही वैभव पाहून मन:शांती झाली नाही तर नवलंच..! त्यामुळे विवाहित जोडप्यांचे दुस-यांदा लग्न लावून देणा-या आयोजकांसह लग्न लावून घेणा-याचेही केवळ दोनच वेळा नाही तर… शंभर वेळा हार्दिक अभिनंदन…! आणि केवळ यासाठीच हा शब्दप्रपंच..!!










