ईतर
माहूर नगरपंचायतीचा ‘घरकुल’ काळीमा ; गरिबांच्या स्वप्नांची राखरांगोळी.. ! ;”माहूर न.पं. च्या नगरसेवकांचा ‘स्वतःचा विकास’, पण सर्वसामान्यांचा घराचा स्वप्नभंग..!!
आनंद तुपदाळे पाटील यांचा २७ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
पवित्र तीर्थक्षेत्र माहूर शहरात भ्रष्टाचाराची गंगा सध्या भलत्याच दिशेने वाहत असून, गरिबांच्या हक्काच्या घरांवर नगरपंचायतीने दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने लाभार्थ्यांच्यां हक्काचा कोट्यावधींचा निधी अकोला येथील एका कंपनीशी संगनमत करून त्या करोडो रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या तात्कालीन संबंधित मुख्याधिकारी तसेच या भ्रष्टाचारात समाविष्ट असणारे नगरपंचायत अधिकारी, पदाधिकारी व यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी माहूर नगरपंचायत समोर येत्या 27 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे लेखी निवेदन आनंद पाटील तुपदाळे यांनी प्रशासनाला दिल्याने न.पं. प्रशासनाचे धाबे दणाणले आहे…
काँग्रेसचे आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह शहरातील असंख्य घरकुल लाभार्थ्यांनी प्रशासनास दिलेल्या लेखी निवेदनानुसार, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०१७ पासून अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून आपल्या घरांचे बांधकाम पूर्ण केले असून प्रशासकीय अनास्थेमुळे त्यांचे हक्काचे अनुदान अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. तथापि, २०१७ पासून प्रलंबित असलेल्या घरकुल अनुदानाच्या हप्त्यांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे गप्प आहेत. तर ज्या लाभार्थ्यांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढून घरांची स्वप्ने पूर्ण केली, ते आज कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे “शासनाकडून नगरपंचायतीला प्राप्त झालेला निधी नेमका गेला कुठे..?” असा रोकठोक सवाल विचारत, काँग्रेसचे नेते आनंद तुपदाळे पाटील यांनी नगरपंचायतीच्या ‘किळसवाण्या’ कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून “नगरवासीयांचा विकास करण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधींनी स्वतःचाच विकास साधला नाही नां..?,” असा संतप्त सवाल आता शहरवासियांमधून विचारला जात आहे…
दरम्यान आनंद तुपदाळे पाटील यांनी प्रशासनास ‘अल्टिमेटम’ देताना नगरपंचायतीच्या ‘भोंगळ’ कारभारावर कटाक्ष साधताना घरकुल लाभार्थ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर प्रशासन केवळ वेळ मारून नेणारी उत्तरे देत आहे. या अन्यायाविरोधात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून आनंद तुपदाळे पाटील यांनी खालील मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरले आहे…
1) घोटाळ्याची सखोल चौकशी: घरकुल योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत…
2) २६ जानेवारीची मुदत: ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम २६ जानेवारी २०२६ च्या आत जमा करावी…
3) अपूर्ण हिशोबाचा पंचनामा: २०१७ पासून निधी प्राप्त असूनही तो लाभार्थ्यांपर्यंत का पोहोचला नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे…
एवढेच नव्हे तर.. वारंवार लेखी आणि तोंडी निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने, आनंद तुपदाळे पाटील यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे आता भ्रष्ट अधिकारी आणि ‘स्वतःचा विकास’ करणाऱ्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे माहूरच्या जनतेचा पैसा स्वतःच्या खिशात घालणाऱ्या या ‘भ्रष्ट भगीरथांचा’ बुरखा आता जनआंदोलनातून फाटणार का..? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे…


“नगरपंचायत की भ्रष्टाचाराचे कुरण..?” अशा तीव्र शब्दांत माहूरचे नागरिक आता उघडपणे संताप व्यक्त करताना दिसत असून ज्या लोकप्रतिनिधींची निवडून येण्यापूर्वी साधी आर्थिक पत नव्हती, ते आज नगरपंचायतीच्या सत्तेवर बसताच ‘कोटी’धीश झाले आहेत.. मात्र दुसरीकडे गरिबांच्या हक्काच्या घरांची स्वप्ने आणि दलित वस्तीचा विकास निधी मात्र धुळीला मिळाला आहे. स्वतःची घरे भरून जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या लोकप्रतिनिधींच्या विलासी जीवनशैलीचा उगम हा सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशातूनच झाला असल्याची चर्चा आता शहराच्या कट्ट्या-कट्ट्यांवर रंगत आहे. “आमच्या हक्काचा पैसा स्वतःच्या तिजोरीत भरणारांना आता आगामी निवडणुकीत मतपेटीतून त्यांची खरी जागा दाखवून देऊ,” असा आक्रमक निर्धार माहूरची जनता व्यक्त करत असून, भ्रष्ट लोकप्रतिनिधींचे धाबे आता दणाणले आहेत…





