बंजारा समाजाला अनु. जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी निराळा तांडा येथे आमरण उपोषण सुरू….
'उपोषणाचा आज पाचवा दिवस ; बंजारा समाजाचा उपोषणाला पाठिंबा'


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)


किनवट/माहूर
बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी निराळा तांडा येथे मागील पाच दिवसांपासून अँड प्रदीप राठोड व सहका-यांनी आमरण उपोषण सुरू केले असून किनवट माहूर सह सर्व बंजारा समाजाचा उपोषणाला पाठिंबा दिला आहे…
किनवट तालुक्यातील मौजे निराळा तांडा येथे सदरचे उपोषण सुरू असून नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ प्रदिप राठोड यांच्यासह राहूल चव्हाण हे या उपोषणाला बसले आहेत… दरम्यान बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीची सवलत व आरक्षण मिळावे यासाठी यापुर्वीदेखील विधिज्ञ राठोड नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.12 सप्टेंबर ते दि.17 सप्टेंबर 2025 पर्यंत आमरण उपोषण बसले होते. त्यावेळी नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दि.17 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून सदरील मागणीसंदर्भात आठ दिवसाच्या आत बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने ते उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते. असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे…

तथापि, पालकमंत्री अतुल सावे यांनी 17 सप्टेंबर रोजी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न लावल्यामुळे अँड राठोड व त्यांचे सहकारी राहूल चव्हाण हे त्यांच्या मुळ गावी किनवट तालुक्यातील मौजे निराळा तांडा येथे दि. 06 ऑक्टोंबर 2025 पासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून आज या उपोषणाचा 5 वा दिवस सुरू असल्याने किनवट माहूर तालुक्यासह सर्व बंजारा समाजाचा त्यांना पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे…










