माहूर येथील ‘भोजंती तलाव जि. प. शाळेत’ विद्यार्थ्यावर माकडाचा जिवघेणा हल्ला….
'माकडाच्या हल्ल्यात इ. तिसरीचा विद्यार्थी गंभीर जखमी ; शाळेच्या संरक्षण भिंतीसह विद्यार्थ्यास आर्थीक मदतीची मागणी..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर शहरातील भोजंती तलाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळेत परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या माकडांनी जिवघेणा हल्ला चढविला असून या हल्ल्यात शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणा-या विद्यार्थी गंभीर जखमी होवून त्यात त्याच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याने संबंधित विद्यार्थ्याला तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी होत आहे…
काल दि. ४ फेब्रुवारी रोजी माहूर येथील भोजती तलाव परिसरातील शिक्षण विभागाकडून अत्यंत दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी शाळेतील विद्यार्थी भोजन करीत असताना शाळेच्या प्रांगणात इयत्ता तिसरीतील हर्षद संदीप गावंडे वय ८ वर्षे या विद्यार्थ्यावर परिसरात उच्छाद मांडत असलेल्या माकडांनी जोरदार हल्ला चढविला.. यात उपद्रवी माकडांच्या जोरदार धक्क्याने जखमी विद्यार्थी हर्षदचा हात मोडला असून त्यात तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज रोजी उघडकीस आल्याने शहरातील विविध शाळांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. या घटनेत गंभीर जखमी झालेला विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब व वंचित कुटुंबातील असून उपचारांसाठी होणारा खर्च त्यांच्या कुटुंबासाठी मोठा भार ठरत आहे. तर घटनेच्या वेळी शाळेत उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांतही प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माकडांच्या सततच्या उपद्रवामुळे पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत…
विशेष म्हणजे सदरची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही अत्यंत असुरक्षित स्वरूपाची दिसून येत असून शाळेच्या परिसरात माकडांच्या प्रवेशापासून संरक्षणासाठी शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे पालकवर्गातून सांगण्यात येत आहे… त्यामुळे सदर शाळेला शासनाने तातडीने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली असून संरक्षण भितीचे काम होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडून नियमित माकड पकडण्याची मोहीम राबवावी…. सोबतच या घटनेत गंभीर झालेल्या विद्यार्थ्यास तातडीची आर्थिक मदत म्हणून शासनाकडून तात्काळ वैद्यकीय उपचार खर्च आणि आर्थिक मदत (अनुग्रह रक्कम) द्यावी. अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे….





