निलंबित ग्रामपंचायत अधिकाऱ्याने बँकेतून परस्पर केली एक लाख चाळीस हजार रुपयांची उचल… तक्रार दाखल
"माहूर तालुक्यातील हिवळणी पापलवाडी येथील ग्रामसेवकाचा प्रताप..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
पापलवाडी/ हिवळणी येथील निलंबीत ग्रामपंचायत अधिकारी यांनी दि. 28 मार्च रोजी नांदेडच्या आयसीसीआय बँकेतून परस्पर 1 लाख 40 हजार रुपये एवढी रक्कम उचल केली आहे.निलंबन काळात बँकेतून रक्कम उचल केल्या प्रकरणी सखोल चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप गुणाजी राठोड यांनी दि. 29 मार्च रोजी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे…
तक्रारदाराच्या तक्रारीत नमूद तक्रारीप्रमाणे माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी/हिवळणी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना दि. 6/3/2025 रोजी जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. असे असले तरी त्यांनी दि.28 मार्च रोजी नांदेड येथील आयसीसीआय बँकेतून सोलर लाईट बसविणे कामी 40 हजार रुपयांची व त्याच दिवशी आणि त्याच बँकेतून साहित्य खरेदी करणे या हेड खाली 1 लाख रुपयांची उचल केली आहे. असा आरोप संदीप राठोड यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या तक्रारीतून केला आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचेसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा राठोड यांनी आपल्या तक्रारीत केली आहे…

