वानोळा ते मेंढकी ३ कि.मी. रस्त्याच्या कामात ठेकेदाराची चांदीच चांदी..?? “१५० ब्रास च्या रॉयल्टी वर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन….
"तलाठी,मंडळ अधिकारी झोपेत, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वानोळा ते मेंढकी या ३ कि.मी. च्या रस्त्यासाठी पाच कोटी रूपये खर्चून होत कामात कंत्राटदाराची मात्र चांदीच चांदी होताना दिसत असून तालुक्यातील वानोळा शिवारातील एका शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन तब्बल २ हजार ब्रास पेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन संबंधित ठेकेदाराने केल्याची खळबळजनक तक्रार येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केल्याने महसूल प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे…
सा.बां. विभाग माहूरच्या वतीने वानोळा ते मेंडकी या ३ कि.मी. च्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून त्याकरिता ५ कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमची आवश्यकता असल्याने सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराने वानोळा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी भरली, परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार पेक्षाही जास्त ब्रास मुरुमचे उत्खन करून शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला असल्याची तक्रार वानोळा येथील सामाजिक कार्यकर्ता पंडीत धुप्पे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व तहसीलदार माहूर यांना सादर केलेल्या तक्रारीने उघडकीस आली आहे.. शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व गौण खनिज चोरी करणाऱ्या संबधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व सदर अवैध मुरूम उत्खननाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसून करणाऱ्या संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे….
निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार किशोर यादव यांनी दि.३ मार्च रोजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी वानोळा यांना सदर अवैध मुरूम उत्खन प्रकरणी स्थळपाहणी करून चौकशी करून पंचनामा सह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून वानोळा येथील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी इपीएस मोजणी करून पंचनामासह अहवाल तहसील कार्यालयात दोन दिवसात दिवसात सादर करण्यात येईल अशी माहिती वानोळा चे महसूल मंडळ अधिकारी एस.के.साळसुंदर यांनी दिली आहे….

