शैक्षणिक
संघर्ष,जिद्दआणि मेहनतीच्या जोरावर खेडेगावाची ‘वैष्णवी’ बनली पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर…
"फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन मध्ये वैष्णवीने घडविला इतिहास...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माहूर तालुक्यातील आष्टा या खेडेगावाची ‘वैष्णवी’ ने गावातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळविला असून फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन मध्ये तिने घवघवीत यश संपादन करीत गावचे नाव लौकीक करून नवा इतिहास घडविल्याने तिच्या यशाबाबत संपुर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
माहूर तालुक्यातील आष्टा येथील कु. वैष्णवी गजाजन सोनटक्के हिने राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा महामंडळामार्फत एनबीई द्वारे आयोजित ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन डिसेंबर 2025’ या परीक्षेत 198 गुण मिळवत घवघवीत यश संपादन करून ही किमया केली. तिच्या या यशामुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून सोनटक्के परिवारासह नातेवाईक व मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे…
दरम्यान कु. वैष्णवी चे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळा तांडा आष्टा येथे घेतल्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी उमरखेड येथे साखळे विद्यालयात झाले. तद्नंतर इयत्ता अकरावी ते बारावी आष्टा येथील श्री. शंकरराव चव्हाण विद्यालयात यशस्वीरित्या व गुणप्राविण्यासह झाल्यानंतर सप्टेंबर 2020 ते मे 2025 दरम्यान किर्गीजस्तान येथे एमबीबीएस चे शिक्षण घेवून त्यात 300 पैकी 180 गुण संपादित करून घवघवीत यश मिळविले.. विशेषत: वैष्णवी हिचे एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण विदेशामध्ये किर्गीजस्तान येथे पूर्ण झाले असून परदेशात राहून शिक्षण घेत असताना आर्थिक, शैक्षणिक व वैयक्तिक अशा अनंत अडचणींचा तिला सामना करावा लागला होता. अशाही कठीन वेळेत तिने खचून न जाता समोर असलेल्या खडतर परिस्थितीचा धैर्याने सामना करीत आपले वैद्यकीय शिक्षण पुर्णत्वास नेऊन डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविला. तथापि, एफएमजीई सारख्या कठीण व स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करून व अथक परिश्रम घेऊन एफ. एम. जी. ई. परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात 198 गुण घेऊन नेत्रदीपक यश मिळविले…
……या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून डॉ. कु. वैष्णवीच्या यशाबद्दल नामदेवरावजी केशवे यांच्यासह बाबारावजी केशवे, अनंत केशवे, प्राचार्य राजेंद्र केशवे, डॉ. निरंजन केशवे, वसंतरावजी पिंगळे, उमाजी कराळे, गोपीनाथ सुरोशे, नगरसेवक प्रा.भंडारे, प्रा. सुजित केशवे, अशोक सोळंके, चेतन कराळे, किरण वंजारे, कोथळकर सर, पावडे सर, प्रा.अजय राठोड, प्रा.प्रशांत कदम, प्रा. तुषार तास्के, प्रा. कोषटवार मॅडम यांनी अभिनंदन केले असून वैष्णवी ने खेचून आणलेल्या उल्लेखनीय व प्रेरणादायी यशाबद्दल तिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी तसेच पुढील वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी मित्रपरिवारांकडून शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे…





