क्राइम
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून ; लूटमारीची शक्यता…!
"शेतात कापूस वेचत असताना दुपारच्या सुमारास घडलेली भिषण घटना.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात काल दि. 20/11/2025 रोजी दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे…
माहूर तालुक्यातील मौजे पाचोंदा येथील अंतकलाबाई अशोक अडागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) यांचा मृतांत समावेश आहे. दोघीही दुपारच्या सुमारास अंदाजे ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात कापूस वेचत होत्या. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळी काही ठिकाणी धक्काबुक्कीचे चिन्हे आढळल्याने हा प्रकार केवळ खून नसून लूटमारीचा प्रयत्न असावा. असाही संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान दोघींच्या अंगावरील दागिने गायब असल्याची माहिती काही स्थानिकांकडून पुढे आली असून पोलिसांकडून याची पडताळणी सुरू आहे..सदर गुन्ह्यामुळे माहूर तालुका हादरला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिशय शांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचोंंदा परिसरात असा दुहेरी हत्येचा प्रकार प्रथमच समोर आल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.. तर पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू असून ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली याचा तपास गतीने सुरू आहे…याप्रकरणी माहूर पोलीस तपास करत आहेत.
“विशेष म्हणजे स्थानिकांच्या चर्चेतून समोर आलेल्या बाबीनुसार काल एक अनोळखी व्यक्ती कानात इयरफोन घालून कुपटी ते पाचोंदा दरम्यान असलेल्या घाटानजीकच्या हनुमान मंदराजवळ दारू पित बसला होता. त्यावेळी तो कुणाशी तरी संशयास्पद बोलत होता. तर त्याच ठिकाणी दारूची बाटली पडून असल्याचेही काहींचे म्हणने आहे. त्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीवर सध्यातरी संशय बळावत असला तरी नेमका हा प्रकार लुटमारीचा.? का इतर काही..? याबाबतचे तर्क वितर्क शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे..





