सामाजिक
वाई बाजारात संपुर्ण ‘दारूबंदी’ साठी महिलांंचा एल्गार..!
"दारूबंदीसाठी तब्बल एक हजार महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिका-यांच्या दालनात..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील दारूबंदीसाठी महिला भगिनी पुढे सरसावल्या असून येथील संपुर्ण दारूबंदीसाठी तब्बल एक हजार महिलांच्या स्वाक्षरींचे निवेदन काल दि. १२ रोजी जिल्हाधिका-यांना देण्यात येवून दारूबंदीसाठीच्या पुढील प्रक्रियेला आता वेग येणार असल्याने अवैध दारू विक्रेत्यांसोबतच पारंपारिक दारू विक्रेत्यांचेही धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
माहूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा. पं. असलेल्या मौजे वाई बाजार येथून परिसरातील तब्बल २५ ते ३० खेड्या पाड्यांना देेेशी-विदेशी दारूचा पाहिजे तेवढा पुरवठा होत असतो हे सर्वश्रुत आहे. परिणामी परिसरातील तळीरामांसोबतच गावातील तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार मोडले. तर अनेकजण मृत्यूमुखी पडून त्यांचे संसार उघड्यावर पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. परिणामी गावातील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करून दारू विक्रीस लगाम लागावा यासाठी मागील काही वर्षांपासून गावात दारूबंदीविषयक चळवळ सुरू होती. त्याचेच फलित म्हणून काल दि. १२ डिसेंबर रोजी येथील तब्बल एक हजार महिलांंच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देवून येथील दारूबंदी प्रक्रियेसाठीच्या पुढील कार्यवाहीस वेग देण्याची मागणी महिलांच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान वाई बाजार येथील देशी व विदेशी दारूची दुकाने दिवसागणिक वाढतच असल्याने गावातील तरुण मुले, श्रमिक, शेतमजूर तथा अनेक कुटुंबप्रमुख व्यसनाच्या आहारी गेले असल्याचे निवेदनात नमूद करून दारू विक्रेत्यावर कुणाचाही वचक नसल्याने अगदी बंदच्या दिवशी देखील खुलेआम मद्यपी लोकांना दारू दिल्या देण्यात येते. तर परिसरातील तब्बल 20 ते 25 खेड्यामध्ये अनधिकृतपणे ‘सबविक्रेते’ नेमून त्यांच्या मार्फत परिसरातील अनेक गावात “कव्वा..बी अन् किती..बी..!” विदेशी दारू पुरवील्या जात असल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद केली आहे.. त्यामुळे वाई बाजारसह परिसरातील अनेक गावात दारूच्या व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी घरातील कर्ते पुरुष दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक कुटुंबे उघडयावर आली आहेत. हि बाब वाई बाजार व परिसरातील 20 ते 25 गावात अतिशय गंभीर बनली आहे.. करीता गावातील सर्व महिलांनी आमचे संसार वाचविण्यासाठी व भावी पिढी ही निर्व्यसनी व्हावी या उद्देशाने दारू बंदीचा निर्धार केला आहे.
“तसेच दारू बंदीसाठी होणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. तेव्हा आपण तातडीने दारू बंदीची कारवाई सुरु करण्याची मागणी येथील श्रीमती पार्वतीबाई शंकरराव बेहेरे (ग्रा.प. सदस्या), सौ. शितल अतिश शिंदे, (ग्रा.पं. सदस्या), सौ. पुर्षा गोविंद पवार (ग्रा.पं. सदस्या), सौ. विमल राम मडावी, (ग्रा.पं. सदस्या), सौ. नंदाबाई दशरथ किनाके, (ग्रा.पं. सदस्या), हसीनाबी फिरोजखान पठाण, संगीता गणेश चेहरे, अर्चना कैलाश बेहेरे यांच्यासह गावातील तब्बल एक हजार महिलांनी जिल्हाधिकारी नांदेड यांंच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे..”
“विशेष म्हणजे वाई बाजार येथील संपुर्ण दारूबंदीसाठीची चळवळ मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून मागील पंचवार्षिकेत देखील गावातील महिलांच्या पुढाकारातून दारूबंदीची हाक देण्यात आली होती. परंतू त्यावेळी चळवळीतील बुद्धीजिवींच्या माध्यमातून दारूबंदीविषयक वातावरण कमालीचे तापवून झाल्यानंतर नेमकी कुणाच्या नाकात माशी गेली..? हा संशोधनाचा भाग असला तरी ‘बंद दाराआड’ संबंधित दारू विक्रेत्याला दारूविक्रीसाठी ‘ना-हरकत’ देवून दारूबंदीचा फज्जा उडविला होता.. आता तिच परिस्थिती पुन्हा ताठ मानेने पुढे उभी ठाकली असून यावेळी दारूबंदी होईल..? की मागचा कित्ता पुन्हा गिरवला जाणार याबाबत रंजक चर्चांना उधान आले असून याबाबतची पुढील प्रक्रिया पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे….



