नोकरी संदर्भ

बहुचर्चीत दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या स्वाक्ष-यांची पडताळणी अखेर पार….

"आंदोलकांसह दारूविक्रेतेही संभ्रमावस्थेत ; प्रक्रीयेचा पुढील टप्पा आता पडताळणीच्या निकालानंतरच..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
   बहुचर्चीत वाई बाजार येथील दारूबंदीच्या पार्श्वभुमिवर ‘आडवी-उभी’ बाटलीच्या निवडणूकीपुर्वी असलेली स्वाक्षरी पडताळणीची खडतर प्रक्रीया आज. दि. २१ रोजी अखेर पार पडली असून पडताळणी प्रक्रीयेची संपुर्ण माहिती गोपनीय असल्याकारणाने प्रक्रीयेचा पुढील टप्पा होणार अथवा नाही याबाबत पडताळणी निकालानंतरच कळणार असल्याने आंदोलकांसह दारूविक्रेतेही संभ्रमावस्थेत दिसून येत आहेत..
   माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील तब्बल आठशे अठ्ठ्यांशी महिलांनी दारूबंदीसाठी स्वाक्षऱ्या करून प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना (दि. १२) डिसेंबर २०२२ रोजी निवेदन दिले होते.  त्यामुळे आज दि. २१ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निवेदनकर्त्या महिलांच्या स्वाक्षरींची पळताळणी प्रक्रिया पार पडली.. यासाठी प्रक्रीयेचा भाग म्हणून निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या महिलांच्या स्वाक्षरींचे नमुने घेण्यात आले. दरम्यान वाई बाजार ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेली ही पडताळणी प्रक्रीया पाहण्यासाठी किंबहूंना उत्सुकता शिगेला पोहचलेली बहुतांश मंडळी आपली रोजची कामे सोडून दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात दिसून येत होती. तर नेहेमीप्रमाणे संपुर्ण माहूर तालुक्यातील विविध पक्षाची मातब्बर नेतेमंडळीही ठाण मांडून बसल्याने ही प्रक्रीया दारूबंदीची नव्हे तर ग्राम पंचायत निवडणूकीचीच तर नाही ना..? असा प्रश्न उपस्थितांना भेडसावत होता..
 विशेष म्हणजे दारूबंदीसाठी दिलेल्या निवेदनावर आठशे अठ्ठ्यांशी महिलांच्या स्वाक्षऱ्या असताना आजच्या या प्रक्रीयेत बहुतांश महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष स्वाक्षरीचे नमुने देण्याचे टाळले. त्यातच निवेदनावरील महिलांपैकी नेमक्या किती महिलांच्या स्वाक्षरींचे नमुने प्राप्त झाले याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कमालीची गोपनीयता बाळगल्याने स्वाक्षरी पडताळणीचा अधिकृतरित्या आकडा समजला नाही. त्यामुळे नेमक्या किती महिलांनी स्वाक्षरी पडताळणी प्रक्रीयेत प्रत्यक्ष येवून आपल्या स्वाक्षरीचा नमुना अधिका-यांसमक्ष ही बाब एकप्रकारचे कोडे बनली असली तरी केवळ ३१६ महिलांच्याच स्वाक्षरीचे नमुने प्राप्त झाल्याची माहिती आतील गोटातून दबक्या आवाजात पुढे येत आहे…
    एकंदरीतच विधानसभेच्या मतदार यादीतील एकूण महिला मतदारांच्या संख्येच्या किमान २५ टक्के स्वाक्षऱ्यांंची पडताळणी झाल्यानंतर दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतरच दारूबंदीसाठी ‘आडवी-उभी’ बाटलीची मतदान प्रक्रिया पार पडेेल हे सध्याच्या प्रचलित नियमांना अभिप्रेत आहे. त्यामुळे आजच्या पडताळणी प्रक्रियेत पडताळणी झालेल्या ३१६ स्वाक्ष-यांपैकी किती स्वाक्ष-या ‘बाद’ ठरतात… तसेच एकूण वैध ठरलेल्या स्वाक्ष-यांचे संख्याबळ दारूबंदीसंबंधातील पुढील प्रक्रीयेस गती देण्यास पुरेशा ठरतील काय..? यावरच दारूबंदी आंदोलनाचे संपुर्ण भवितव्य अवलंबून असून पडताळणी प्रक्रीयेचा निकाल समोर आल्यानंतरच पुढील प्रक्रीया होणार की नाही याबाबतचे सत्य पुढे येणार आहे. त्यामुळे “जर-तर” च्या संभ्रमात हताश होवून आंदोलनकर्त्यांसह दारूविक्रेत्यांचेही मनोबल कमालीचे खचले असून पडताळणी प्रक्रीयेचा कौल हा आपल्याच बाजूने यावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची मनोरंजनात्मक चर्चा येथील जनतेतून व्यक्त होत आहे..
“विशेष म्हणजे एरव्ही दारूच्या अवघ्या चार बाटल्या पकडल्या तरीही हजारो लिटर दारू पकडल्याचा आव आणून प्रसिद्धीसाठी हातहातभर माहिती माध्यमांना पुरवणा-या राज्य  उत्पादन शुल्क विभागाने आजच्या पडताळणी प्रक्रीयेची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्याचे टाळले. एवढेच नव्हे तर प्रक्रियेत समावेश असलेल्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचा-यांची नावे देखील उपस्थित पत्रकारांसमोर दिली नाहीत.. त्यामुळे कर्मचा-यांची नावे न सांगणे हा देखील गोपनीयतेच्या गोंडस नावाखाली प्रक्रीयेचाच भाग आहे..? की अजून काही..? यामागचे नेमके गौडबंगाल काय..? याबाबत मात्र अनेक रंजक चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close