माहूर येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेेेेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार ; पालक वर्गात तीव्र संतापाची लाट…
"तात्काळ बदलीची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा..."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
माहूर येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेेेेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून दिवसेंदिवस शिक्षण विभागातील ‘नको ते’ समोर येत असल्याने पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळत असतानाच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या आडमुठ्या शिक्षकाच्या तात्काळ बदलीची मागणी करताना पालकवर्गाने गटशिक्षणाधिका-यांना दिलेल्या लेखी निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे..
तालुक्यातील माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या कारभारामुळे शालेय व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती माहूर यांना निवेदन देऊन संबंधित मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद नांदेड यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत..
दरम्यान येथील शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आपल्या कर्तव्यात कमालीची कसूर करत असून ते आठवड्यातून अनेक दिवस विनापरवाना शाळेत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एखादा पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक अडचणीसाठी किंवा शालेय कामासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते पालकांचे फोन उचलत नाहीत. आणि प्रत्यक्ष भेटीसाठी गेल्यास उद्धटपणे वागून भेट नाकारतात असा आरोप मनविसेच्या वतीने करण्यात आला आहे. मुख्याध्यापकाची ही मनमानी आणि आडमुठी भूमिका केवळ शिस्तीचे उल्लंघन करणारी नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ मांडणारी आहे. शाळेचा दर्जा टिकवणे आणि शिस्त लावणे ही मुख्याध्यापकाची प्राथमिक जबाबदारी असताना, येथे स्वतः मुख्याध्यापकच नियमांचे उल्लंघन करून शिक्षणाचे नुकसान करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे…
“विशेष म्हणजे सदर मुख्याध्यापकाच्या बेजबाबदार कारभाराला पालक वर्गासह शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थीदेखील पुर्णपणे कंटाळले असून अशा कर्तव्यशून्य व्यक्तीची या पदावर राहण्याची कोणतीही नैतिकता उरलेली नाही. या मतापर्यंत पालकवर्ग पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सदर मुख्याध्यापकाची या ठिकाणावरून तात्काळ बदली करावी. व त्यांच्या जागी एखाद्या कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व पालकांशी सुसंवाद राखणाऱ्या नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी. या गंभीर विषयावर शिक्षण विभागाने तातजीने कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना समस्त पालक वर्गाला सोबत घेऊन शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल.. आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा मनसेचे गजानन कुलकर्णी यांनी माहुरचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे…






