
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील नाल्यातून दिवसा ढवळ्या प्रचंड रेतीचा उपसा केला जात असून नदीची रेती उपलब्ध नसल्याने चक्क नाल्याच्या रेतीकडे रेतीमाफीयानी रेतीचोरीचा मोर्चा वळवल्याने नाल्याच्या रेतीला महसूल प्रशासनाची परवानगी आहे काय.. ? असा सवाल नागरीकांतून विचारला जात आहे…
माहूर तालुक्यातील अंजनखेड गावात जाणा-या रोडनजीकच्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असून ‘दिवसा खेचर तर रात्रीला ट्रॅक्टर’ असा मधूर प्रवास रेतीमाफीयांचा सुरू आहे.. विशेष म्हणजे पर्यावरणाचा ‘-हास’ या ‘गोड’ मथळ्याखाली सध्या रेतीच्या सर्वच घाटावरील अधिकृत रेती वितरण बंद असले तरी अनेक ठिकाणी रेतीमाफियांचा रात्रीचा खेळ सुरू असल्याचे वास्तव आहे… अशात जास्तीची रिस्क न उचलता जवळच्या नाल्यातून रेतीचा उपसा करून तिच रेती नदीची असल्याचा आव आणत आपले खिसे गरम करण्याचा ‘गेम’ तालुक्यातील “निब्बर” रेतीमाफियांनी सुरू केला असून चक्क नाल्याची रेती उपसा करून दिवसा ढवळ्या वाहतुक सुरू असताना ही वाहतुक माहूरच्या महसूल प्रशासनाला दिसत नाही का..? किंबहूंना नाल्याची रेती उपसा करण्यासाठी महसूल प्रशासनाची परवानगी आहे काय..? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींसह नागरीकांना पडला आहे…
एकंदरीत हीच परिस्थिती संपुर्ण माहूर किनवट तालुक्यातील अनेक ठिकाणी असून ट्रॅक्टरमधून होणा-या रेतीवाहतुकीवर प्रशासनाची नजर असल्याने शेकडोच्या संख्येने चक्क गाढवे व खेचरांची भाडेतत्वावर आणून त्याचा उपयोग रेतीतस्करीसाठी केला जात आहे.. त्यामुळे गाढवे व खेचरांवरून बिनदिक्ततपणे व दिवसा ढवळ्या नाल्यातून उपसून होत असलेल्या रेती तस्करीला महसूल प्रशासनाची परवानगी आहे काय.? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे…

विशेष म्हणजे.. ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणा-या रेती वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर असल्याने आता रेतीतस्करांनी भाडेतत्वावर गाढवसदृश्य ‘खेचर’ उपलब्ध केले असून दिवसभर या खेचरांवर विनाअडवणुक रेतीची वाहतूक केल्यानंतर याच खेचरांना मोकाट सोडून शेतक-यांच्या शेतपिकांचे राखन करण्यासाठी सोडून देण्याचा प्रताप देखील ही मंडळी करीत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. परंतु रेतीतस्करीसाठी वापरल्या जाणा-या खेचरांना पकडून जनावरांच्या ‘कोंडवाड्यात’ टाकण्याची हिंम्मत कोण करेल हा प्रश्न शेतक-यांना भेडसावत असून सद्यपरिस्थितीत कोणत्याही गावात जनावरांचा कोंडवाडा नसल्याने निसर्गसंकटाने ग्रासलेल्या शेतक-यांना आता रेतीतस्करांच्या शेकडो खेचरांचा त्रास होत असल्याने महसूल प्रशासन या शेकडो खेचरांवर कार्यवाही करेल काय..? असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे…





