पारंपारिक चालीरीतींना बगल देत पुस्तकदान करून विज्ञाननिष्ठ ‘आई’ला आदरांजली….
'पिंडदानाला पर्याय पुस्तकदान' या संकल्पनेतून विज्ञाननिष्ठतेचा संदेश....
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पारंपारिक चालीरीतींना बगल देत पुस्तकदान करून विज्ञाननिष्ठ ‘आई’ला आदरांजली वाहणार असल्याचा स्तुत्य उपक्रम वासरी येथील खानसोळे परिवाराकडून राबविण्यात येत असून ‘पिंडदानाला पर्याय पुस्तकदान’ या संकल्पनेतून वैज्ञानिकतेचा संदेश समाजासमोर ठेवताना एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतल्याने खानसोळे परिवाराच्या या नवसंकल्पनेचे कौतुक होत आहे…
माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील ग्राम पंचायत अधिकारी नारायण अर्जुनराव खानसोळे यांच्या मातोश्री कालवश राजाबाई अर्जुनराव खानसोळे वय (८५) यांची कर्करोगासारख्या आजाराने दि. ३० सप्टेंबर रोजी निधन झाले होते. तर दि. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.. दरम्यान विज्ञाननिष्ठ कालवश राजाबाई यांनी उभ्या आयुष्यात कधीही दोरी, गंडा, इबित, नवस, सायास अशी कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा पाळली नव्हती. तर त्यांचे देहावसान होण्याच्या आठ दिवसांपुर्वी राजाबाई यांना नांदेड येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मध्यंतरी एका दिवसासाठी त्यांंना घरी पाठवण्यात आले होते. त्यावेळी दरम्यान राजाबाईंंना एका नातेवाईकाने एका महाराजाकडून दोरी आणू का..? असा प्रश्न केल्यानंतर चमडीचा रोग दोरीनं बरा होतो काय..? असा प्रश्नही राजाबाईने केला होता….
तथापि विज्ञाननिष्ठ असलेल्या राजाबाईच्या विज्ञाननिष्ठ विचारधाेेचा धागा धरून त्यांचीी मुले नारायण अर्जुनराव खानसोळे यांच्यासह रामदास खानसोळे, सुभाष खानसोळे, दत्ता खानसोळे, प्रभु खानसोळे यांनी पारंपारिक चालीरितींना बगल देवून एक नवी संकल्पना प्रत्यक्ष राबवण्याचा निश्चय केला असून तेरवी, पिंडदान अशा विधी पार पाडण्याचेे नाकारून “पिंडदानाला पर्याय पुस्तकदान” ही संकल्पना प्रत्यक्षात राबवणार असल्याचा संकल्प केला आहे… दरम्यान पिंडदानाला पर्याय पुस्तकदान या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून उद्या आज दि. ९ ऑक्टोबर रोजी जि.प.कें. प्रा. शाळा वासरी येथेे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना शालेय पुस्तकांसोबतच वैचारीक विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परिक्षा, भारताचे संविधान तसेच तब्बल ७० वेगवेगळ्या महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे वाटप प्रा. डॉ. अनंत राऊत प्रसिद्ध संविधान वक्ते तथा मराठी विभागप्रमुख पिपल्स कॉलेज नांदेड यांच्यासह प्रसिद्ध किर्तनकार तथा विचारवंत श्रीधरराव कुरोबाजी पाटील, यु.व्ही. ताटे मुख्याध्यापक जि.प.कें. प्रा. शा. वासरी तसेच शिवानंद साहेबराव खानसोळे सरपंच वासरी, यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असून खानसोळे कुटुंबियांच्या या विज्ञाननिष्ठ संकल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे..